व्हिडिओ गेम्स खेळणे आणि सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न रहाणे, यांमुळे व्यक्तीवर होतो नकारात्मक परिणाम ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा
|
मुंबई – ‘व्हिडिओ गेम्स’ आणि ‘फेसबूक’ यांसारखी सामाजिक संकेतस्थळे आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. त्यांत सर्वांचा पुष्कळ वेळ जातो आणि त्यांचा आपल्या जीवनावर पुष्कळ प्रभावही पडतो. ‘व्हिडिओ गेम्स’ आणि सामाजिक संकेतस्थळे यांचे शारीरिक अन् मानसिक स्तरावर होणार्या परिणामांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही हानीकारक परिणाम होतात, असे संशोधनात आढळले आहे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे रामनाथी (गोवा) येथील श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ‘दी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, श्रीलंका’ (The International Institute of Knowledge Management (TIIKM), Sri Lanka) यांनी २३ सप्टेंबर २०२१ या दिवशी ‘ऑनलाईन’आयोजित केलेल्या ‘द एट्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज्, २०२१’ (The 8th International Conference on Arts and Humanities (ICOAH) 2021, Sri Lanka) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. श्री. क्लार्क यांनी ‘व्हिडिओ गेम्स खेळणे आणि सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न रहाणे यांचे सूक्ष्म परिणाम’ हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.
या वेळी श्री. क्लार्क यांनी ‘प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)) आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून ‘व्हिडिओ गेम्स’ खेळणे अन् सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न रहाणे यांचे होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या संशोधनाविषयी दिलेली माहिती संक्षिप्त रूपात पुढीलप्रमाणे –
१. ‘यू.ए.एस्.’च्या आधारे व्हिडिओ गेम्स खेळण्याच्या परिणामाचा अभ्यास महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात निवास करणार्या ५ साधकांना केवळ १ घंटा एक आक्रमक ‘व्हिडिओ गेम’ (‘फर्स्ट पर्सन शूटर’ व्हिडिओ गेम) खेळण्याविषयी सांगण्यात आले. हा गेम खेळण्याआधी, तसेच नंतर साधकांचे ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या आधारे मापन करण्यात आले. गेम खेळल्यानंतर या पाचही साधकांमधील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली किंवा त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून झाली, असे आढळले. त्यांपैकी ज्या २ साधकांमध्ये गेम खेळण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा नव्हती, त्यांत गेम खेळल्यानंतर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यांपैकी आधीच आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधकातील नकारात्मक ऊर्जा ७२ टक्क्यांनी वाढली.
२. सामाजिक संकेतस्थळ पहाण्याच्या परिणामाचा ‘यू.ए.एस्.’च्या आधारे करण्यात आलेला अभ्यास संशोधन केंद्रात निवास करणार्या ५ साधकांना त्यांच्या नेहमीच्या सामाजिक संकेतस्थळावरील खात्यामधील ‘पोस्ट्स’ (विविध विषयांवरील लिखाण अथवा कार्यक्रमांच्या ध्वनीचित्रफिती) एक घंटा पहाण्याविषयी सांगण्यात आले. पहाण्यापूर्वी आणि नंतर या पाचही साधकांचे ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या आधारे मापन करण्यात आले. साधकांनी केवळ त्यांच्या ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ खात्यातील पोस्ट पाहिल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा १५ ते ३० टक्के वाढल्याचे आढळले.
३. आध्यात्मिक संकेतस्थळ पहाण्याच्या परिणामाचा ‘यू.ए.एस्.’च्या आधारे केलेला अभ्यास वरील गटातील २ साधकांना ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन आणि साधना मांडणार्या संकेतस्थळाच्या ‘फेसबूक’ खात्यातील पोस्ट पहाण्याविषयी सांगण्यात आले. पहाण्यापूर्वी आणि नंतर केलेल्या मापनातून लक्षात आले की, या साधकांतील नकारात्मक ऊर्जा घटली, तर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. यावरून सामाजिक संकेतस्थळावर आपण नेमके कशा प्रकारचे साहित्य पहातो ? हा पहाणार्यावर कोणता परिणाम होणार ? हे ठरवणारा महत्त्वाचा निकष असल्याचे लक्षात आले.
यावरून ‘व्हिडिओ गेम्स’ आणि सामाजिक संकेतस्थळे यांचा आपण कसा वापर करतो ? आणि त्या माध्यमातून काय पहातो ? यावर त्यांचा स्वतःवर सकारात्मक कि नकारात्मक परिणाम होणार, हे ठरते. दुर्दैवाने बहुतांश व्हिडिओ गेम्स आणि सामाजिक संकेतस्थळांवरील लिखाण नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतात. आपण काय पहातो ? याविषयी जर सतर्क राहिलो, तर ते हानीकारक होण्याऐवजी आपल्या आध्यात्मिक उन्नतीला पूरक होऊ शकेल !
६० हून अधिक शोधनिबंधांपैकी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधाला ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरणा’ चा पुरस्कार !या परिषदेत २० हून अधिक देशांतील ६० हून अधिक शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. यांपैकी ५ सादरकर्त्यांना ‘उत्कृष्ट सादरकर्ता’ पुरस्कारासाठी निवडण्यात आले. यामध्ये श्री. शॉन क्लार्क यांची निवड करण्यात आली आहे. |
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने विविध वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर केलेले हे ७९ वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्वविद्यालयाने १५ राष्ट्रीय आणि ६३ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ६ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. |