कुलभूषण जाधव यांच्यासाठी अधिवक्ता नियुक्त करण्यासाठी पाकच्या न्यायालयाने भारताला आणखी वेळ दिला !

भारताला वेळ देणे हे पाकच्या न्यायालयाला भाग आहे; मात्र त्याने भारताला भारतीय किंवा विदेशी अधिवक्ता नियुक्त करण्यासाठी अनुमती देणे आवश्यक आहे, ही अनुमती पाक का देत नाही ? – संपादक

कुलभूषण जाधव

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासाठी अधिवक्ता नियुक्त करण्यासाठी भारताला आणखी वेळ दिला आहे. पाकच्या सैन्य न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या निर्णयाचा या न्यायालयात फेरआढावा घेतला जाणार आहे. कुलभूषण जाधव यांना पाकच्या सैन्य न्यायालयाने हेरगिरी आणि आतंकवादी कारवायांच्या आरोपाखाली एप्रिल २०१७ मध्ये दोषी ठरवले होते. या गुन्ह्यांसाठी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

१. उच्च न्यायालयाच्या ३ न्यायाधिशांच्या खंडपिठासमोर कुलभूषण जाधव यांच्यासाठी अधिवक्ता नियुक्त करण्याविषयी सुनावणी झाली. पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी म्हटले की, ५ मे २०२१ या दिवशी न्यायालयाने एका आदेशाद्वारे अधिवक्ता नियुक्तीसाठी भारताशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. भारताला या निर्णयाविषयी कळवले होते; मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. भारताला एका स्वतंत्र खोलीत जाधव आणि राजनैतिक अधिकारी यांच्यात बैठक करायची आहे; मात्र भारतीय प्रतिनिधीसमवेत स्वतंत्र बैठक करू देण्याची जोखीम पाकिस्तानी अधिकारी उचलू शकत नाही. केवळ हस्तांदोलन केले, तरी जाधव यांच्या जिवाला धोका संभवू शकतो. भारत जाधव यांच्यासाठी बाहेरून एका अधिवक्त्याची नियुक्ती करू इच्छितो; मात्र पाकिस्तानचा कायदा त्यासाठी संमती देत नाही. भारताचा कायदाही असाच आहे.

२. या वेळी न्यायालयाने म्हटले की, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाला लागू करायचे आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव आणि भारत सरकार यांना आणखी एक स्मरण पत्र पाठवण्यात यावे. भारताला काही आक्षेप असल्यास त्यांनी न्यायालयात भूमिका मांडावी. भारतीय दूतावासातील अधिकारी न्यायालयात अडचण सांगू शकतात.