नाशिक येथील श्री कालिकादेवीच्या दर्शनासाठी १०० रुपये शुल्क आकारणार !
|
|
नाशिक – येत्या नवरात्रोत्सवात येथील ग्रामदेवता श्री कालिकादेवी मंदिराच्या विश्वस्तांनी देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांकडून १०० रुपये शुल्क आकारण्याचा धर्मद्रोही निर्णय घेतला आहे. हे शुल्क ‘टोकन’ (बिल्ला) स्वरूपात असणार आहे. मंदिराच्या विश्वस्तांकडून टोकन घेणे बंधनकारक केले आहे. टोकन घेतल्याविना भाविकांना देवीचे दर्शन होणार नाही. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील मंदिरे बंद होती; मात्र राज्यशासनाने नुकतीच मंदिरे उघडण्याची अनुमती दिली आहे.
श्री कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील म्हणाले, ‘‘हे टोकन भाविकांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने मिळणार आहे. यासाठी विशिष्ट ‘सॉफ्टवेअर’ (संगणकातील महत्त्वाचा तांत्रिक भाग) मंदिराकडून सिद्ध करण्यात आले आहे. कोरोनामुळे पोलीस प्रशासनाशी चर्चा करून, तसेच शासनाच्या नियमाधीन राहून आम्ही आमच्या पद्धतीने टोकनपद्धत चालू केली आहे. टोकनसाठी सिद्ध करण्यात येणार्या ‘सॉफ्टवेअर’साठी व्यय आहे. मंदिरात सुरक्षा कर्मचारी नियुक्त करणे, स्वच्छता आणि औषध फवारणी करणे, या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मंदिर २४ घंटे उघडे असेल. एका घंट्यात ६० भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. प्रसाद, फुले आणि नारळ हे देवीला अर्पण करता येणार नाही.’’
श्री कालिकादेवी मंदिराच्या विश्वस्तांनी वर्ष २०१८ मध्येही सशुल्क दर्शनपद्धत चालू केली होती. त्याला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता; मात्र तरीही विश्वस्त मंडळ स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले होते. आताही १०० रुपये टोकन पद्धतीच्या निर्णयाला भाविकांकडून विरोध होत आहे.