शब्दांच्या उपांत्य (शेवटून दुसर्या) अक्षरांच्या व्याकरणाचे नियम
सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !
‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांनी संस्कृतपासून मराठी, हिंदी आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. या भाषांच्या व्याकरणाचा पाया मात्र ‘संस्कृत भाषेचे व्याकरण’ हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण येणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्या पिढीसाठी ही गोष्ट अवघड बनली. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. २६ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘अक्षरांचे ‘र्हस्व-दीर्घ’ कसे ठरवावे ? शब्दाचे शेवटचे अक्षर अ-कारांत असेल, तर शेवटून दुसर्या अक्षराचे इ-कार किंवा उ-कार कसे लिहावेत ? तत्सम अ-कारांत शब्दांची उपांत्य अक्षरे कशी लिहावीत ?’ इत्यादींविषयी माहिती पाहिली. ‘उपांत्य अक्षरां’विषयीचा उर्वरित भाग आजच्या लेखात देत आहोत. (लेखांक ४)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/514086.html
५. काही तत्सम शब्दांची शेवटची अक्षरे दीर्घ असतात; परंतु त्या शब्दांची उपांत्य अक्षरेही दीर्घ उच्चारली जातात. अशा शब्दांची उपांत्य अक्षरे उच्चारांनुसार दीर्घच लिहावीत, उदा. धूर्त, वीणा, सीमा, तृतीया, भूमी, कीर्ती इत्यादी.
६. शेवटी जोडाक्षर असलेल्या शब्दातील उपांत्य अक्षर र्हस्व लिहावे, उदा. प्रतिनिधित्व, नाविन्य, विद्या, पुन्हा, कुस्ती, बुद्धी इत्यादी.
७. ‘पूर’ हा शब्द कोणत्याही गावाच्या नावामध्ये लिहितांना त्यातील ‘पू’ दीर्घ लिहावा, उदा. बदलापूर, कोल्हापूर, सोलापूर, राजापूर इत्यादी.
८. शब्दांची ‘सामान्यरूपे’ होतांना उपांत्य अक्षरांमध्ये होणारे पालट !
८ अ. शब्द, विशेषतः नामे वाक्यात वापरली जातांना त्यांच्या मूळ रूपांमध्ये पालट होऊन त्यांची जी नवी रूपे सिद्ध होतात, त्यांना ‘सामान्यरूपे’ म्हणतात ! : व्यक्ती, सजीव-निर्जीव गोष्टी आणि त्यांचे गुणधर्म यांना दिलेल्या नावांना ‘नाम’ असे म्हणतात, उदा. विमल, तुळस, पोळी, माधुर्य इत्यादी. जेव्हा नामे किंवा अन्य शब्द वाक्यामध्ये वापरले जातात, तेव्हा ते त्यांच्या मूळ रूपात जसेच्या तसे वापरले जात नाहीत, उदा. ‘मुकुंद भाऊ आंबा फोड दिली’, असे वाक्य नसते; कारण ते अर्थहीन आहे. त्या जागी ‘मुकुंदाने भावाला आंब्याची फोड दिली’, असे म्हटले, तर ते एक अर्थपूर्ण वाक्य होते. या वाक्यात ‘मुकुंद’चे ‘मुकुंदा’, ‘भाऊ’चे ‘भावा’, ‘आंबा’चे ‘आंब्या’ ही जी नवीन रूपे सिद्ध झाली आहेत, त्यांना ‘सामान्यरूपे’ म्हणतात.
सामान्यरूपे सिद्ध होतांना मूळ शब्दांच्या उपांत्य अक्षरांत होणारे पालट आता पाहू.
८ आ. शब्दाचे र्हस्व असलेले अंत्य (शेवटचे) अक्षर सामान्यरूप होतांना दीर्घ झाले, तर उपांत्य अक्षर र्हस्व लिहावे : काही शब्दांचे अंत्य (शेवटचे) अक्षर र्हस्व असते आणि उपांत्य अक्षर दीर्घ असते, उदा. ‘कोल्हापूर’ या शब्दात अंत्य अक्षर ‘र’ र्हस्व आहे, तर उपांत्य ‘पू’ दीर्घ आहे. या शब्दाचे ‘कोल्हापुरास’ असे सामान्यरूप झाल्यावर अंत्य अक्षर ‘र’चे ‘रा’ असे दीर्घ झाले. अशा स्थितीत मूळ शब्दातील उपांत्य अक्षर ‘पू’ हे ‘पु’ असे र्हस्व लिहावे. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
स्थूल – स्थुलातून, फूल – फुलाला, चूक – चुकीने, मिरवणूक – मिरवणुकीस, नशीब – नशिबाला, व्यासपीठ – व्यासपिठावर, शरीर – शरिराची इत्यादी.
