प्रेमभाव आणि साधनेची आवड असणारा ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. शुद्धाक्ष समीर निब्रे (वय ४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. शुद्धाक्ष समीर निब्रे हा एक आहे !
(‘शुद्धाक्ष’ या नावाचा अर्थ : ‘शुद्धाक्ष’ हे द्वारकेतील श्रीकृष्ण मंदिराच्या पूर्वद्वाराचे नाव आहे.)
आज भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशी (४.१०.२०२१) या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील चि. शुद्धाक्ष समीर निब्रे याचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे वडील आणि त्याच्या आत्याचे यजमान यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. शुद्धाक्ष समीर निब्रे याला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
श्री. समीर निब्रे (चि. शुद्धाक्षचे वडील), डोंबिवली, ठाणे.
१. बाळाच्या जन्मापूर्वी
१ अ. कुलदेवीचे दर्शन घेऊन आल्यावर पत्नी गरोदर असल्याचे कळणे आणि ‘होणारे बाळ हे देवीचा प्रसादच आहे’, असा विचार मनात येणे : ‘जानेवारी २०१७ मध्ये आम्ही (मी आणि माझी पत्नी) आमची कुलदेवी ‘श्री भवानीदेवी’ हिच्या दर्शनाला गेलो होतो. त्यानंतर लगेचच मला पत्नी गरोदर असल्याची वार्ता कळली. तेव्हा आम्हा दोघांनाही पुष्कळ आनंद झाला आणि आमच्या मनात ‘होणारे बाळ हे देवीचा प्रसादच आहे’, असा विचार येऊन कृतज्ञता व्यक्त झाली.
१ आ. पत्नीला पहिले ५ मास पुष्कळ शारीरिक त्रास होणे आणि त्या काळात नामजपादी उपाय करतांना ‘गुरुकृपेमुळे सर्व चांगले होईल’, अशी श्रद्धा असल्याने पत्नीचा त्रास न्यून होणे : पहिले ५ मास पत्नीला रक्तस्राव होण्याचा पुष्कळ त्रास झाला. त्यामुळे तिला अनेक ‘इंजेक्शन्स’ आणि औषधे घ्यावी लागली. या काळात तिने सतत ‘नामस्मरण आणि प्रार्थना करणे, झोपतांना प्रतिदिन ‘रामरक्षास्तोत्र’ म्हणणे, उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवणे’ आदी सर्व उपाय केले. त्या वेळी ‘गुरुकृपेमुळे सर्वकाही चांगले होईल’, अशी आम्हा उभयतांची श्रद्धा होती. त्यामुळे कालांतराने पत्नीचा त्रास न्यून होत गेला आणि ईश्वरकृपेने बाळ सुखरूप राहिले.
२. जन्म
बाळाचा जन्म नैसर्गिकरित्या (शस्त्रकर्माविना) सुखरूप झाला.
२ अ. जन्म ते १ वर्ष
२ अ १. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आवडणे : जन्मापासूनच बाळाला (चि. शुद्धाक्षला) प.पू. बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) भजने आवडतात. तो झोपतांना रडायचा. तेव्हा आम्ही त्याला प.पू. बाबांची भजने ऐकवायचो. त्यामुळे तो लगेच शांत होऊन लक्षपूर्वक भजने ऐकायचा. इतर गाणी लावली, तर त्याचे रडणे थांबायचे नाही.
२ अ २. मोहक हास्याने सर्वांना आपलेसे करणारा शुद्धाक्ष ! : जन्मापासून सकाळी उठतांना शुद्धाक्ष नेहमी हसत हसत उठतो. त्याचे हास्य मोहक आहे. तो समोरच्या व्यक्तीला आपल्या हास्यानेच आपलेसे करून घेतो.
२ आ. वय – १ ते २ वर्षे
१. शुद्धाक्ष १ वर्षाचा असल्यापासून त्याला कुणाकडे जाण्यासाठी ओळख लागत नाही. कुणीही त्याला जवळ घेतले, तरी तो त्यांच्याकडे हसत जातो.
२. एकदा त्याला आमच्या घराजवळील गावदेवीच्या मंदिरात नेले होते. तेथे तो बराच वेळ शांतपणे मंदिराचे निरीक्षण करत होता. त्याला ‘घरी जाऊया’, असे म्हटले, तरी तो घरी येण्यास सिद्ध नव्हता.
