व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्राद्धकर्म करण्याचे महत्त्व आणि श्रद्धापूर्वक केलेल्या श्राद्धामुळे होणारे लाभ !
२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…
१. श्राद्धकर्मे केल्याने मृत व्यक्तीला लाभ होणे
‘जीवात्मा शरीर सोडून जातो. तेव्हा ‘मुक्ती’ किंवा ‘दुसर्या देहाची प्राप्ती’ या दोनपैकी एक गती त्याला प्राप्त होते. शरीर सोडून जाणारा जीव जर मुक्त झाला असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर केलेल्या श्राद्धकर्मामुळे त्याला काही लाभ किंवा हानी होत नाही. ‘शरीर सोडून गेलेल्या जिवाला मुक्ती मिळाली आहे ? कि त्याने दुसरे शरीर धारण केले आहे ?’, हे सर्वसाधारण मनुष्याला समजू शकत नाही. त्यामुळे मृत व्यक्तीचे नातेवाईक तिच्या कल्याणासाठी जे श्राद्धकर्म करतात, त्याचा मृताला लाभच होतो, उदा. मनुष्य कोणत्याही देशातील किंवा गावातील निवासी असो, त्या गावच्या टपाल कार्यालयात (‘पोस्ट ऑफिस’मध्ये) टपालाने ‘मनीऑर्डर’द्वारे पैसे पाठवल्यावर त्याला तेथे ते पैसे निश्चितच मिळतात. त्याचप्रमाणे मृत व्यक्ती कुठेही आणि कोणत्याही योनीत असो, तिच्यासाठी जे सत्कृत्य ईश्वराच्या नियमानुसार केले जाते, त्याचे फळ तिला निश्चितच मिळते.
२. श्रद्धेचे महत्त्व
२ अ. श्राद्धकर्मांचा मुख्य आधार श्रद्धा हाच असून श्रद्धेमुळेच फळ मिळते ! : मृत झाल्यानंतर करण्यात येणार्या श्राद्धकर्मांचा मुख्य आधार ‘श्रद्धा’ हाच असून श्रद्धेमुळेच फळ मिळते. मृत व्यक्तीला श्राद्धकर्मांचे फळ मिळाल्याचे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ‘मृत व्यक्तीसाठी केलेल्या श्राद्धकर्मांचे फळ तिला निश्चित मिळते’, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.
२ आ. परमात्म्याला श्रद्धापूर्वक दिलेले सर्वकाही तो त्या त्या जिवापर्यंत निश्चितच पोचवत असणे : विदेशात रहात असलेल्या मुलाला देण्यासाठी आपण एखादे पुस्तक तेथे जाणार्या कोणत्याही सद्गृहस्थाच्या हातात श्रद्धापूर्वक देतो. त्या वेळी आपल्याला वाटते, ‘तो सद्गृहस्थ ते पुस्तक निश्चितच आपल्या मुलाला देईल; कारण ते विश्वासू आहेत.’ त्या व्यक्तीपेक्षा परमात्मा अनेक पटींनी गुणवान आणि शक्तीवान असून ‘सर्वांनी श्रद्धा ठेवावी’, असाच आहे. परमात्म्याला आम्ही श्रद्धापूर्वक जे देऊ, ते तो त्या जिवापर्यंत निश्चितच पोचवणार आहे.
२ इ. श्रद्धेसाठी धनाची आवश्यकता नसून ईश्वराला भक्तीभावाने प्रार्थना केल्यास ईश्वर इच्छित ते सर्व देत असणे : श्राद्धकर्म श्रद्धेने केले जाते. ‘श्रद्धेसाठी धन आवश्यक आहे’, असे नाही. आपल्याजवळ धन नसेल, तर शुद्ध विचारांनी आणि भक्तीभावाने ईश्वराला प्रार्थना करावी, ‘हे प्रभु, ‘आमच्या या नातेवाईकाचे ज्यामुळे कल्याण होणार असेल, तेच करावे. तो ज्या योनीमध्ये असेल, तेथे त्याला सुख-संपत्ती आणि शांती मिळावी’, अशी प्रार्थना केल्यावर प्रभु त्या जिवाला हवे ते देतो.
३. श्राद्धकर्म करतांना केला जाणारा व्यापक संकल्प !
