पोलीस विभागातील परिवर्तन आणि ईश्वरी अधिष्ठानाची आवश्यकता !
‘प्रशासकीय असो किंवा शासकीय असो, वरपासून खालपर्यंत सर्व व्यवस्था किडलेली आहे. त्याला पोलीस विभाग अपवाद नाही. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यामुळे या भ्रष्ट व्यवस्थेला कुणाचेच भय राहिलेले नाही. सर्व व्यवस्था पालटायची असेल, तर पोलीस विभागापासूनच प्रारंभ करावा लागेल. भ्रष्ट पोलीस कर्मचार्यांना खड्यासारखे बाजूला काढून उर्वरित चांगल्या कर्मचार्यांना घडवावे लागेल. त्यासाठी आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
१. लोकशाहीप्रमाणे पोलीस विभागातही विविध पळवाटा शोधल्या जाणे आणि पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून जनतेला त्रास देणे
राज्यात पोलीस विभागाची स्थापना झाली, तेव्हापासून त्यात अनेक स्थित्यंतरे झाली. पोलीस विभागातील नियमावली जरी तीच असली, तरी ज्याप्रमाणे लोकशाहीमध्ये शब्दांचे विविध अर्थ काढून पळवाटा शोधल्या जातात, त्याप्रमाणे काहीसे होत आहे. पोलीसहा समाजातीलच एक घटक आहे. ‘यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीप्रमाणे जसा समाज असतो, त्याच विचारांचा आणि धारणेचा पोलीसही घडत असतो. समाजातील लोक किंवा व्यावसायिक विविध मार्गांनी अवैध संपत्ती गोळा करतात. त्याचप्रमाणे राज्यघटनेची, तसेच ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ अशी शपथ घेतलेले आणि कायद्याची कार्यवाही करण्याचे अधिकार असलेले पोलीस कायद्याचाच धाक दाखवून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात.
२. शासकीय कर्मचार्यांनी स्वतःची कर्तव्ये पार न पाडल्याने त्यांची कामे पोलिसांना करावी लागणे आणि पोलीस भ्रष्टाचारी असल्यास अन्यांच्या हाती आयते कोलीतच मिळणे
समाजात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे, हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये शिपायांपासून मंत्र्यांपर्यंत एक यंत्रणा असते; मात्र तरीही संबंधित विभागांकडून कायद्याची योग्य प्रकारे कार्यवाही होत नाही, उदा. राज्य उत्पादन शुल्क, अन्न आणि औषधे विभाग, महसूल विभाग स्वतःचे दायित्व पार पाडत नाहीत. त्यामुळे मद्याची दुकाने, बार आणि उपाहारगृहे, अन्नपदार्थांतील भेसळ, समप्रमाणात पाणी वाटप करणे अशा प्रकारची विविध कामे काही विशेष कारणांनी पोलिसांकडे सोपवली जातात. यासाठी ‘पोलिसांविना लोक ऐकत नाहीत’, असे कारण दिले जाते. खरे पहाता या विभागांमधील लोकांमध्येच पहिल्यापासून भ्रष्टाचाराची सवय अंगात भिनलेली असते. त्यामुळे कोणतेही काम वैधपणे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे नैतिक बळच नसते. त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये पोलिसांचा सहभाग झाला, तर त्यांना ते हवेच असते; कारण पोलीस भ्रष्टाचारी असतील, तर इतर विभाग, राज्यकर्ते आणि अधिकारी यांनाही बिनबोभाटपणे भ्रष्टाचार करता येतो.
३. कालबाह्य कायद्यांचा वापर जनतेला लुबाडण्यासाठी केला जात असल्याने ते रहित केले पाहिजेत !
सर्व सरकारी विभागांमधील नोकरशाही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. त्यांच्यातील केवळ थोडेच लोक प्रामाणिक आहेत. अनेक कायदे कालबाह्य झाले आहेत. असे कायदे रहित केले जात नाहीत किंवा त्यांमध्ये सुधारणाही केल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांचा वापर जनतेची अडवणूक करून लाच मिळवण्यासाठी केला जातो.
४. वरपासून खालपर्यंत सर्व यंत्रणा किडलेली असल्याने दाद कुणाकडे मागायची ?
४ अ. वरकमाईच्या ठिकाणी स्थानांतर व्हावे, यासाठी वरिष्ठांना ‘काहीतरी’ द्यावे लागणे : राज्याचा गृहमंत्री हा पोलीस विभागाचा सर्वोच्च प्रमुख असतो. तेथूनच खालच्या पोलिसांपर्यंत भ्रष्टाचार झिरपलेला असतो. पोलीस विभाग यंत्रणा असून गृहमंत्र्यांना ‘काही’ दिल्यानंतरच ज्येष्ठ अधिकार्यांची योग्य ठिकाणी नियुक्ती (‘पोस्टिंग’) होते. ज्येष्ठ अधिकारी त्यांच्या हाताखाली असणारे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचीही ‘अशाच’ प्रकारे ‘नियुक्ती’ करतो. असे करत ते शेवटच्या पोलिसापर्यंत जाते. जे अधिकारी ‘काही’ देत नाहीत, त्यांना सहसा अल्प जनसंपर्क असलेली ‘ड्राय पोस्टिंग’ (वरकमाई नसलेल्या ठिकाणी नियुक्ती) मिळते. याचा अर्थ ज्या ठिकाणी वरकमाई होऊ शकते, त्या ठिकाणी स्थानांतर मिळवण्यासाठी बहुतांश वेळा ‘काहीतरी’ द्यावेच लागते.
