पितृदोष दूर होण्यासाठी करावयाचे उपाय आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे महत्त्व !
१. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाने मंद आणि मध्यम स्वरूपांचे पितृदोष दूर होणे; पण तीव्र स्वरूपाचा पितृदोष न्यून होण्यासाठी दत्तक्षेत्री नामजप किंवा संतांच्या कार्यात तन, मन अन् धन अर्पण करणे आवश्यक !
‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा ‘दत्तात्रेय’ या देवतेचा नामजप आहे. हा नामजप केल्यामुळे मंद आणि मध्यम स्वरूपांचे पितृदोष निश्चितच दूर होऊ शकतात. ‘ज्यांना तीव्र स्वरूपाचा पितृदोष आहे, त्यांना सहा घंटे बसून नामजप करणे कठीण होते’, असे आढळते. अशा परिस्थितीत कोणत्याही दत्तक्षेत्री राहून तेथे नामजप केल्यास आणि तेथील दत्तात्रेयाच्या मंदिरात सेवा केल्यास चांगला लाभ होतो. हे शक्य नसेल, तर आपल्या जवळपास असलेल्या कोणत्याही संतांची सेवा करावी, त्यांच्या कार्यात तन, मन आणि धन यांचे योगदान द्यावे किंवा कोणत्याही संतांच्या मार्गदर्शनाखाली धर्मप्रसाराची सेवा करावी. यामुळे गुरु किंवा ईश्वर यांची कृपा होते आणि तीव्र स्वरूपाचा पितृदोष न्यून होतो. दत्तात्रेय हे ‘पितृलोकाचे स्वामी आहेत’, असे मानले जाते. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ नामजपाने पितृदोष शीघ्रतेने न्यून होतो.
२. नामजपासह वैदिक सनातन धर्मात सांगितलेले पितृकर्म करणेही आवश्यक !
एक गोष्ट लक्षात ठेवावी की, नामजपासह वैदिक सनातन धर्मात कर्मकांडाच्या अंतर्गत जे पितृकर्म करायला सांगितले आहे, उदा. नित्य स्नानांग तर्पण (स्नानानंतर केले जाणारे तर्पण), मासिक, वार्षिक आणि पार्वण श्राद्धे हीसुद्धा करायलाच हवीत.
३. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाच्या संदर्भात जिज्ञासूंचे प्रश्न आणि उत्तरे
३ अ. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाला ‘ॐ’ लावू शकतो का ?
उत्तर : ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाला पुढील परिस्थितीत ‘ॐ’ लावू शकतो.
अ. एखाद्याचा आध्यात्मिक स्तर ६० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तर तो या नामजपाला ‘ॐ’ लावून नामजप करू शकतो, उदा. ‘ॐ श्री गुरुदेव दत्त ।’
आ. एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ३५ ते ६० टक्क्यांपर्यंत असेल आणि तिच्या घरात पितृदोषामुळे अधिक त्रास होत असेल, तर ती व्यक्तीसुद्धा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाला ‘ॐ’ लावू शकते. त्रास न्यून झाल्यावर ‘ॐ’ न लावता नामजप करावा.
इ. वर्तमानकाळात बहुतेक लोकांना मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पितृदोष असतो. अशा वेळी त्यांनी ‘ॐ श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या त्रासाची तीव्रता अधिक असेल, तिचा अजपाजप (नामजप अखंड चालू असणे) चालू असेल किंवा ती व्यक्ती सत्सेवा करत असेल, तर तिने ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप करावा.
३ आ. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप मनातल्या मनात करावा कि मोठ्याने करावा ?
उत्तर :
१. नामजप मोठ्याने करण्यापेक्षा तो मनातल्या मनात करणे उत्तम; कारण या नामजपाचा अंतर्मनात शीघ्रतेने संस्कार होऊ लागतो. पुढे पुढे निर्विचार अवस्थेत जाण्यासाठी तो साहाय्यक होतो.
२. घरात पितृदोषाची तीव्रता अधिक असेल, तर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्याची इच्छा होत नाही. तो करतांना ‘झोप येणे किंवा अनावश्यक विचार येणे’, असे त्रास होतात. नामजप एकाग्रतेने होत नसेल, तर त्याचा अधिक लाभ होत नाही. अशा स्थितीत मोठ्याने नामजप करणे अधिक चांगले असते.’
(साभार : मासिक, ‘वैदिक उपासना’, नोव्हेंबर २०१९)