कापशी (जिल्हा कोल्हापूर) येथील ६ वर्षाच्या बालकाची अपहरण करून हत्या !
असुरक्षित महाराष्ट्र !
कोल्हापूर, ६ ऑक्टोबर – शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव राजेश केसरे या ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबरला पहाटे उघडकीला आली. या बालकाच्या मृतदेहावर हळद-कुंकू, गुलाल आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे वरिष्ठ अधिकार्यांसह घटनास्थळी उपस्थित झाले असून मारेकर्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता आरव मित्रांसमवेत अंगणात खेळत होता. साडेसहा वाजता तो अचानक बेपत्ता झाला. नातेवाइकांनी शोध घेतला; पण रात्री उशिरापर्यंत आरव सापडू शकला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात आरव बेपत्ता असल्याची तक्रार प्रविष्ट केली. ४ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांसह नातेवाइकांनी आरवचा शोध घेतला असता तो सापडला नाही. ५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी एका व्यक्तीच्या घराच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक अन्वेषण चालू केले असून आरवचे कुणी आणि कशासाठी अपहरण केले याचे अन्वेषण करण्यात येत आहे.