लखीमपूर खेरी येथे कथित शेतकर्यांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ९ जण ठार !
|
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात ३ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या हिंसक घटनेमध्ये भाजपच्या ४ कार्यकर्त्यांसह ९ जण ठार झाले. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि केंद्रीय राज्य गृहमंत्री अजय मिश्रा हे जिल्ह्यातील तिकुनिया गावाजवळ एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हा काही शेतकर्यांनी केंद्रशासनाच्या ३ कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तेव्हा मंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक केल्यावर वाहनचालकाला दगड लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. या वाहनाखाली ४ शेतकरी चिरडून ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचारात घायाळ झालेल्या एका पत्रकाराचाही मृत्यू झाला.
१. सरकारी वाहनाखाली शेतकरी चिरडले गेल्यानंतर हिंसक झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या जमावाने भाजपच्या ४ कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करून ठार मारले.
२. आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या एका चारचाकी वाहनाला आग लावली असून या हिंसक घटनेचे विविध व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना काठ्यांनी मारले जात असल्याचे दिसत आहे.
३. या प्रकरणात केंद्रीय राज्य गृहमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी विशेष कृतीदल स्थापन करण्यात आले आहे.
४. शेतकर्यांची संघटना ‘संयुक्त किसान मोर्च्या’ने मात्र यामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा हात असून तो असलेल्या गाडीखाली शेतकरी येऊन मारले गेले, असा आरोप केला आहे.
५. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेला दुर्दैवी म्हटले असून घटनेच्या मुळाशी जाऊन त्यात सहभागी असणार्या सर्व घटकांना समोर आणले जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
अनेक नेते कह्यात !
या प्रकरणानंतर लखीमपूर खेरी पासून लक्ष्मणपुरीपर्यंत अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला. लखीमपूरच्या दिशेने जाणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव, राम गोपाल यादव, ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख रुपयांची हानीभरपाई !
राज्य प्रशासन आणि शेतकरी यांच्या झालेल्या चर्चेनंतर ८ दिवसांत आरोपींना अटक करणे, मृत शेतकर्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख रुपये देणे, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, घायाळांना प्रत्येकी १० लाख रुपये, तसेच या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.