राज्य संरक्षित स्मारकांमध्ये समावेश असलेल्या माहिम (मुंबई) येथील प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिरातील २३६ वर्षांपूर्वीच्या मूर्ती गायब !
|
|
मुंबई, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्य संरक्षित स्मारकांमध्ये समावेश असलेल्या आणि ‘दादोबा जगन्नाथ रिलिजन ट्रस्ट’कडून चालवण्यात येत असलेल्या माहिम येथील प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिरातील देवतांच्या ५ मूर्ती गायब झाल्या आहेत. या मूर्ती २३६ वर्षे पुरातन आहेत. यांतील २ मूर्तींचा शोध लागला असून ३ मूर्ती अद्यापही सापडलेल्या नाहीत. विश्वस्तांकडून मात्र या मूर्ती विसर्जित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य संरक्षित मंदिर असतांना मूर्ती विसर्जित करण्याविषयी कोणतीही शासकीय प्रक्रिया न राबवणे, तसेच त्याविषयी कोणताही पुरावा सादर न करणे हा विश्वस्तांचा प्रकार संशयास्पद असून या प्रकारामुळे भाविकांकडून या मूर्तींची विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाने सादर केलेल्या निरीक्षण अहवालामध्ये विश्वस्तांविषयी गंभीर मते नोंदवली असूनही पोलिसांकडून या प्रकरणी दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराविषयीही संशय निर्माण झाला आहे.
गायब झालेल्या मूर्तींमध्ये श्री पार्वतीदेवी, श्री शितलादेवी, शिवलिंग, कासव आणि नंदी यांचा समावेश आहे. यांतील श्री पार्वतीदेवी आणि श्री शितलादेवी यांच्या मूर्ती मंदिराचे तत्कालीन अध्यक्ष गणपति भट्टे यांच्या ‘फार्म हाऊस’ येथे सापडल्या. (या मूर्ती तिथपर्यंत कशा पोचल्या ? – संपादक) या मूर्ती पुन्हा मंदिरात आणण्यात आल्या आहेत. मूर्ती गायब होण्याच्या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून रितसर पंचनामा करण्यात आला असून विश्वस्तांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला आहे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून या प्रकरणी १५ जानेवारी २०२० या दिवशी चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये मंदिरांच्या ट्रस्टींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
शंकराचार्यांनी लेप लावण्यास सांगूनही ट्रस्टींनी मूर्ती पालटल्या ! – पुजार्यांचा गंभीर आरोप
करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानंदभारती यांनी केवळ शिवलिंग, शितलादेवी या २ मूर्ती भंग पावल्याचे सांगून केवळ त्याच मूर्ती पालटण्यास सांगितल्या होत्या. अन्य मूर्तींना वज्रलेप लावण्यास सांगितले होते; मात्र विश्वस्तांनी चारही मूर्ती पालटल्या. ‘विश्वस्तांनी मूर्ती विसर्जनाचे दायित्व माझ्याकडे दिले असल्याचा आरोप खोटा आहे’, असा गंभीर आरोप मंदिराचे तत्कालीन पुजारी पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील अधिकार्यांना दिलेल्या जबाबात केला आहे.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने मंदिरांच्या विश्वस्ताविषयी नोंदवलेली काही गंभीर मते !
१. विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात कासवाची मूर्ती पालटण्यात आली नसल्याची खोटी माहिती दिली.
२. विश्वस्तांनी शिवलिंगाचे विसर्जन केल्याचे पुरावे, त्याचे छायाचित्र, विसर्जन केल्याचे ठिकाण, विसर्जनाचा दिवस, तसेच शिवलिंग विसर्जित करण्याचा ठराव यांविषयी कोणतीही माहिती सादर केलेली नाही.
३. शिवलिंग विसर्जित केल्याची कोणतीही माहिती न दिल्यामुळे ‘शिवलिंग आणि कासवाची मूर्ती यांचे विसर्जन झाल्याचा संशय आहे.
४. विश्वस्तांना सर्व मूर्ती एकत्रित विसर्जित करणे शक्य असतांना त्यांनी तसे का केले नाही ?
५. मूर्ती २३६ वर्षे जुन्या असतांना त्या संग्रहालयात ठेवणे शक्य असतांना त्या मालाड येथे विश्वस्त गणपती भट्टे यांच्या ‘फार्म हाऊस’ येथे साधारण ८ वर्षे ठेवण्याचे प्रयोजन संशयास्पद आहे.
