सतत इतरांचा विचार करणारे, प्रेमळ स्वभावाचे आणि इतरांना सढळ हस्ते साहाय्य करणारे पू. (कै.) वैद्य विनय भावे !
मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेदप्रवीण पू. वैद्य विनय नीलकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जून २०२१ या दिवशी देहत्याग केला. त्यांची सून सौ. वैदेही भावे यांना पू. (कै.) भावेकाका यांच्याविषयीची लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सतत इतरांचा विचार करणे
१ अ. १०० रुपयांचे साहाय्य मागण्यासाठी आलेल्या अनोळखी व्यक्तीला काही न विचारता पैसे देऊन साहाय्य करणे : ‘माझे लग्न झाल्यानंतर काही दिवस मी आमच्या वरसई (जि. रायगड) येथील घरी होते. एकदा सकाळी ७ वाजताच एक माणूस आला आणि मला म्हणाला, ‘‘नानाला बोलाव.’’ (पू. भावेकाका यांना स्थानिक लोक ‘नाना’ या नावाने ओळखत असत.) त्याप्रमाणे मी पू. भावेकाकांना बोलावले. तेव्हा त्या व्यक्तीने पू. काकांकडे १०० रुपये मागितले. त्यांनीही लगेच त्याला १०० रुपये दिले. तो माणूस निघून गेल्यावर मीपू. काकांना विचारले, ‘‘तो माणूस कोण होता आणि पैसे का मागत होता ?’’ त्यावर पू. काका म्हणाले, ‘‘कोण होता ठाऊक नाही; पण इतकी निकड असल्याविना एवढ्या सकाळी तो पैसे मागायला येणार नाही. त्यामुळे मी त्याला पैसे दिले.’’
१ आ. दूरवरून आलेल्या रुग्णांना जेवूनच पाठवणे : पू. भावेकाका प्रत्येक रविवारी रुग्णचिकित्सा करत असत.तेव्हा त्यांच्याकडे पुष्कळ दूरवरून रुग्ण येत असत. त्यामुळे पू. काका त्यांना जेवल्याविना जाऊ देत नसत. पुढे पुढे त्या रुग्णांनाही त्याची सवय झाली. ते रुग्ण येतांना काही ना काही खाऊ घेऊन येत असत आणि आमच्या घरी स्नेहभोजन होत असे.
१ इ. सणासुदीला कामगारांचा विचार करून त्यांना अल्प दरात चांगल्या प्रतीच्या वस्तू मिळवण्यासाठी साहाय्य करणारे पू. भावेकाका ! : पू. काका कोणत्याही कामासाठी बाहेर जाणार असतील, तर त्या मार्गावरील गावांत कुणाचे काही काम असेल, त्यालाही समवेत नेत असत. पू. काकांची सणासुदीच्या वेळी औषधे देण्यासाठी पुण्याला फेरी होणार असेल, तर ते कारखान्यातील सर्व कामगारांना त्यांच्या घरी सणाच्या दृष्टीने लागणार्या किराणा सामानाची सूची मागून घेत आणि पुणे येथील मोठ्या बाजारपेठेतून सर्वांचे किराणा सामान घेऊन येत. त्यामागे ‘त्या व्यक्तीला वेगळा वेळ आणि प्रवासखर्च करून जावे लागू नये आणि कामगारांना अल्प दरात चांगल्या प्रतीच्या वस्तू मिळाव्यात’, असा त्यांचा उद्देश असायचा.
१ ई. चूक सांगतांनाही आधी कौतुक करून नंतर प्रेमाने ‘काय चुकले ?’, ते सांगणे : पू. काका स्वतः उत्तम स्वयंपाक करत असत. माझ्याकडून एखाद्या पदार्थात काही घालायचे राहिले असेल, तरी आधी त्या पदार्थाचे कौतुक करून नंतर प्रेमाने ते विचारत, ‘‘या पदार्थात अजून काहीतरी घालायला हवे आहे का ?’’ त्यामुळे ‘त्या पदार्थात काहीतरी राहिले आहे’, हे मला समजत असे; पण त्यांच्या अशा प्रकारे सांगण्यामुळे मला कधी ताण आला नाही किंवा त्यांची भीतीही वाटली नाही.
१ उ. रात्री नात रडत असतांना घंटोन्घंटे मांडीवर घेऊन बसणारे पू. भावेकाका ! : कु. इंद्रश्री (पू. भावेकाकांची नात, मुलाची मुलगी) लहान असतांना तिचे वडील (श्री. विक्रम) बाहेरगावी होते. इंद्रश्री रात्री झोपेतून उठून रडू लागली की, पू. काका मला सांगायचे, ‘‘इंद्रश्रीला दूध पाजून माझ्याकडे दे आणि तू झोप.’’ पू. काका तिला मांडीवर घेऊन घंटोन्घंटे बसत असत. त्यामुळे माझी झोप पूर्ण होत असे. ते स्वतः काम किंवा प्रवास यांमुळे दमलेले असूनही माझा विचार करत असत.
