‘सनातनचे सर्व साधक हा आपलाच परिवार आहे’, या भावाने सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७४ वर्षे) !

पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. अरविंद सहस्रबुद्धे यांची त्यांची पत्नी आणि अन्य साधिका यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली अाहेत.

श्री. अरविंद सहस्रबुद्धे

सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (श्री. सहस्रबुद्धे यांची पत्नी, ६६ टक्के आध्यात्मिक पातळी)

‘सनातन संस्थेत येण्यापूर्वी श्री. सहस्रबुद्धे नास्तिक होते. त्यांचा नास्तिकतेकडून आतापर्यंतचा साधनेचा प्रवास पाहिल्यास मला त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

सौ. मंगला सहस्रबुद्धे

१. आनंदी आणि समाधानी वृत्ती

ते नेहमी आनंदी असतात. ते प्रत्येक कृती वेळेत करतात. ते कधीच आळस करत नाहीत. ते सकाळी साडेपाच वाजता उठून व्यष्टी साधना करतात. त्यांना खाणे-पिणे किंवा कपडे या संदर्भात आवड-नावड नाही. ते जे मिळेल, ते आनंदाने स्वीकारतात. मला सेवेहून घरी यायला उशीर झाला, तर ते मला स्वयंपाक करायला साहाय्य करतात.

२. ओळख झालेल्या प्रत्येक साधकाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी संपर्क करून शुभेच्छा देणे

त्यांची एखाद्या साधकाशी एकदा ओळख झाली की, ते त्यांचा जन्मदिनांक आणि तिथी लिहून घेतात अन् त्यांना त्या दिवशी आठवणीने भ्रमणभाष करतात. त्यांनी एका वहीत साधकांच्या वाढदिवसाच्या नोंदी केल्या आहेत. ते प्रतिदिन ती वही पाहून संबंधित साधकाला भ्रमणभाष करतात. ते गेली २५ वर्षे साधकांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपर्क करून शुभेच्छा देत आहेत.

३. जवळीक साधणे

त्यांना इतरांकडून कोणतीही अपेक्षा नसते. ते बाहेर कुठे जात नसले, तरी केरळ येथील साधकांशीही त्यांची जवळीक आहे. अनेक साधकांनी त्यांचा प्रेमभाव अनुभवला आहे. ‘सनातनचे सर्व साधक हा आपलाच परिवार आहे’, असा त्यांचा भाव असतो.

४. साधकत्व

सर्वांशी स्वतःहून बोलणे, चूक मनापासून स्वीकारणे, क्षमा मागणे आदी साधकत्वाचे अनेक गुण त्यांच्यात आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच जवळचे वाटतात.

५. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा परिपूर्ण आणि भावपूर्णरित्या करणे

ते मागील १२ वर्षे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करत आहेत. ते ही सेवा मनापासून, भावपूर्णरित्या, अचूक आणि परिपूर्ण करतात. त्यांच्या सेवेचा कधीच पाठपुरावा घ्यावा लागत नाही. मागील १२ वर्षांत त्यांचा अहवाल किंवा मागणी एकदाही उशिरा गेली, असे झाले नाही. हिशोब जुळत नसल्यास रात्री उशिरापर्यंत जागून ते चूक शोधतात आणि मगच झोपतात.

६. अल्प अहं

त्यांनी माझ्यावर पती या नात्याने कधीच अधिकार गाजवला नाही. ते अतिशय शांत आहेत. त्यांचा अहं अल्प आहे.

७. भाव

त्यांचा परात्पर गुरुदेवांप्रती भाव आहे. गुरुदेवांनी मला सेवा दिली आहे. ‘ती सेवा परिपूर्ण करून त्यांची कृपा मिळवायची’, असे ध्येय त्यांच्या समोर सतत असते. असे पती मला लाभले, त्यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

सौ. शारदा हुमनाबादकर, पुणे

१. नम्र

‘काका वयाने मोठे आहेत, तरी ते सर्वांना आदराने संबोधतात. त्यांनी प्रत्येकाशी नाते जोडले आहे. ते सर्वांना सणाच्या दिवशी आवर्जून भ्रमणभाष करतात.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करण्याची ओढ

काका प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन काटेकोरपणे करतात. त्यांना दैनिक देण्यास एखादा दिवस उशीर झाला किंवा काही कारणांमुळे दिले नाही, तर ते त्याविषयी विचारतात. यातून त्यांची दैनिक ‘सनातन प्रभात’विषयीची ओढ लक्षात येते. त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या विविध प्रार्थना आणि कृतज्ञता वहीत लिहिल्या आहेत अन् ते अजूनही लिहित आहेत. ते ही वही प्रतिदिन ३ वेळा वाचतात.

३. सेवेच्या नोंदी अचूक करणे

काका साप्ताहिक आणि अन्य भाषिक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांशी संबंधित सेवा करतात. ते सर्व नोंदी लिहून ठेवतात. ते ‘ई.आर्.पी.’ (ऑनलाईन नोंदी करण्याची प्रणाली) या प्रणालीत नोंदी करणार्‍या साधकांना सर्व आकडे अचूक सांगतात. ‘कुणाचा अंक टपालाने पाठवायचा आहे ? कुणाचा अंक कधी बंद होतो ? कुणाच्या अंकाचे नूतनीकरण आधीच झाले आहे आणि त्या संदर्भातील काही चुका असल्यास ते त्वरित साधकांच्या लक्षात आणून देतात.

४. त्यांच्या घरी गेल्यावर हलकेपणा जाणवतो.’

श्रीमती शीतल नेरलेकर, पुणे. (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

सतत ईश्वरी अनुसंधानात रहाणे

काकांची परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा आहे. काका दिवसभर गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात. दिवसभर त्यांच्या प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप सतत चालू असतो.