६. विश्वस्तांनी इतिवृत्त नव्याने लिहून मूर्ती विसर्जनाचे दायित्व तत्कालीन पुजारी पुरुषोत्तमबुवा कुलकर्णी यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
७. मूर्तींचे पंचनामे करतांना किंवा त्यानंतरही मूर्ती विसर्जनाविषयीचा ठराव विश्वस्तांनी सादर केला नाही.
शोध न लागलेल्या तीनही मूर्तींचा पोलिसांनी शोध लावावा ! – प्रसाद ठाकूर, भाविक (तक्रारकर्ते)
गायब झालेल्या तीनही मूर्ती पुरातन आहेत. त्या पुन्हा मंदिरात यायला हव्यात. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून मूर्तींचा शोध घ्यावा.
भ्रष्ट कारभार करणार्यांवर कारवाई व्हायला हवी ! – यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेवा, माहिम विधानसभा क्षेत्र
श्री काशीविश्वेश्वर हे राज्य संरक्षित मंदिर आहे. त्यामुळे मंदिरातील मूर्ती जीर्ण झाल्या असल्यास रितसर अनुमती घेऊन, पंचनामा, मूल्यांकन आदी प्र्रक्रिया करून त्यांचा जीर्णाेद्धार होणे अपेक्षित होते. विश्वस्तांनी या सर्व प्रक्रियेला डावलले आहे. त्यामुळे सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयानेही विश्वस्तांविषयी संशय व्यक्त केला आहे. विश्वस्तांकडे मंदिराचे दायित्व असल्यामुळे त्यांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव असायला हवी; मात्र हे डावलून भ्रष्टाचार होत असेल, तर असा भ्रष्ट कारभार करणार्या विश्वस्तांवर कारवाई व्हायला हवी.
धर्मादाय आयुक्तांकडून चौकशीचे निर्देश देऊनही पोलिसांकडून ठोस कार्यवाही नाही !
धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणी ४ जानेवारी २०२१ या दिवशी माहिम पोलीस ठाण्याला पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये आवश्यता वाटल्यास महाराष्ट्र पब्लिक कायद्यानुसार कार्यवाही करण्याचीही सूचना दिली आहे; मात्र अद्यापही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणात मूर्तींचा आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यताही वर्तवली आहे.
हिंदु धर्म आणि देवता यांची विटंबना करणार्या विश्वस्तांवर कायदेशीर कारवाई व्हावी ! – प्रसाद ठाकूर यांची साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात चिकाटीने लढा देणारे श्री. प्रसाद ठाकूर आणि श्री. यशवंत किल्लेदार यांचे अभिनंदन ! समस्त धर्माभिमानी हिंदूंनी या लढ्याला पाठबळ द्यावे ! – संपादक
या प्रकरणी श्री. प्रसाद ठाकूर यांनी माहिम पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे १४ सप्टेंबर २०२१ या दिवशी तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीमध्ये श्री. ठाकूर यांनी माहिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. संस्थेच्या विश्वस्तांशी हातमिळवणी करून ते या प्रकरणाचे अन्वेषण भरकटवत आहेत. भारतीय दंड विधान कायद्याच्या अंतर्गत या प्रकरणी गुन्हा नोंदवता येणे शक्य असतांना त्यांनी हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे पाठवून अन्वेषण बंद केले. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणी गुन्हा घडल्याची शक्यता वर्तवूनही प्रकरण बंद करण्यामागे पोलीस अधिकारी राजू मोरे यांची भूमिका काय ? असा प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात विश्वस्तांनी विक्री करण्याच्या हेतूने पुरातन मूर्ती पालटल्याचे दिसून येत आहे. यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असून हिंदु धर्म आणि देवता यांची विटंबना करणार्या विश्वस्तांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी !
या प्रकरणी ३० सप्टेंबर या दिवशी यशवंत किल्लेदार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, ही घटना हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. या संवेदनशील प्रकरणात माहिम पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. यामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार दिसून येत अाहे. तरी या प्रकरणी दोषी विश्वस्तांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलिसांना द्यावा.
या प्रकरणी विश्वस्त मंडळाची बाजू समजून घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने देवस्थानचे अध्यक्ष जयवंत देसाई यांना संपर्क केला. याविषयी ‘मंदिराचे विश्वस्त संजीव परळकर यांना संपर्क करावा. मी त्यांचा भ्रमणभाषवर क्रमांक पाठवतो’, असे त्यांनी सांगितले; मात्र त्यांनी तो कळवला नाही. याविषयी पुन्हा संपर्क केल्यावर देसाई यांनी दूरभाष उचलला नाही.