३ अ. श्राद्धकर्म करण्यामागे व्यापक आणि विशाल दृष्टी असणे : श्रद्धेने होणार्या आणि शास्त्रात सांगितलेल्या श्राद्धकर्मात पुष्कळ विशाल दृष्टी दिसून येते. एका मृत व्यक्तीसाठी श्राद्धकर्म करतांना त्या कर्मामध्ये व्यापक संकल्प केले जातात, ‘हे प्रभो, जगातील सर्व प्राणीमात्र, देव, ऋषी, पशूपक्षी आदी सर्व जीव तृप्त होवोत, त्या सर्वांना सुख मिळो.’
३ आ. अंतर्मनातून (चित्तातून) केलेल्या संकल्पाचे महत्त्व ! : चित्ताच्या संकल्पामध्ये अतिशय बळ असते. वासनांमुळे या चित्ताचे बळ नष्ट होते. चित्तवृत्तींना भोगापासून दूर करून चित्ताचे बळ एकत्र केले, तर चित्ताचा संकल्प पुष्कळ उपयुक्त होऊ शकतो.
३ इ. बुद्धीवाद्यांच्या ‘येथे केलेले शुभ कर्म कित्येक कोस दूर असलेल्या जिवाला कसे मिळणार ?’, या शंकेचे निरसन ! : काही लोक म्हणतात, ‘संकल्प करूनसुद्धा तलावाच्या बाहेर टाकलेले पाणी दूरवरच्या शेतात पोचत नाही. त्याप्रमाणे येथे केलेले शुभ कर्म कित्येक कोस दूर असलेल्या जिवाला कसे मिळणार ?’, काही लोकांनी असा तर्क करणे, म्हणजे वितंडवाद घालण्यासारखे आहे. जसे घरात बसलेल्या मनुष्याचे बोलणे त्याचे शेजारी ऐकू शकत नाहीत; परंतु दूरभाषवरील त्याचे बोलणे दूरचा आणि अती दूरचा मनुष्यसुद्धा ऐकू शकतो, त्याप्रमाणे येथे ईश्वराच्या नियमानुसार केलेले श्राद्धकर्म निश्चितच फळ देते.
४. श्राद्धामधील सर्व कृती श्रद्धेने ईश्वरार्पण करण्याचे महत्त्व !
४ अ. दान किंवा कोणतेही शुभ कर्म मनुष्याला अर्पण करणे आणि ईश्वराला अर्पण करणे, यांमध्ये भेद असल्याने दोन्हींतून मिळणार्या फळातही मोठी तफावत असणे : येथे दिलेले प्रत्येक दान किंवा कोणतेही शुभ कर्म या जगातील मनुष्याला अर्पण केले असेल, तर या जगातील तो मनुष्य त्याची परतफेड करतो. जे (परमात्म्याच्या तुलनेत) अत्यल्प असते; परंतु तेच जर चराचरात व्यापलेल्या परमात्म्याला समर्पित केले, तर त्याची परतफेड करणारा आणि फळ देणारा अखिल ब्रह्मांडनायक भगवंत असतो. एकच कृती आणि तेवढाच व्यय करूनही भावामुळे मिळणार्या फळात बराच भेद असतो. यासाठी व्यक्ती मृत झाल्यानंतर जे कर्म करायचे, ते सर्व ईश्वरार्पण करावे.
याच आधारावर भगवंताने गीतेत म्हटले आहे, ‘तुम्ही जे अन्न ग्रहण कराल किंवा होम, दान आणि तप कराल, ते सर्व मलाच अर्पण करा !’ त्यामुळे श्राद्धामध्ये श्रद्धेने ईश्वरार्पण करणे अतिशय आवश्यक असते.
४ आ. श्राद्धकर्म ही लोकांना दाखवण्यासाठी करायची कृती नसून ज्याला दान आणि भोजन द्यायचे असेल, त्याचा आदर-सत्कार करून त्याला संतुष्ट केल्यास परमात्माही संतुष्ट होत असणे : जे श्राद्धकर्म केवळ लोकांना दाखवण्यासाठी, लोकलज्जेस्तव आणि लोकांमध्ये यश अन् कीर्ती मिळावी; म्हणून श्राद्धाचा अर्थ समजून न घेताच केले जाते, त्याचे फळ श्राद्धकर्त्याची इच्छा अन् पुरुषार्थ यांनुसार मिळते. ज्याला दान द्यायचे असेल, ज्याला भोजन देऊन तृप्त करायचे असेल, त्याला आदर-सत्कार करून संतुष्ट करावे. जेव्हा प्राण्याचा अंतरात्मा तृप्त होतो, तेव्हाच परमात्माही तृप्त होतो.