काकांनी घराबाहेर जाऊन समष्टी सेवा केली नाही; मात्र ‘काकांतील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा परिपूर्ण आणि भावपूर्णरित्या करणे, घरी आलेल्या साधकांचे आदरातिथ्य करणे, त्यांची विचारपूस करणे, अल्प अहं आणि अंतर्मनातून साधना चालू असणे’, या गुणांमुळे काकांची आध्यात्मिक उन्नती होत आहे’, असे वाटते.’

सौ. प्रतिभा फलफले, पुणे

शारीरिक त्रास असूनही आनंदी असणे : ‘काकांना शारीरिक त्रास असूनही ते सतत आनंदी असतात. त्यांच्याशी बोलतांना ‘त्यांना शारीरिक त्रास आहे’, असे जाणवत नाही. ते बोलतांना नेहमी आनंद जाणवतो.’

सौ. मनीषा पाठक, पुणे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

१. प्रेमभाव

‘माझे लग्न होऊन मी सिंहगड रस्ता, पुणे येथे आल्यानंतर मला प्रथम भेटलेले साधक कुटुंब म्हणजे सहस्रबुद्धे कुटुंबीय. काका सर्वांवर पितृवत प्रेम करतात. माझे वडील ४ वर्षांपूर्वी गेले. काकांनी दिलेला आध्यात्मिक स्तरावरील आधार आणि प्रेम यांमुळे मला वडिलांची उणीव भासली नाही. काका-काकूंचे घर म्हणजे सर्वांसाठी माहेरघरच आहे.

२. मुली आणि नातवंडे यांवर चांगले संस्कार करणे

काका-काकूंनी त्यांची मुलगी सौ. अंजली बोडस हिच्यावर चांगले संस्कार केले आहेत. सौ. अंजलीताईमध्येही पुष्कळ साधकत्व आहे. पूर्वी त्यांच्या घरी नेहमी संत आणि साधक यायचे. त्या वेळी ताई प्रेमाने आणि कृतज्ञताभावाने सर्वांचे आदरातिथ्य करायची. काका-काकूंनी असेच संस्कार नातवंडांवरही केले आहेत.

३. पाककलेत निपुण

काका या वयातही पोहे, साबुदाणा खिचडी, केक, असे पदार्थ रुचकर बनवतात. त्यांनी बनवलेले पदार्थ साधकांपर्यंत पोचवण्याची त्यांची धडपड असते.

४. स्थिर

३ वर्षांपूर्वी रंगपंचमीच्या दिवशी काकूंचा अपघात झाला आणि त्यांच्या मनगटाचे हाड मोडले. या प्रसंगात काका पुष्कळ स्थिर होते. तेव्हा ‘पत्नी तिचे प्रारब्ध भोगत आहे आणि गुरुदेव तिच्या समवेत आहेत’, असा त्यांचा भाव होता.

५. काका-काकूंचा आध्यात्मिक स्तरावरील संवाद

आपले दोघांचे आता वय झाले आहे. दोघांपैकी एक जण लवकर वर जाणार. आपण एकमेकांमध्ये अडकायचे नाही. आपण आता भावभक्ती आणि साधनेचे प्रयत्न वाढवूया.

६. पूर्वी काकांचे बोलणे भावनेच्या स्तरावर असायचे; पण आता त्यांचे भावाचे प्रयत्न वाढले आहेत.’

सौ. राजश्री खोल्लम, पुणे

१. या वयातही काका पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १०.३० वाजेपर्यंत सतत कार्यरत असतात.

२. घरातील वयोवृद्धांची कृतज्ञताभावाने सेवा-सुश्रुषा करणे

काका पूर्वी नास्तिक होते, तरी ‘त्यांची आंतरिक साधना चांगली आहे’, असे जाणवते. काकांशी बोलतांना माझ्या लक्षात आले की, त्यांनी १५ ते २० वर्षांच्या कालावधीत त्यांचे आई-वडील, मोठे काका-काकू आणि एक ब्रह्मचारी काका या वयोवृद्धांची मनापासून अन् कृतज्ञताभावाने सेवा-सुश्रुषा केली आहे. मोठ्या काकांनी त्यांचे आणि त्यांच्या लहान भावाचे शिक्षण केले. त्यांचे मार्गदर्शनही काकांना वेळोवेळी मिळाले. काकांच्या मनात या सर्वांप्रतीचा कृतज्ञताभाव अजूनही आहे.

३. पत्नीविषयी व्यक्त केलेला कृतज्ञताभाव

काकांचे नाव अरविंद आहे. ते म्हणाले, ‘‘बंगाली भाषेत ‘अरविंद’ या शब्दाचा अर्थ ‘कमळ’ असा आहे. कमळ चिखलात असते. कमळ हे श्री महालक्ष्मीशी संबंधित आहे. माझी पत्नी ही महालक्ष्मीचे रूप असून तिने मला साधना सांगितली. त्यामुळे मी साधना करू शकत आहे.’’ काकांच्या बोलण्यात स्वतःविषयी कोणताच कर्तेपणा आणि अहं जाणवत नाही. काका मायेतील विचारांपासूनही अलिप्त झाले आहेत.

४. साधनेचे सर्व श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देणे

काकांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत पुष्कळ सातत्य आहे. ते एकदा रुग्णाईत असतांना त्यांना संतांनी दिलेले नामजप त्यांनी चिकाटीने पूर्ण केले. ते या सर्वांचे श्रेय परात्पर गुरु डॉक्टरांना देतात. ‘तेच माझ्याकडून सर्व करवून घेतात. मला कंटाळा येत नाही’, असे काका सांगतात. ‘त्यांच्या बोलण्यातूनच ते आनंदी आहेत’, असे जाणवते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ः २०.४.२०२१)