महाराष्ट्रात चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांच्या आणि प्रशासनाच्या चुकांमुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अपात्र !
|
बारामती – राज्यात चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अपात्र ठरत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये परीक्षेचा अर्ज केलेल्या उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया सध्या चालू आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, पोलीस वाहनचालक पद आणि राज्य राखीव दल पोलीस शिपाई अशा एकूण ५ सहस्र २९७ पदांसाठी भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे; मात्र या प्रक्रियेत वाहन चालवण्याचा वैध परवाना नसणे, विविध मुदतीमधील ‘नॉन क्रिमीलिअर’ प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र आदिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) नसणे, तसेच विमुक्त जाती अ, भटक्या जमाती क आणि ड प्रवर्गाला जागा नसतांनाही त्या प्रवर्गातून अर्ज भरणे इत्यादी कारणांनी मोठ्या संख्येने उमेदवार पोलीस भरतीच्या कागदपत्र तपासणीतून बाहेर पडत आहेत.
पोलीस वाहनचालक पदांच्या भरती प्रक्रियेत वाहन परवान्याच्या मुदतीच्या संदर्भात अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना सूचना दिल्या असत्या, तर त्यांनी या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला नसता, तसेच एखाद्या प्रवर्गाला जागा नसतांना अर्ज आणि शुल्क रक्कम स्वीकारली जायला नको होती किंवा त्या प्रवर्गाला खुल्या प्रवर्गात सामावून भरतीची संधी देणे आवश्यक होते, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.