सामाजिक माध्यमांतून युवतींची छायाचित्रे किंवा ‘व्हिडिओ’ यांचा गैरवापर करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्याच्या वाढत्या घटना !

धर्मशिक्षणाअभावी समाजाची नैतिकता ढासळल्याचे हे उदाहरण आहे !

प्रतीकात्मक छायाचित्र

पणजी, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – युवतींची सामाजिक माध्यमांतील छायाचित्रे किंवा ‘व्हिडिओ’ यांचा गैरवापर करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. सामाजिक माध्यमांचा वापर करतांना सावधगिरी बाळगणे (स्वत:चा अकाऊंट खासगी ठेवणे), स्वत:चे ‘लोकेशन’ (आपण असलेल्या जागेची माहिती) सामाजिक माध्यमांना न देणे आणि स्वत:च्या अनुमतीविना आपले एखादे छायाचित्र किंवा व्हिडिओ यांचा गैरवापर झाल्यास त्याविरोधात त्वरित तक्रार करणे आदी सावधगिरी बाळगल्यास ‘सायबर गुन्ह्यां’मध्ये घट होऊ शकते, अशी माहिती राष्ट्रीय आणि गोवा राज्य महिला आयोग यांनी ‘महिलांसाठी ‘ऑनलाईन’ सुरक्षा’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘सायबर पीस फाऊंडेशन’ या संघटनेने दिली.

या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या गावडे म्हणाल्या, ‘‘माझ्या अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कारकीर्दीत ‘सायबर गुन्ह्यां’विषयीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये महिला आणि बालक हे पीडित आहेत. अनेक प्रकरणांत महिला अथवा युवती यांची छायाचित्रे किंवा ‘व्हिडिओ’ यांचा त्यांच्या अनुमतीविना वापर करण्यात आला आहे.’’

‘सायबर पीस फाऊंडेशन’च्या व्यवस्थापक जॅनीस वर्गीस म्हणाल्या, ‘‘एखादी महिला किंवा युवती ‘सायबर गुन्ह्या’द्वारे फसवली गेल्यास त्यांना त्वरित दोषी धरू नये. त्यांनी तिचा मित्र किंवा प्रियकर यांच्यावर विश्वास ठेवून तिची छायाचित्रे किंवा व्हिडिओ त्यांना पाठवलेले असतात. या प्रकरणामध्ये महिला किंवा युवती यांना ‘ब्लॅकमेल’ करणारा खरा दोषी आहे. ‘सायबर गुन्ह्या’वरून ‘सायबर पीस फाऊंडेशन’ला मध्यरात्रीसुद्धा तक्रारीसाठी संपर्क साधला जातो. एका २२ वर्षीय युवतीची छायाचित्रे तिच्या पहिल्या प्रियकराने २३ अश्लील संकेतस्थळांना पाठवली होती. युवतीने ‘सायबर पीस फाऊंडेशन’कडे तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रियकराचा शोध घेऊन त्याच्या विरोधात कारवाई केली आणि युवतीची छायाचित्रे सर्व २३ अश्लील संकेतस्थळांवरून हटवण्यात आली. ‘सायबर गुन्ह्या’द्वारे फसवल्या गेलेल्या महिलांनी हताश न होता त्वरित तक्रार प्रविष्ट करावी. यासाठी ९५७०००००६६ किंवा helpline@cyberpeace.net यांचा वापर करावा.’’