नवरात्रीमध्ये श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गरुड मंडपातून मुखदर्शनाची सोय व्हावी ! – विश्व हिंदु परिषद
कोल्हापूर, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रीच्या कालावधीत स्थानिक आणि इतर भाविकांसाठी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गरुड मंडपातून मुखदर्शनाची सोय करण्यात यावी. यामुळे भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा आनंद लाभेल, अशी मागणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी केली आहे. या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर शहर-जिल्ह्यातील भाविकांना ‘ई-पास’मधून सवलत देण्यात यावी, नवरात्रीच्या कालावधीत महाद्वार रस्त्यावरील व्यापारी बांधवांच्या मागणीवर तोडगा काढावा, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर विहिंप अध्यक्ष शशिकांत मुचंडी, कार्याध्यक्ष प्रसाद मुजुमदार, जिल्हामंत्री अधिवक्ता रणजितसिंह घाटगे, मठ मंदिर संपर्क प्रमुख उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर, बजरंग दलाचे सुरेश रोकडे, मातृशक्तीच्या सुनेत्रादेवी घाटगे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांची स्वाक्षरी आहे.