प्रचलित मराठीमध्ये हा नियम केवळ मराठी शब्दांनाच लागू होतो. तत्सम शब्दांना लागू होत नाही. आपण मात्र हा नियम सर्व शब्दांसाठी वापरतो; कारण ‘मराठी व्याकरण शिकू इच्छिणार्यांस ‘मराठी शब्द कोणते अन् तत्सम शब्द कोणते ?’, हे ओळखता येणे कठीण होते.’ या नियमाला ‘संगीत’ आणि ‘रूप’ हे शब्द मात्र अपवादात्मक शब्द म्हणून आपण स्वीकारले आहेत. या शब्दांची सामान्यरूपे झाली, तरी त्यांची उपांत्य अक्षरे दीर्घच रहातात, उदा. संगीताचे, रूपास.
८ इ. ‘ईय’ प्रत्ययाच्या संदर्भातील संस्कृत नियम मराठीच्या विरुद्ध असल्यामुळे नियमांत समानता येण्यासाठी हा प्रत्यय लागलेले सर्व शब्द सामान्यरूप होतांना मराठी व्याकरणानुसार लिहावेत : ‘कुटुंबीय’ या ‘ईय’ प्रत्यय लागलेल्या शब्दातील ‘बी’ हे उपांत्य अक्षर दीर्घ आहे. या शब्दाचे ‘कुटुंबियांस’ असे सामान्यरूप करतांना मुळात दीर्घ असलेले उपांत्य अक्षर ‘बि’ असे र्हस्व लिहावे. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
भारतीय – भारतियांस, वर्णीय – वर्णियांशी इत्यादी.
८ ई. शब्दाची अंत्य आणि उपांत्य अशी दोन्ही अक्षरे दीर्घ असल्यास त्याचे सामान्यरूप होतांना उपांत्य अक्षर पालटत नाही ! : ‘गीता’ या शब्दातील अंत्य आणि उपांत्य अशी दोन्ही अक्षरे दीर्घ स्वरयुक्त आहेत. या शब्दाची ‘गीतेस’ आणि ‘गीतेत’ अशी सामान्यरूपे होतांना अंत्य अक्षर ‘ता’चे ‘ते’ झाले, तरी उपांत्य अक्षर ‘गी’ तसेच रहाते. याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
गांभीर्य – गांभीर्याने, तीर्थ – तीर्थाचे, लीला – लीलेने, क्रीडा – क्रीडेस, परीक्षा – परीक्षेत इत्यादी.
८ उ. तीन अक्षरी शब्दाचे पहिले अक्षर दीर्घ असेल, तर त्या शब्दाचे सामान्यरूप होतांना त्याच्या उपांत्य अक्षराचा ई-कार किंवा ऊ-कार जाऊन त्या जागी अ-कार येतो : ‘बेरीज’ या तीन अक्षरी शब्दातील ‘बे’ या अक्षरात ‘ए’ हा दीर्घ स्वर मिसळला आहे. त्यामुळे या शब्दाचे सामान्यरूप होतांना त्यातील उपांत्य ‘री’ या अक्षरामधील ई-कार जाऊन त्याच्या जागी अ-कार येतो, म्हणजे ‘री’चा ‘र’ होतो. अशा प्रकारे हा शब्द ‘बेरीज – बेरजेत, बेरजेचा’, असा पालटतो. याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
पाटील – पाटलाने, खाटीक – खाटकाचे,
बारीक – बारक्याशी, लाकूड – लाकडाचा, माणूस – माणसास,
कापूर – कापराला इत्यादी.