४ इ. श्राद्ध करतांना परमात्म्यावर प्रीती आणि भक्ती असलेल्या ब्राह्मणाला संतुष्ट करावे, असे ब्राह्मण न मिळाल्यास ‘सात्त्विक ब्राह्मणातील ईश्वराला अर्पण करत आहे’, या बुद्धीने सर्व कर्म करावे ! : शास्त्रामध्ये पुनःपुन्हा सांगितले आहे, ‘सर्व नातेवाईक, वैद्य, ज्योतिषी आणि आपल्यावर उपकार करणारे अशा पुष्कळ लोकांना श्राद्धाचे भोजन देऊ नये. जो भक्त असेल, ज्याची परमात्म्यावर प्रीती आणि भक्ती असेल, त्या ब्राह्मणाला संतुष्ट करावे.’ असे ब्राह्मण मिळाले नाहीत, तर ‘श्राद्धकर्म कसे करायचे ?’, असा प्रश्न पडू शकेल. तेव्हा भगवंताने असे सांगितले आहे, ‘त्यातल्या त्यात जे ब्राह्मण सात्त्विक असतील, ते परिपूर्ण नसले, तरी त्यांच्यात असलेल्या ईश्वराला अर्पण करण्याच्या बुद्धीने सर्व कर्म करावे. असे केल्यानंतर पात्र-अपात्र ब्राह्मण असा प्रश्नच रहात नाही.
५. पुत्रांनी धनाचा यथाशक्ती योग्य व्यय करून पुण्य कार्य केल्यास मृत पित्याला पुढील जन्मासाठी साहाय्य होऊन पुत्र पितृ-ऋणातून मुक्त होणे शक्य !
जिवंतपणी मनुष्य आपले कुटुंब आणि मुले-बाळे यांच्या मोहाने आपले धन पुण्य कार्यात व्यय करत नाही अन् नंतर सर्वकाही येथेच सोडून तो मरण पावतो. त्याच धनाचे मालक झालेल्या त्याच्या पुत्रांनी काही धनाचा यथाशक्ती योग्य व्यय करून मृत व्यक्तीच्या पुढील जन्मासाठी साहाय्य केले, तर ते पुत्रादी निश्चितच पितृ-ऋणातून मुक्ती मिळवू शकतात. अशुभ कर्म करणार्या पित्याला शुभ कर्म करणारा त्याचा पुत्र तारू शकतो. दुराचारी हिरण्यकश्यपूला विष्णुभक्त प्रल्हादाने तारले होते. जसे बुडणार्या बालकाला पिता स्वतः पोहत जाऊन वाचवू शकतो, त्याचप्रमाणे पुत्रसुद्धा पित्याला तारू शकतो.
६. श्राद्ध करतांना लक्षात ठेवावयाची सूत्रे
अ. श्राद्धकर्त्याने स्वतःला संकटात टाकून, संपत्ती विकून किंवा कर्ज घेऊन श्राद्धकर्म करू नये. जगात कीर्ती मिळवण्यासाठी श्राद्ध करू नये. समजा त्याच्याजवळ कोणतेच साधन नसेल, तर केवळ संकल्प करून श्राद्धकर्म करता येते. याचेसुद्धा फळ मिळते.
आ. श्राद्धकर्म लोभी, मूर्ख, ढोंगी, धूर्त, खोट्या, दुराचारी आणि अभक्त ब्राह्मणांकडून करून घेऊ नये. अशा वेळी शक्य असेल, तर ते स्वतःच करावे.
इ. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गावजेवण घालणे, अशा गोष्टी प्रसिद्धी आणि स्वतःची प्रतिमा उंचावणे, यांसाठी केल्या जातात. गावजेवण घालण्याचा मृत व्यक्तीच्या कल्याणाशी काहीही संबंध नसतो. ज्याच्या हृदयात मृत व्यक्तीप्रती खराच भाव असेल, तर त्याने शास्त्रानुसार विधीवत् तर्पणश्राद्ध करायला पाहिजे.
