पुणे येथील चतुःशृंगी मंदिरात कोरोनाविषयक नियमांचे पालन करून घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
पुणे, ४ ऑक्टोबर – येथील चतुःशृंगीदेवीच्या मंदिरात घटस्थापनेपासून म्हणजेच येत्या ७ ते १५ ऑक्टोबरपर्यंत (विजयादशमीपर्यंत) शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष श्री. नितीन अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त श्री. श्रीधर अनगळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. श्री. दिलीप अनगळ हे या वर्षीचे मंदिर व्यवस्थापक असून नारायण कानडेगुरुजी पौरोहित्य करणार आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून देवस्थानच्या वतीने रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. कोरोनाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करून मंदिर सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले रहाणार आहे. तसेच ‘ऑनलाईन’ दर्शनासाठी देवस्थानाच्या वतीने विशेष सोय करण्यात आलेली आहे.
७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ८ वाजता अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना करण्यात येणार असून, प्रतिदिन सकाळी १० आणि रात्री ८ वाजता महाआरती करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबर या दिवशी विजयादशमीनिमित्त संध्याकाळी ५ वाजता मंदिर परिसरात विश्वस्त आणि सेवक यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने सीमोल्लंघनाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.