८ ऊ. तीन अक्षरी शब्दांतील मधले अक्षर ‘क’चे किंवा ‘प’चे द्वित्व (तेच अक्षर दोनदा उच्चारणे) असेल, म्हणजे ‘क्क’ किंवा ‘प्प’ असे असेल, तर सामान्यरूप होतांना हे द्वित्व नाहीसे होते, उदा. टक्कर – टकरीत, दुक्कल (जोडी) – दुकलीने, चप्पल – चपलेला, दुप्पट – दुपटीने इत्यादी.
८ ए. तीन अक्षरी शब्दाचे उपांत्य अक्षर ‘ई’ किंवा ‘ऊ’ असेल, तर अशा शब्दांचे सामान्यरूप होतांना ‘ई’च्या जागी ‘य’ आणि ‘ऊ’च्या जागी ‘व’ येतो, उदा. काईल (रुंद तोंडाची आणि कान नसलेली कढई) – कायलीला, देऊळ – देवळात, पाऊल – पावलास इत्यादी.
९. तीन अक्षरी क्रियापदापासून दोन वाक्यांना जोडणारे क्रियापदाचे रूप सिद्ध होतांना त्याच्या मधल्या अक्षराला दीर्घ ‘ऊ’कार लागतो !
‘धावणे’ हे तीन अक्षरी क्रियापद आहे. ‘त्याने गावकर्यांच्या साहाय्याला धावून स्वतःतील माणुसकीचे दर्शन घडवले’, या वाक्यामध्ये ‘धावणे’ या क्रियापदापासून ‘धावून’ हे रूप सिद्ध होते. या प्रक्रियेत मूळ क्रियापदातील ‘व’ या अक्षराला दीर्घ ‘ऊ’कार लागून त्याचा ‘वू’ होतो. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
करणे – करून, खेळणे – खेळून, बोलणे – बोलून, फिरणे – फिरून इत्यादी.
१०. शब्दाला ‘इक’ आणि ‘इत’ प्रत्यय लागल्यावर त्याच्या उपांत्य अक्षरामध्ये होणारे पालट !
१० अ. ‘धातू’ अथवा शब्द यांपासून नवीन अर्थपूर्ण शब्द सिद्ध करण्यासाठी त्यांच्यापुढे लावण्यात येणार्या अक्षरांना ‘प्रत्यय’ म्हणतात ! : जातो, देते, हसतो आणि जिंकला हे शब्द जाण्याची, देण्याची, हसण्याची अन् जिंकण्याची क्रिया दर्शवतात. ते जेव्हा कोणत्याही वाक्याच्या शेवटी येतात, तेव्हा त्यांना ‘क्रियापदे’ म्हणतात. या क्रियापदांमध्ये ‘जा’, ‘दे’, ‘हस’ अन् ‘जिंक’ हे मूळ शब्द आहेत. या मूळ शब्दांना ‘धातू’ म्हणतात. धातूंपासून किंवा अन्य शब्दांपासून नवीन अर्थपूर्ण शब्द सिद्ध करण्यासाठी त्यांच्यापुढे एक अथवा अधिक अक्षरे जोडली जातात. या अक्षरांना ‘प्रत्यय’ म्हणतात. वरील शब्दांमध्ये ‘तो’, ‘ते’ आणि ‘ला’ हे ‘प्रत्यय’ आहेत. मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारचे प्रत्यय आहेत; मात्र आपण या ठिकाणी उपांत्य अक्षरांवर परिणाम करणार्या ‘इक’ आणि ‘इत’ या दोनच प्रत्ययांचा विचार करणार आहोत.
१० आ. तत्सम शब्दांना र्हस्व ‘इ’ असलेले ‘इक’ आणि ‘इत’ प्रत्यय लागतात. हे प्रत्यय लागल्यावर त्या शब्दांतील उपांत्य अक्षरे उच्चारांनुसार र्हस्व लिहावीत, उदा. अनामिक, नैतिक, ऐच्छिक, औपचारिक, खंडित, केंद्रित, अपेक्षित इत्यादी.
१० इ. तत्सम नसलेल्या मराठी शब्दांना दीर्घ ‘ई’ असलेले ‘ईक’ आणि ‘ईत’ प्रत्यय लागतात. हे प्रत्यय लागल्यावर त्या शब्दांतील उपांत्य अक्षरे दीर्घ होतात, उदा. मोकळीक, जवळीक, पडीक, खणखणीत, एकंदरीत, कडकडीत, कुळकुळीत इत्यादी.’
– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२१)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/517797.html