महापालिकेचा पहिला बायोगॅस प्रकल्प मुदत संपल्याने बंद !

प्रतिकात्मक चित्र

शिवाजीनगर (पुणे) – ओल्या कचर्‍यापासून वीजनिर्मितीसाठी महापालिकेने वर्ष २००९ मध्ये पहिला बायोगॅस प्रकल्प मॉडेल कॉलनी येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर चालू केला; मात्र या प्रकल्पाची मुदत संपल्याने वर्ष २०१९ ला संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून तो बंद केला. हॉटेल, सोसायटी, खानावळ मधील ओला कचरा जमा करून त्यापासून वीजनिर्मिती केली जात होती. या प्रकल्पावर १६७ पथदिवे लावले जात होते; मात्र मुदत संपल्याने सध्या तो प्रकल्प बंद आहे. प्रकल्प चालू केला तेव्हा २५ वर्षांची मुदत असल्याचे सांगितले असतांना प्रकल्प १० वर्षांतच कसा बंद पडला ? असा प्रश्न असून हा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी सोलार किंवा बायोगॅस प्रकल्प उभा करण्याचा निर्णय शासन आणि लोकप्रतिनिधी घेतील, असे महापालिकेतील आरोग्य निरीक्षक शिवाजीराव नलावडे यांनी सांगितले. तसेच बांधकाम करतांना पडणारा राडारोडा संकलन करण्यासाठी या जागेच्या वापराचा प्रस्ताव आयुक्तांना दिल्याचे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण दीक्षित यांनी सांगितले.