२ इ. वय – २ ते ३ वर्षे
२ इ १. प्रेमभाव : शुद्धाक्षला घरात नवीन व्यक्ती किंवा पाहुणे आलेले आवडतात. तो त्यांना स्वतःहून ‘काका, आजोबा’ अशा नावांनी हाक मारतो. त्यामुळे भेटणार्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा लळा लागतो.
२ इ २. अनुकरणप्रिय
अ. आम्ही देवाला किंवा वडीलधार्या व्यक्तींना नमस्कार केल्यावर ते पाहून शुद्धाक्षही स्वतःहून डोके टेकून त्यांना नमस्कार करतो.
आ. मी आणि माझी आई दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा उदबत्ती यांनी स्वतःवरचे आवरण काढतो. त्या वेळी शुद्धाक्षही स्वतःवरील आवरण काढतो.
२ इ ३. साधनेची आवड
अ. तो सकाळी आजोबांना नामजप करण्याची आठवण करून देतो.
आ. शुद्धाक्षकडून काही चूक झाली आणि त्याला क्षमा मागायला सांगितले, तर तो लगेच क्षमा मागतो.
२ इ ४. शुद्धाक्षची जेवणाबाबत आवड-नावड अल्प आहे.
२ ई. वय – ३ ते ४ वर्षे
२ ई १. नामजप करणे : शुद्धाक्षला नामजप करायला सांगितल्यावर तो मोठ्या आवाजात श्री भवानीदेवी, श्री दत्तगुरु, श्री गणपति आणि श्रीकृष्ण या देवतांचा नामजप करतो.
२ ई २. स्तोत्रे आवडणे : शुद्धाक्षला स्तोत्रे ऐकण्याची आवड आहे. रात्री झोपतांना तो ‘हनुमान चालीसा आणि हनुमानस्तोत्र’ ऐकून झोपतो. तो दिवसभर स्तोत्रांतील त्याला आठवतील, त्या ओळी मोठ्याने म्हणत असतो. तो त्याच्या आजोबांना संध्याकाळी ‘बगलामुखीस्तोत्र’ लावण्याची आठवण करून देतो.
२ ई ३. परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाल्यावर शुद्धाक्षने उत्स्फूर्तपणे ‘पूज्य आले, पूज्य आले’, असे सांगणे : २३.७.२०२१ या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि त्यानिमित्ताने ‘ऑनलाईन’ कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सर्वांना ध्वनी-चित्रफीत दाखवण्यात आली. या ध्वनी-चित्रफितीत शुद्धाक्षला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्या वेळी तो उत्स्फूर्तपणे ‘पूज्य आले, पूज्य आले’, असे सगळ्यांना पुनःपुन्हा सांगू लागला.
२ ई ४. हनुमानबाप्पा आणि त्याची गदा आवडणे : शुद्धाक्षला हनुमानबाप्पा खूप आवडतो. एकदा मी त्याला खेळण्यातली गदा आणून दिली आणि ‘‘तुला ही गदा कुणी दिली ?’’, असे विचारले. तेव्हा त्याने उत्स्फूर्तपणे ‘‘हनुमानबाप्पाने गदा दिली’’, असे सांगितले. मधेमधे तो ‘हनुमानबाप्पा, मला तुझी गदा दे’, असे म्हणतो.
३. स्वभावदोष
हट्टीपणा करणे आणि राग येणे.’ (४.८.२०२१)
श्री. प्रसाद वडके (चि. शुद्धाक्षच्या आत्याचे पती), डोंबिवली, ठाणे.
शुद्धाक्ष रडत असतांना त्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे प्रेरणामंत्र आणि श्लोक ऐकवल्यावर तो शांत होणे
‘शुद्धाक्ष रडत असतांना मी त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे प्रेरणामंत्र आणि ‘शिवबावनी’ (‘शिवबावनी’ म्हणजे कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेले श्लोक) ऐकवतो. त्या वेळी ‘शुद्धाक्ष लगेच शांत होऊन ते ऐकतो आणि झोपतो’, असा अनुभव मला बर्याच वेळा आला.’ (४.८.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |