लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे धार्मिक स्थळांपासून १०० मीटरच्या परिसरामध्ये मांसविक्रीवर बंदी !
शहरातील एका चौकाला भगवान परशुराम यांचे नाव !
लक्ष्मणपुरी महानगरपालिकेचा स्तुत्य निर्णय ! असा निर्णय हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी घेणे आवश्यक !
लक्ष्मणपुरी (लखनौ) – शहरामध्ये धार्मिक स्थळांपासून १०० मीटरच्या परिसरात मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मांसाहारी पदार्थांची विक्री करणारी दुकाने आणि उपाहारगृहे यांच्यावर प्रतिबंध घालण्यात येत असल्याची घोषणा महापौर संयुक्ता भाटिया यांनी केली आहे. उत्तरप्रदेश सरकार राज्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याच्या संदर्भात विविध निर्णय घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबर या दिवशी महापौर संयुक्ता भाटिया यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेची एक बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी मथुरा आणि वृंदावन या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मांसविक्री करणार्या दुकानांवर बंदी घालण्यात आली होती. आता त्याची पुनरावृत्ती लक्ष्मणपुरी येथेही होत आहे. अशाच प्रकारचे नियम राज्याच्या अन्य शहरांमध्येही लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहरातील चौक आणि पार्क यांची नावे पालटून त्यांना ऋषि-मुनी किंवा राष्ट्रपुरुष यांची नावे देण्याचा निर्णय !
भारतात अनेक गावे, शहरे, मार्ग आदींना इस्लामी आक्रमकांची नावे देण्यात आली आहेत. अशी सर्वच ठिकाणची नावे पालटणे आवश्यक !
या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे शहरातील राजाजी पुरम् भागातील एका चौकाचे ‘भगवान परशुराम चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. भगवान परशुराम यांच्या नावाने शहरातील हा पहिलाच चौक असणार आहे. लेबर कॉलनीमधील ‘सर्वाेदय पार्क’चे नामकरण ‘महर्षि कश्यप’ करण्यात आले आहे. डालीगंजच्या निरालानगरमधील पार्क आता ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांच्या नावाने ओळखण्यात येणार आहे. याशिवाय हैदरगंज द्वितीय वार्डाचे नाव बुद्धेश्वर वार्ड, फैजुल्लागंज (प्रथम) वार्डाचे नाव महर्षिनगर, फैजुल्लागंज (तृतीय) वार्डाचे नाव केशवनगर आणि फैजुल्लागंज (चतुर्थ) वार्डाचे नाव पंडित दिनदयाल उपाध्याय वार्ड ठेवण्यात येणार आहे. महापौर भाटिया यांनी सांगितल्याप्रमाणे नाव पालटण्याचे सर्व प्रस्ताव स्थानिक सभासदांकडून आले होते.