कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस प्रलंबित असणार्यांनी त्वरित लस घ्यावी ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी
सांगली, २ ऑक्टोबर – सांगली जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख १० सहस्र जणांनी पहिला डोस, तर ६ लाख ४६ सहस्र जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात विहित कालावधी उलटल्यानंतरही दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या १ लाख ९३ सहस्र ६८४ इतकी मोठी आहे. लसीकरणासाठी आवश्यक डोसही उपलब्ध आहेत. तरी ज्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी त्वरित तो घ्यावा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. कोरोना लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले.
ज्या गावांमध्ये दुसरा डोस प्रलंबित असणार्यांची संख्या अधिक आहे, अशा गावांमध्ये लसीकरणासाठी विशेष मोहीम घेण्याविषयीही निर्देशित केले. या वेळी त्यांनी दुसरा डोस ज्यांचा प्रलंबित आहे अशांच्या गावनिहाय सूची करून त्यांच्याशी सातत्याने संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. जत तालुक्यात जिल्ह्यातील अन्य भागांच्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण अल्प असून या ठिकाणी आवश्यकतेनुसार अधिकचे मनुष्यबळ उपयोगात आणावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. जिल्ह्यात आजपर्यंत ‘कोविशिल्ड’ लसीचे २२ लाख २८ सहस्र, तर ‘कोव्हॅक्सीन’ लसीचे १ लाख ८६ सहस्र ९६० डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.