१ ऊ. दोन वर्षांपासून पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रात्रीचा स्वयंपाक स्वतः बनवणे : गेल्या २ वर्षांपासून माझ्या सासूबाईंना प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वयंपाक करणे शक्य होत नव्हते. पू. काका त्यांची सततची कामे आणि त्यासाठीचा प्रवास करून आल्यावरही रात्रीचा स्वयंपाक स्वतः करत असत.
२. प्रेमळ स्वभावामुळे लोकसंग्रहही मोठा असणे
पू. काकांचा प्रेमळ स्वभाव आणि लोकसंग्रह यांमुळे महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या ओळखीचे कुणीना कुणीतरी आहेच. पू. काका कुठेही गेले, तरी त्या ठिकाणी असलेल्या ओळखीच्या व्यक्तीला आवर्जून भेटत आणि त्याच्यासाठी काहीतरी भेट घेऊन जात असत.
३. साधना करण्यासाठी ठामपणे पाठीशी उभे रहाणे
माझे पती (श्री. विक्रम) काही काळासाठी बाहेरगावी होते. तेव्हा मी आणि माझी मुलगी (कु. इंद्रश्री) आम्ही दोघीच गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात होतो. आमच्या काही नातेवाइकांना ते पटत नसे. त्याविषयी ते बोलूनही दाखवत. पू. काकांचा आमच्यावरील विश्वास आणि आमच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे यांमुळे मला नातेवाइकांच्या बोलण्याचा कधी त्रास झाला नाही. पू. काकांची ‘आम्ही साधना करावी’, एवढीच अपेक्षा असे.
४. व्यवहारातील लोकांनाही मार्गदर्शन करणे
आमच्या रायगड जिल्ह्यातील गावाजवळ धरण प्रकल्प होणार असल्याने प्रकल्पग्रस्त लोकांना शासनाकडून हानीभरपाईची रक्कम मिळणार होती. ‘त्या रकमेची योग्य प्रकारे गुंतवणूक कशी करावी ?’, यासाठी अनेक लोक पू. काकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत.
५. अध्यात्मातील सूत्रे आणि संतांच्या गोष्टी सांगून मार्गदर्शन करणे
काही कारणाने माझ्या मनावर ताण असेल किंवा मनात संघर्ष चालू असेल, तर पू. काका मला भ्रमणभाष करून आधी प्रेमाने चौकशी करत असत. त्यानंतर बोलण्याच्या ओघात मला अध्यात्मातील सूत्रे किंवा काही संतांच्या गोष्टी सांगत असत. त्यामुळे माझ्या मनातील संघर्ष आणि ताण न्यून होत असे. त्या वेळी ‘माझ्या साधनेकडे त्यांचे लक्ष आहे’, या विचाराने मला समाधान वाटायचे.
६. औषधाऐवजी नामजपादी उपाय करणे आवश्यक असल्याचे सांगणे
कधी कधी मला शारीरिक त्रास होत असल्यास मी पू. काकांना दूरभाष करून औषधे पाठवण्यास सांगत असे. ते मला औषधे पाठवत असत, तर काही वेळा औषधे न पाठवता ते मला काहीतरी उपाय करायला सांगत असत. मी त्यांना औषधाविषयी विचारल्यावर पू. काका मला सांगायचे, ‘‘औषधाचा काहीच उपयोग होणार नाही. तू आध्यात्मिक उपायच कर.’’ त्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यावरच मला बरे वाटायचे.
७. कु. इंद्रश्रीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि तिला घडवण्यासाठी वेळ देणे
अ. कु. इंद्रश्रीला (नातीला) तिच्या अभ्यासात किंवा अन्य कोणत्याही विषयात काही अडले, तर ‘त्याचे उत्तर आजोबांकडे
(पू. भावेकाकांकडे) असणार’, असा तिला ठाम विश्वास असायचा. पू. काकाही तिच्या शंकेचे किंवा समस्येचे पूर्णपणे समाधान करत असत.
आ. कु. इंद्रश्रीचा भक्तीभाव वाढावा, यासाठी पू. काका तिला घंटोन्घंटे अंगणात बसून देवता आणि संत यांच्या गोष्टी सांगत असत.
इ. पू. काका स्वतः वेगवेगळे पदार्थ करतांना इंद्रश्रीला साहाय्यासाठी समवेत घेऊन तिलाही ते पदार्थ बनवण्यास शिकवत असत.
८. अनेकांना कारखान्याच्या बाहेर प.पू. भक्तराज महाराज फिरतांना दिसणे
पू. भावेकाकांच्या कारखान्यात काम करणार्या कामगारांना आणि कारखान्याच्या जवळ रहाणार्या लोकांनाही कारखान्यात किंवा कारखान्याच्या बाहेर एक वयस्कर व्यक्ती फिरतांना दिसत असे. त्यांच्याकडून त्या वयस्कर व्यक्तीचे वर्णन विचारून घेतल्यावर ते वर्णन प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी मिळते जुळते असे.’
– सौ. वैदेही विक्रम भावे, मोर्डे, रत्नागिरी. (८.८.२०२१)