कायदा हातात घेणार्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करा ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री यांची चेतावणी
शिरूर (पुणे) – येथील तरुण बांधकाम व्यावसायिक आदित्य चोपडा यांच्या संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शहरातील अनेक संघटनांनी निवेदने देऊन हा हत्येचा प्रकार असून हल्लेखोरांना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर पवार यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाचे तातडीने अन्वेषण करण्याचे आदेश दिले, तसेच शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचे दायित्व पोलिसांचे असून शांतता भंग करणार्यांना तसेच कायदा सुव्यवस्था हातात घेऊन बेकायदेशीर गोष्टी करणार्यांना मोकळे सोडू नका. कुणी अविचारी तरुण कायदा हातात घेऊन अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याविरुद्ध कडक कारवाई करा, अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिली. फोफावणार्या चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीसयंत्रणा सक्षम झाली पाहिजे. औद्योगिक वसाहती मधील चुकीची ठेकेदारी आणि वाळू माफिया यांचा बंदोबस्त करा. दारू भट्ट्या किंवा चुकीचे व्यवसाय करणार्यांचा बीमोड करा, यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य करू, असे आश्वासनही पवार यांनी या वेळी दिले.