श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद असूनही मंदिर समितीने छुप्या पद्धतीने लोकांना दर्शनासाठी आत सोडले ! – गणेश लंके, अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या विरुद्ध शहर पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट !
सरकारीकरण झालेल्या मंदिरात नियमांचा असाच फज्जा उडणार यात शंकाच नाही; म्हणून मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे ! – संपादक
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ४ ऑक्टोबर (वार्ता.) – मागील दीड वर्षापासून राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभरातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत; मात्र शेकडो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करून मुखदर्शन घेत असल्याचे ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’च्या निदर्शनास आले आहे. यापूर्वीही दळणवळण बंदी किंवा संचारबंदीच्या काळात छुप्या पद्धतीने लोकांना दर्शनासाठी सोडण्यात आले आहे. हा प्रकार शासनाच्या नियमांची पायमल्ली करणारा आहे. त्यामुळे यासंदर्भात रितसर चौकशी करून दोषींवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’चे अध्यक्ष श्री. गणेश लंके यांनी शहर पोलिसांकडे केली आहे.
१. तक्रारीत गणेश लंके यांनी म्हटले आहे की, राज्यातील मंदिरे ७ ऑक्टोबर या दिवशी उघडण्यात येणार आहेत; मात्र त्यापूर्वीच शेकडो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करून मुखदर्शन घेत आहेत. हा सरळ सरळ शासनाच्या नियमांचा भंग असून सर्वसामान्य भाविक दर्शनासाठी व्याकूळ असतांना अनेकदा मागणी करूनही मंदिरे उघडण्याचा कोणताही प्रयत्न किंवा तसा प्रस्ताव मंदिर समिती व्यवस्थापनाने शासनाकडे केला नाही.
२. मंदिरात सर्वत्र ‘सीसीटीव्ही’ कॅमरा बसवण्यात आले आहेत; मात्र तरीही वशिल्याने लोकांना दर्शनासाठी सोडले जात आहे. काही मासांपूर्वी एका समितीच्या सदस्यावर अशा पद्धतीने लोकांना दर्शनासाठी सोडल्याचा आरोप होऊन त्यांना समितीचे सदस्यपद सोडावे लागले होते.