श्राद्ध-पक्ष करण्यामागील कार्यकारणभाव, त्यामुळे मनुष्याला होणारे लाभ आणि न केल्यास होणारा परिणाम !
१. माता-पित्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर प्रतिवर्षी ‘श्राद्धकर्म करणे’, हे योग्य आणि शास्त्रसंमत असणे
‘श्राद्धकर्म हे आवश्यक आणि शास्त्रसंमत कर्म आहे. सध्याच्या काळातील लोकांना वाटते, ‘जी गोष्ट त्यांना समजते, तीच केवळ सत्य असते आणि जो विषय त्यांच्या बुद्धीला समजण्याच्या पलीकडचा असेल, तो चुकीचा आहे.’ कलियुगातील बहुतांशी लोक अत्यंत स्वार्थी झाले आहेत. ते आपल्या मित्र-मैत्रिणींना वारंवार घरी भोजनासाठी निमंत्रित करतात; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच लोकांना श्राद्धकर्मासाठी एका ब्राह्मणाला भोजन घालणे फार जड वाटते. ‘जीवनभर सेवा करूनसुद्धा ज्यांचे ऋण फिटत नाहीत, अशा माता-पित्यांसाठी त्यांच्या मृत्यूनंतर श्राद्धकर्म करत रहाणे’, आवश्यक असते.
२. श्राद्ध केल्याने होणारे लाभ
२ अ. श्राद्ध केल्यामुळे विश्वेदेवगण आणि पितृगण तृप्त होऊन वंशजांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असणे : शास्त्रामध्ये मनुष्यासाठी देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण ही तीन ऋणे सांगितली आहेत. प्रतिवर्षी श्राद्ध केल्याने आपण पितृऋणातून मुक्त होतो. विष्णुपुराणात म्हटले आहे, ‘श्राद्धामुळे पितृगण तृप्त होऊन आपल्या वंशजांच्या समस्त इच्छा पूर्ण करतात.’ (३/१५/५१) ‘तसेच श्राद्धकर्त्यांवर विश्वेदेवगण, पितृगण आणि कुटुंबीय हे सर्व जण संतुष्ट होतात.’ (३/१५/५४) पितृपक्षात महाराष्ट्रात प्रचलित अमावास्यांत चांद्रमान पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्षात आणि उत्तर भारतात प्रचलित पौर्णिमांत चांद्रमान पंचांगानुसार आश्विन शुक्ल पक्षात पितृगण श्राद्ध ग्रहण करण्यासाठी येतात अन् श्राद्धान्न मिळाल्यावर ते प्रसन्न होतात.
२ आ. पितरांना उच्च गती मिळाली असेल, तर वंशजाने केलेले श्राद्ध व्यर्थ न होता, त्याचा लाभ वंशजांना पुण्यरूपाने होणे : काहींना वाटते, ‘पितर आनंदच आनंद असणार्या परमधामात असतील, तर तिथे त्यांना कशाचीही आवश्यकता नसते. अशा वेळी त्यांच्यासाठी करण्यात आलेले श्राद्ध व्यर्थ होते का ?’ असे नसते. जसे आपण दुसर्या शहरात असणार्या एखाद्या व्यक्तीला काही पैसे पाठवतो; परंतु पैसे तिथे पोचल्यानंतर समजते की, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तेव्हा ते पैसे पाठवणार्याला, म्हणजेच आपल्याला परत मिळतात. तसेच परमधामवासी पितरांच्या नावाने करण्यात आलेले श्राद्धकर्म पुण्यरूपाने आपल्यालाच मिळते; म्हणून आम्हाला श्राद्धाचा लाभ सर्व प्रकारे नक्कीच होतो.
३. श्राद्धान्न पितरांना कसे पोचते ?
३ अ. श्राद्धान्नाचा सूक्ष्म अंश सूर्यप्रकाशाद्वारे सूर्यलोकांत जाऊन तिथून तो श्राद्धकर्त्याच्या इच्छेनुसार कुठल्याही योनीमध्ये असणार्या त्याच्या पितरांना प्राप्त होत असणे : आपण पत्रावर इच्छित व्यक्तीचे नाव आणि पत्ता लिहून ते पत्रपेटीत टाकले, तर ते त्या व्यक्तीला ती व्यक्ती जिथे कुठे असेल, तिथे अवश्य मिळते. त्याचप्रमाणे श्राद्धविधीमध्ये ज्यांचा नामोच्चार करण्यात येतो, त्या पितरांना ते कुठल्याही योनीमध्ये असतील, तरी श्राद्धाचा लाभ होतो. ज्याप्रकारे सर्व पत्रे पहिल्यांदा टपाल खात्याच्या प्रमुख कार्यालयात गोळा केली जातात आणि नंतर त्याचे वर्गीकरण करून ती योग्य ठिकाणी पोचवली जातात. त्याच प्रकारे श्राद्धकर्मात अर्पित पदार्थांचा सूक्ष्म अंश सूर्यप्रकाशाद्वारे सूर्यलोकांमध्ये पोचवला जातो. तेथे वर्गीकरण करून तो आपल्या इच्छित पितरांना प्राप्त होतो.
३ आ. श्राद्धान्नातील स्थूल अंश ब्राह्मण, तर सूक्ष्म अंश पितर ग्रहण करत असणे : पितृपक्षात विद्वान ब्राह्मणांद्वारे पितरांना येण्यासाठी आवाहन केल्यानंतर ते स्वतः श्राद्धासाठी बसलेल्या ब्राह्मणाच्या शरिरात सूक्ष्म रूपाने प्रवेश करतात. अन्नाचा स्थूल अंश ब्राह्मण ग्रहण करतो आणि त्या अन्नातील सूक्ष्म अंश आपले पितर ग्रहण करतात.
३ इ. पितरांना श्रद्धापूर्वक अर्पित केलेले श्राद्धान्न त्यांच्या योनीनुसार सूक्ष्म रूपातून प्राप्त होत असणे : विदेशात आपण जेवढे रुपये पाठवतो, तेवढ्याच रुपयांचे त्या देशानुसार विभिन्न चलनात रूपांतर होऊन इच्छित व्यक्तीला प्राप्त होतात. त्याचप्रमाणे पितर पशूयोनीमध्ये असतील, तर पितृगणांना त्या योनीनुसार आवश्यक असणारा योग्य आहार श्रद्धापूर्वक अर्पित केलेल्या श्राद्धान्नातून मिळतो.
४. श्राद्ध न करण्याने वंशजांवर होणारे परिणाम
पितरांना श्राद्धान्न न मिळाल्यास ते अत्यंत निराश होऊन शाप देऊन निघून जातात. पितृगण म्हणतात, ‘आमच्या कुळामध्ये असा कुणी बुद्धीमान धन्य (धार्मिक) पुरुष उत्पन्न होईल का ? जो धनाच्या लोभाचा त्याग करून आमच्यासाठी पिंडदान करील ?’ (३/१४/२२) विष्णुपुराणामध्ये श्राद्धकर्माचे सांगितलेले हे सोप्यात सोपे उपाय आहेत.’
– श्री. राजेंद्रकुमारजी धवन
(साभार : ‘कल्याण’, सप्टेंबर २०१७)