जरंडेश्वर साखर कारखान्याकडून सरकारची मालमत्ता हडप ! – भाजपचा आरोप
सातारा, २ ऑक्टोबर (वार्ता.) – जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या मालकीच्या ११ एकर भूमीवर जरंडेश्वर साखर कारखान्याने अतिक्रमण करत संरक्षक भिंत बांधली आहे. या माध्यमातून जरंडेश्वर कारखान्याने सरकारची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप केली आहे, असा आरोप भाजपचे बबनराव कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणी कांबळे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, जिहे-कटापूर योजनेसाठी चिमणगाव येथील कारखान्याची १५७ गुंठे भूमी संपादित केली. या संपूर्ण क्षेत्राला २० फूट उंचीची संरक्षक भिंत बांधली असून रस्त्यासाठी अवैधरित्या उत्खनन करून मुरुम आणि डांबराची ‘रॉयल्टी’ बुडवली आहे. याविषयी महसूल प्रशासन काही बोलण्यास सिद्ध नाही. अतिक्रमित क्षेत्रातून २५ फूट खोलीवरून जिहे-कटापूर योजनेची ‘पाइपलाईन’ गेली आहे. भविष्यात तिथे पाण्याचा दुरूपयोग होऊ शकतो. जरंडेश्वर कारखान्याने हानीभरपाई घेतली नसल्याचे सांगितले जात असले, तरी भविष्यात ही सरकारी मालमत्ता कारखान्याची होऊ शकते. त्यामुळे याविषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.