अतीव श्रद्धेने धर्माचरण करणार्या आणि आनंदी राहून कर्तव्ये पार पाडणार्या तिरोडा (जिल्हा गोंदिया) येथील कै. (सौ.) विजयाबाई भोंदेकर (वय ६२ वर्षे) !
२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…
‘माझी आई, म्हणजे कै. (सौ.) विजयाबाई भोंदेकर ही धर्मनिष्ठ, कर्तव्यपरायण, त्यागी वृत्तीची, या कलियुगातही पतिव्रता धर्माचे कठोरतेने पालन करणारी आणि सतत देवाच्या अनुसंधानात असणारी होती. तिने जीवनातील अनेक कठीण प्रसंगांतही स्थिर आणि आनंदी राहून सर्व कर्तव्ये पार पाडली. आईत ‘साधेपणा, भोळेपणा, प्रामाणिकपणा, आज्ञापालन करणे, सतत उद्योगी रहाणे, प्रेमभाव, परोपकारी वृत्ती आणि सतत वर्तमानकाळात रहाणे’, असे अनेक गुण होते.
श्रावण शुक्ल पक्ष द्वादशी (१२.८.२०१९) या दिवशी तिचे निधन झाले. १९.८.२०२१ या दिवशी तिचे द्वितीय पुण्यस्मरण (दुसरे वर्षश्राद्ध) झाले. त्यानिमित्ताने मला जाणवलेली कै. आईची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसार करून मुलांना शिक्षण शिकवणे
आईच्या ४५ वर्षांच्या वैवाहिक जीवनात तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसार केला. आईने घरातील सर्व कामे करून बाहेरच्या लोकांचे कपडे शिवले आणि पुष्कळ परिश्रम करून घरची परिस्थिती सांभाळली. त्यामुळेच आम्ही चारही भावंडे उच्च शिक्षण घेऊ शकलो. मी आईला कुणाची निंदा करतांना किंवा वेळ वाया घालवतांना पाहिले नाही.
२. आईची धर्मनिष्ठ आणि कर्तव्यपरायण वृत्ती
२ अ. पतिव्रता धर्माचे पालन करतांना आईने वडिलांच्या आज्ञेनुसार प्रत्येक कर्म करणे : आईने जीवनभर पतिव्रता धर्माचे कठोरतेने पालन केले. ‘पती हाच परमेश्वर’, असा आईचा भाव होता. त्यामुळे आईने माझ्या वडिलांच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले. ती प्रत्येक कर्म वडिलांना विचारून करायची. सण-व्रत असलेल्या दिवशी आई वडिलांचे पाय धुवून, त्यांचे औक्षण करून नित्य नेमाने वडिलांना नमस्कार करायची. सध्याच्या कलियुगात असे पहायला मिळणेही अत्यंत दुर्लभ आहे.
२ आ. आईने श्रद्धेने अनेक व्रतवैकल्ये करणे आणि तिने केलेल्या ‘कोकिळा व्रता’च्या उद्यापनाच्या वेळी छायाचित्रात ‘यज्ञकुंडातील अग्नीच्या ज्वाळांत ‘कोकिळामाता आहुती ग्रहण करत आहे’, असे दिसणे : आईने अनेक प्रकारची व्रते, उदा. सोळा सोमवार, संकष्ट चतुर्थीचे व्रत अशी अनेक व्रते अत्यंत श्रद्धापूर्वक केली. वर्ष २०१५ मध्ये तिने ‘कोकिळा व्रत’ हे व्रत दृढ श्रद्धेने केले. (हे व्रत पतीसुख आणि सर्व प्रकारचे वैभव प्राप्त करून देते. हे व्रत प्रती १९ वर्षांनी येणार्या अधिक आषाढ मासात येते.) या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी घेतलेल्या छायाचित्रात यज्ञकुंडातील अग्नीच्या ज्वाळांमध्ये ‘कोकिळामाता आहुती ग्रहण करत आहे’, असे दिसले. आईतील उच्च प्रतीच्या भावामुळे ही अनुभूती आली, असे मला जाणवले.
२ इ. ग्रंथांचे पारायण करणे : आईने विवाहानंतर २५ वर्षे अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. आईची शेगावच्या गजानन महाराजांवर दृढ श्रद्धा होती. त्यामुळे ती प्रत्येक गुरुवारी गजानन महाराजांच्या ग्रंथाचे पारायण करत असे.
२ ई. आईने केलेले तीर्थाटन : आईने सर्व तीर्थयात्रा केल्या होत्या. बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन, तसेच कठीण अशी अमरनाथ यात्राही देवाने तिच्याकडून करवून घेतली होती.