ई. मृत व्यक्तीच्या नावाने दानधर्म करणे, ही गोष्ट वाईट नाही; पण तो दानधर्म खर्या मनाने करावा. त्याच्या मनात जशी भावना असेल, तसे त्याला फळ मिळेल.
उ. मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या तिथीला कमी प्रमाणात; पण श्रद्धापूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने दीन, दुःखी, बालक, साधू, ब्राह्मण यांना अन्न-वस्त्र अन् पाणी देऊन संतुष्ट केले, तर ते लाभदायी असते. अधिक मोठ्या प्रमाणावर कार्य केल्यास श्रद्धा भंग होऊ शकते.
७. शास्त्रानुसार श्राद्धकर्म करणारा निश्चितच मृत व्यक्तीला तारतो !
अ. हिरण्यकश्यपूला ठार मारल्यानंतर नृसिंह भगवान प्रल्हादाला म्हणतात, ‘हे पुत्रा, तू आपल्या पित्याच्या मृत्यूनंतरची सर्व श्राद्धकर्मे कर.’
आ. राजा दशरथाचे श्राद्धकर्म स्वतः श्रीरामाने केले होते.
इ. आपले सर्व यादव मृत झाल्यावर यदुनाथानेही (श्रीकृष्णाने) यादवस्थळी त्यांचे श्राद्धकर्म केले होते.
८. श्राद्धकर्त्याने श्राद्धकर्म करणार्या ब्राह्मणांकडून श्राद्धातील मंत्रांचा अर्थ समजून घेणे आवश्यक !
मृत्यूनंतर केल्या जाणार्या शास्त्रोक्त श्राद्धकर्माशी प्रचलित रूढी-रिवाजांचा काही संबंध नसतो. श्राद्धामध्ये श्रद्धा, शास्त्रविधी आणि मन शांत ठेवून केलेला संकल्प पुष्कळ महत्त्वाचा असतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर होणारी सर्व श्राद्धकर्मे मुख्यतः ‘श्राद्ध’ शब्दाने शास्त्रामध्ये वर्णन केली आहेत. श्राद्धातील मंत्र आणि वाक्ये यांचा अर्थ समजून घेतला, तर ते अधिक चांगले होईल ! त्यासाठी श्राद्धकर्त्याने श्राद्ध करणार्या ब्राह्मणांकडून म्हटल्या जाणार्या मंत्रांचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
९. श्राद्धकर्म करतांना ब्राह्मणाने मध्येच पैशांची मागणी करणे, हा लोभीपणा असून श्राद्धकर्माच्या शेवटी ब्राह्मणाला दक्षिणा देऊन संतुष्ट करावे !
श्राद्धकर्म करतांना ब्राह्मणाने मध्येच वारंवार पैशांची मागणी करू नये. कर्म चालू असतांना मध्येच पैसे मागणे, हे लोभीपणाचे लक्षण आहे. श्रद्धाळू पुरुषाने श्राद्धकर्माच्या शेवटी श्राद्धकर्म करणार्या ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणा देऊन त्याला अवश्य संतुष्ट करावे. परिश्रमाचे फळ सर्वांनाच हवे असते.
१०. अश्रद्धेने केलेल्या कृतीचे फळ भूलोकी आणि परलोकीही मिळत नसल्याने सर्व कर्म श्रद्धेने करणे आवश्यक !
श्रद्धेने जे काही केले जाते, ते सर्व फलदायी असते. ईश्वरार्पण बुद्धीने जे केले जाते, ते सर्व चांगलेच फळ देते. अश्रद्धेने केलेल्या कृतीचे फळ येथेही (भूलोकी) मिळत नाही आणि परलोकातही (मृत व्यक्तीला) मिळत नाही. कर्मपात्राची दोन फळे असतात, एक सामान्य फळ आणि दुसरे विशेष फळ ! विशेष फळ हे जसजसा भाव उत्कट होत जातो, त्यानुसार मिळते.’
– श्री. मगनलाल हरिभाई व्यास
(साभार : मासिक ‘कल्याण’, सप्टेंबर २०२०)