माण नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक !

सातारा, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – सातारा-म्हसवड-लातूर महामार्गावरील माण नदीवरील जुन्या पुलाचे रुंदीकरणाचे काम अपूर्णावस्थेत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. अप्रिय घटना घडल्यानंतर प्रशासन हा पूल पूर्ण करणार आहे का ? असा प्रश्न संतप्त म्हसवडवासिय विचारत आहेत.

३ वर्षांपूर्वी या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. प्रारंभी जुना पूल पाडून नवीन पूल निर्माण करण्याचे ठरले; मात्र अवाढव्य बांधकाम व्ययामुळे जुना पूल रुंद करून उपयोगात आणण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. मधल्या काळात कोरोनामुळे पुलाचे काम कधी बंद, तर कधी चालू अशा स्थितीमध्ये होत राहिले. त्यामुळे अद्यापही या पुलाचे काम अपूर्णावस्थेतच आहे. सध्या काम बंद असून पुलाच्या दोन्ही टोकांना पूल अरुंदच राहिलेला आहे. त्यामुळे एकावेळी एकच वाहन पुलावरून ये-जा करू शकत आहे. काही वेळा वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या संरक्षक कठड्यांचेही काम अपूर्ण आहे, तसेच पुलाचे मधल्या भागातील रुंदीकरण पूर्ण झाले असले, तरी मुरूम, दगड, माती आहे तिथेच ठेवल्यामुळे पुलावर दीड-दोन फुटांचे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी म्हसवडवासिय करत आहेत.