श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची अमृतवाणी !
१. कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करणे
‘एखाद्या व्यक्तीची स्तुती होत असतांना तिला वाटते, ‘माझीच स्तुती होत आहे.’ त्यामुळे तिचा अहं सुखावतो. खरेतर ते कार्य तिच्यातील आत्मशक्तीद्वारे (चैतन्यशक्तीद्वारे), म्हणजेच भगवंतामुळे घडलेले असते. त्यामुळे ‘स्तुती त्या भगवंताची असते’, याची जाणीव ठेवल्यास (म्हणजेच त्याची स्तुती त्यालाच अर्पण केल्यास) आनंद मिळेल आणि अहंही वाढणार नाही. यासाठीच अध्यात्मात त्यागाला महत्त्व आहे.
२. साधना
अ. चैतन्यालाच महत्त्व असल्याने त्याच्याद्वारेच कार्य करायचे. सनातन धर्माचा प्रचार, म्हणजे चैतन्याचा प्रचार !
आ. ‘कितीही संघर्ष करावा लागला, तरी ‘मला देवच हवा आहे. तोच मला परिस्थितीतून बाहेर काढणार आहे’, हा विचार कायम लक्षात ठेवावा.
इ. आपल्या बुद्धीचा निश्चय झाला नसल्यामुळे साधनेत सातत्य नसते. मन, चित्त, बुद्धी आणि अहं या प्रत्येकाचे कार्य ठरलेले आहे. मनाचे कार्य ‘संकल्प आणि विकल्प निर्माण करणे’, हे आहे. विकल्पामुळे अडचणी येतात. मनोलय झाल्यावरच मनातील सर्व विकल्प संपतील. मनोलय होण्यासाठी साधना, म्हणजे नामजप करणे, सत्संगात जाणे, सत्सेवा करणे आणि सत्साठी त्याग करणे, म्हणजेच ‘गुरुकृपायोगानुसार साधना करणे’ इत्यादी आवश्यक आहे.
ई. साधना योग्य असेल, तर परिस्थिती कशीही असली, तरी आपण आनंदीच असतो.
उ. पुष्कळ त्रासामुळे जीवनात सातत्याने भोग भोगावे लागत असतील; तर आपली निवड भगवंताने भोग भोगण्यासाठी केली आहे, म्हणजेच ‘त्याने भोग भोगण्यासाठी का होईना आपल्याला माध्यम म्हणून निवडले आहे’, याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटायला हवी.’
– सौ. प्रियांका राजहंस (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२६.४.२०२०)