४ आ. भ्रष्टाचार न करणार्या प्रामाणिक लोकांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागणे : सुदैवाने काहीही व्यवहार न होता आपले स्थानांतर झाले, तर त्या ठिकाणी इतरांसारखे वागावे लागते. एखादा भ्रष्टाचार करत नसला, तरी त्याला सर्वकाही निमूटपणे पहावे लागते. त्याने विरोध केलाच, तर त्याला समजावले जाते आणि ऐकले नाही, तर प्रचंड त्रास दिला जातो. ‘वरपासून खालपर्यंत सर्वच व्यवस्था किडलेली असल्याने तक्रार तरी कुणाकडे करायची ?’, असा प्रश्न पडतो. माध्यमांकडे जाता येत नाही; कारण अनुमतीविना माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई असते. त्यासाठी विशेष ‘पीआर्ओ’ अधिकारी नेमलेले असतात. त्या व्यतिरिक्त कुणी गेलेच, तर शिस्तभंगाची कारवाई ठरलेली असते. त्यामुळे प्रामाणिक पोलीस कर्मचार्यांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागतो. काही वेळा लाच न स्वीकारणार्यांमुळे विभागातील इतरांना अडचणी निर्माण होतात. अशा वेळी स्थानांतर ठरलेलेच असते. त्यामुळे त्याची संबंधितांना मानसिक सिद्धता ठेवावी लागते.
५. पोलीस विभागात परिवर्तन घडून येण्यासाठी प्रयत्नांसमवेत भगवंताचे आशीर्वाद आवश्यक !
५ अ. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी धर्माधिष्ठित व्यासपीठ हवे ! : सध्या सर्वच चुकीचे घडत आहे. पोलीस विभागाने घेतलेल्या प्रत्येक योग्य-अयोग्य निर्णयाचा जनमानसावर परिणाम होत असतो. त्यामुळे गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने साजेशी शिक्षा मिळालीच पाहिजे. त्यासाठी कायद्यांमध्ये सुधारणा व्हायला हवी. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची सिद्धता असली, तरी आवाज उठवण्यासाठी व्यासपीठ, तसेच सुरक्षिततेची हमी हवी. यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या मागे ईश्वरी अधिष्ठान पाहिजे. त्यासाठी धर्माधिष्ठित व्यासपीठ निर्माण होणे आवश्यक आहे.
५ आ. यंत्रणेची घडी बसवण्यासाठी सखोल अभ्यासाची आवश्यकता : भ्रष्ट पोलीस कर्मचार्यांवर कारवाई केली, तर उर्वरित चांगल्या पोलिसांना प्रशिक्षित करावे लागेल. त्यांना नैतिक-अनैतिक, सत्य-असत्य यांविषयी मार्गदर्शन करावे लागेल. सर्वांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी लागेल. सखोल अभ्यास करून तिची घडी बसवावी लागेल. अशी यंत्रणा उभारतांना ईश्वराचा आशीर्वाद आणि संकल्प आवश्यक आहे.
५ इ. भ्रष्टाचार न करणार्या पोलिसांना नियमितपणे मूल्यशिक्षण (धर्मशिक्षण) द्यायला हवे ! : उर्वरितांमध्ये शिस्त, कर्तव्यनिष्ठता, प्रामाणिकपणा इत्यादी गुण निर्माण होण्यासाठी आणि ते टिकून रहाण्यासाठी त्यांना नियमितपणे मूल्यशिक्षण (धर्मशिक्षण) द्यावे लागेल. त्यांच्यावर आधीचे अनेक वर्षांचे संस्कार असल्यामुळे ते जाण्यासही काही कालावधी लागेल. समाजात सर्वांसमोर पोलीस असतो. त्याच्या कार्यपद्धतीवर समाजाची निर्भीडता आणि सत्यवदन अवलंबून आहे. हे सर्व परिवर्तन घडून येण्यासाठी प्रयत्नांच्या समवेत भगवंताचे आशीर्वादही तितकेच आवश्यक आहेत.’
– एक माजी पोलीस अधिकारी (एप्रिल २०२१)
सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीसपोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यांत अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक |
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे चांगले आणि कटू अनुभव कळवा !
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
पोलीस-प्रशासन यांच्याविषयी आलेले चांगले आणि कटू अनुभव पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.
संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४
ई-मेल : socialchange.n@gmail.com