अवैध व्यवसायांना आळा घालणार्‍या कर्तव्यदक्ष पोलिसांचे स्थानांतर करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ! – प्रसाद गावडे, तालुकाध्यक्ष, मनसे

कर्तव्यदक्ष पोलीस असतील, तर लाच खायला अडचण येते; म्हणून अशा पोलिसांचे स्थानांतर करण्यात येते, असे जनतेला वाटल्यास त्यात चूक काय ?

कुडाळ – तालुक्यातील माणगाव खोर्‍यातील अवैध व्यवसायांना चाप बसवणार्‍या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचार्‍याचे तडकाफडकी स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशा प्रकारे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचार्‍यांचे ‘स्थानांतर’ करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात येत आहे. संबंधित कर्मचार्‍याची स्थानांतराची प्रक्रिया न थांबवल्यास मनसे आंदोलन करेल, अशी चेतावणी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

माणगाव खोर्‍यात अलीकडच्या काळात मद्यविक्री, मटका, जुगार आदी व्यवसाय अवैधरित्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. याच्या विरोधात मनसेने नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या २ मासांत माणगाव खोर्‍यात अशा अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक पोलिसांना यश येत होते; मात्र प्राप्त माहितीनुसार माणगाव खोर्‍यातील अवैध व्यवसाय करणार्‍यांनी संबंधित पोलीस कर्मचार्‍याचे स्थानांतर करण्यासाठी प्रयत्न चालू केल्याचे समजते.

अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे अशा व्यवसायांवर कारवाई होणे आवश्यक आहे. असे असतांना अवैध व्यवसायांच्या विरोधात कडक भूमिका घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍याचे स्थानांतर करून अशा कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून संबंधित कर्मचार्‍याच्या स्थानांतराची प्रक्रिया न थांबवल्यास प्रसंगी कुडाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.