२ उ. ‘अतिथिदेवो भव ।’ हा भाव असल्याने कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचे मनापासून आदरातिथ्य करणारी आई ! : आईचा ‘अतिथिदेवो भव ।’, म्हणजे ‘अतिथीला देवासमान मानावे’, असा भाव असायचा.
१. गावात वारकरी, कीर्तनकार आणि संत प्रवचनाला यायचे. तेव्हा ती त्यांचे जेवण आणि अल्पाहार बनवण्याचे नियोजन करत असे.
२. कार्तिकी द्वादशीला गावातील पांडुरंगाच्या मंदिरातील आरती झाल्यानंतर आई सर्व वारकरी बांधवांचे भजन आणि भोजन यांचे नियोजन करायची. त्यासाठी ती पहाटे ४ वाजता उठून स्वयंपाक करत असे. तेव्हा विठ्ठलनामाने आमचे घर दुमदुमत असे आणि सर्वत्र आनंदी आनंद होत असे.
३. आई करत असलेली साधना
आईने वर्ष १९९९ मध्ये पूज्यपाद संतश्री आसारामबापूजी यांच्याकडून गुरुमंत्र घेतला होता. ती सेवा आणि साधना करत सतत नामजप करायची. नामजपामुळे तिच्या जीवनात आनंद आणि स्थिरता येऊ लागली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही धर्माचरण आणि साधना यांमुळे आई स्थिर होती.
४. साधकाला आणि त्याच्या आईला रामनाथी, गोवा येथे परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभणे, गुरुदेवांनी आईचे पुष्कळ कौतुक करणे अन् सत्संग मिळाल्यामुळे आई आनंदी होणे
पूर्वी एकदा आम्हाला (मला आणि आईला) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचा योग आला. तेव्हा ‘हिंदु राष्ट्रा’चे प्रणेते विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन आम्हाला त्यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी आईचे पुष्कळ कौतुक केले. ते आईला म्हणाले, ‘‘तुम्ही जीवनातील सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत. तुमचे जीवन धन्य झाले आहे. तुम्ही तुमच्या गुरुमंत्राचा सतत जप करत रहा !’’ आईला परात्पर गुरुदेवांचे दर्शन आणि सत्संग मिळाल्यामुळे ती आनंदी झाली. त्या वेळी ‘देवाने वैकुंठात आणून माझे जीवन धन्य केले’, असे आईला वाटले. तिने सनातनच्या सर्व संतांना भावपूर्ण नमस्कार केला.
५. साधकाच्या नाडीपट्टीत ‘त्याची आई कठीण प्रारब्ध भोगत असून तिला श्री गुरूंची कृपा प्राप्त झाली आहे आणि तिला आता पुन्हा जन्म नाही’, असे लिहिलेले असणे
आईची प्रकृती बरी नसतांना मे २०१९ मध्ये मी पुण्याचे प्रसिद्ध नाडीपट्टी वाचक श्री. मुदलीयार गुरुजी यांच्याकडे जाऊन माझ्या नाडीपट्टीचे वाचन करून घेतले होते. त्यांनी सांगितले, ‘‘सध्या तुमच्या आईची स्थिती अत्यंत गंभीर आहे. ती कठीण प्रारब्ध भोगत आहे. आई पुण्यात्मा आणि धर्मात्मा आहे. तुमच्या आईने जीवनातील सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत. तिला १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले आहे आणि श्री गुरूंची कृपाही प्राप्त झाली आहे. त्यामुळे आईचा हा शेवटचा जन्म असून तिला आता मोक्षप्राप्ती होणार आहे.’’ हे ऐकून माझा भाव जागृत झाला. मला महर्षींच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
६. आईचे आजारपण आणि निधन
आईला फुप्फुसांचा एक आजार झाल्यामुळे तिच्या फुप्फुसांची कार्यक्षमता न्यून झाली होती. त्यामुळे आईला श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होत होता. ते तिचे तीव्र प्रारब्ध होते. तिचा त्रास वाढतच होता, तरीही ती नामस्मरण करत स्थिर आणि आनंदी रहायची. आईची स्थिती आणखी गंभीर होऊन १२.८.२०१९ या दिवशी तिचे निधन झाले.
७. आईच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
मृत्यूनंतर आईचा तोंडवळा पिवळसर दिसत होता. आम्ही तिचे अंतिम विधी श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावनतीरावर शास्त्रोक्त पद्धतीने केले.
गुरुकृपेमुळे हे सर्व लिहिण्याची मला प्रेरणा मिळाली. यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘कै. आईची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होऊन तिला उत्तम सद्गती प्राप्त होवो आणि तिची मोक्षपदाकडे वाटचाल होवो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना !’
– श्री. रवींद्र भोंदेकर (मुलगा), तिरोडा, जिल्हा गोंदिया. (१९.८.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |