मये भूविमोचन कृती समिती विधानसभेची निवडणूक लढवणार

डिचोली, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – मये येथील स्थलांतरित मालमत्ता प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी शासनाने कायदा करूनही स्थानिकांना अद्याप भूमीचे हक्क मिळालेले नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत. त्यामुळे यापुढे कुणावरही अवलंबून न रहाता ‘मये भूविमोचन नागरिक कृती समिती’ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वत:चा उमेदवार उभा करणार आहे, अशी घोषणा ‘मये भूविमोचन नागरिक कृती समिती’च्या पदाधिकार्‍यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला समितीचे सखाराम पेडणेकर, यशवंत कारबोटकर, हरिश्चंद्र च्यारी, कालिदास कवळेकर, राजेश कळंगुटकर आदींची
उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत सखाराम पेडणेकर म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी जनता दरबारातील भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्वरित विशेष गट पाठवून मयेवासियांना सनदी देण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेश दिले होते; मात्र याविषयी अजूनही पुढे काहीच झालेले नाही. मये प्रश्नावर मी गेले ५० दिवस स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहे; मात्र अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.’’ राजेश कळंगुटकर म्हणाले, ‘‘मये येथील स्थालांतरित मालमत्तेचा प्रश्न भिजत ठेवून कुणाला स्वार्थ साधायचा आहे ? सरकारने याविषयी भूमिका स्पष्ट करावी.’’ मयेप्रश्नी लोकप्रतिनिधींनी स्थानिकांना गृहीत धरू नये अन्यथा ‘आगामी काळात मोठे आंदोलन उभारणे’ यासारखे पर्याय मयेवासीय अवलंबणार आहेत, अशी चेतावणी या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.