साधनेला विरोध असूनही परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्यावर असलेल्या दृढ श्रद्धेने साधना करणारे खानापूर, जिल्हा बेळगाव येथील साधक श्री. संभाजी चव्हाण !
‘मी वर्ष १९९६ – १९९७ मध्ये साधनेला आरंभ केला. त्या वेळी आमच्या घरी सत्संग चालू होता. तेव्हा माझे सर्व भाऊ–बहिणी आणि काकांची मुले असे आम्ही सर्व जण एकत्र रहात होतो. आमच्या वडिलांचा साधनेला विरोध होता. त्या काळी आमची आर्थिक परिस्थितीही बिकट होती. आमच्या गावातील काही लोक, आमचे शेजारी आणि नातेवाईक ‘ही मुले वाया गेली’, असे म्हणून आम्हाला हिणवायचे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आजतागायत आमच्या सत्संगामध्ये कधी खंड पडला नाही.
१. कुठेही कामानिमित्त गेलो, तरी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कृपेने सेवा करणे शक्य होणे
कामाच्या निमित्ताने मला महाराष्ट्र आणि गोवा येथे फिरावे लागले. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कृपेने मी जाईन त्या ठिकाणी संस्थेशी संपर्क होऊन मला सेवा करणे शक्य झाले.
२. अनेक शारीरिक आणि कौटुंबिक अडचणी येऊनही साधना सोडण्याचा विचार मनात न येणे
वयाच्या १७ व्या वर्षांपासून आजपर्यंत मला अतोनात शारीरिक त्रास सोसावे लागले. त्यातच आई लवकर गेली. वडिलांना अर्धांगवायू झाला. मी आणि लहान भाऊ कामाच्या ठिकाणी इमारतीवरून खाली पडलो. तेव्हा लोक साधना आणि संस्था यांविषयी प्रतिप्रश्न विचारून आमच्या मनात अविश्वास निर्माण करून आम्हाला साधनेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते; मात्र माझे प्रारब्ध एवढे चांगले होते की, संस्था आणि साधना सोडण्याचा विचारही माझ्या मनात कधी आला नाही.
व्यावहारिक अडचणींमुळे माझे शालेय शिक्षण इयत्ता सातवीपर्यंतच झाले. माझे शिक्षण अल्प असूनही परात्पर गुरुदेव माझ्याकडून चांगल्या प्रकारच्या सेवा करून घेतात.
३. कौटुंबिक अडचणी दूर झाल्याने विरोध करणार्यांचा साधनेवर विश्वास बसणे अन् त्यातील काही जणांनी साधनेला आरंभ करणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आज आमची घरची स्थिती पुष्कळ चांगली आहे. आमची साधनाही चांगली चालू आहे. सर्व विरोधक आणि आप्तेष्टांचा विरोध परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मोडून गेला. उलट समाज आणि आप्तेष्ट यांचा आमच्यावरचा विश्वास वाढून आता ते सनातनची सात्त्विक उत्पादने वापरतात. काही जणांनी साधनेला आरंभ केला आहे. सेवा करून घरी गेल्यावर वडीलही स्वतःहून विचारपूस करतात.
देव क्षणोक्षणी अनुभूती देतो. व्यवहारात आणि साधनेत मला ठाऊक नसलेली सूत्रे गुरुमाऊलीला शरण गेल्यावर सहज सुचतात. या सर्वांविषयी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. संभाजी चव्हाण, खानापूर, जिल्हा बेळगाव. (४.७.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |