ठाणे आणि नवी मुंबई येथे वाहतूक विभागातील पोलिसांकडून केला जातो कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार !
|
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून हा भ्रष्टाचार थांबवावा, ही नागरिकांची अपेक्षा ! – संपादक
मुंबई, १ ऑक्टोबर (वार्ता.) – बाहेरील राज्यांतून येणारी अवजड वाहने पथकर नाक्यावर अडवून प्रत्येक वाहन चालकाकडून ८०० रुपये वसूल केले जातात. अशा प्रकारे ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरातील पथकर नाक्यांवर दिवसाला लाखो रुपयांची अवैधपणे वसुली केली जाते. हा व्यवहार एका मासाला ७-८ कोटी रुपयांचा इतका होत असून यामध्ये वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी सहभागी आहेत, तसेच याचा हप्ता मंत्र्यांनाही जातो, असा गंभीर आरोप वाहतूक विभागाच्या मुंबई येथील मुख्य नियंत्रण कक्षाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके यांनी केला आहे. ‘याविषयी वरिष्ठांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे’, असे टोके यांनी सांगितले.
१. सुनील टोके यांनी २० जुलै २०२१ या दिवशी ठाणे शहराचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पत्र पाठवून या प्रकाराची माहिती दिली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये टोके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यासंदर्भात पत्र लिहिले; मात्र अद्याप कारवाई न झाल्यामुळे टोके यांनी याविषयी माहिती देणारा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केला आहे.
२. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात टोके यांनी म्हटले आहे की, नारपोली, कळवा-खारेगाव, कल्याण फाटा, कापूरवाडी, पनवेल, महापे, कळंबोली, तळोजा आदी पथकर नाक्यांवर नियमित २ सहस्र ८०० रुपये इतक्या पावत्या फाडल्या जातात. प्रत्येक पावती ८०० रुपयांची असते. यातून दिवसाला २२ लाख रुपये जमा केले जातात. या पावतीच्या आधारे एक मास त्या चालकाला अडवले जात नाही.
३. असा प्रकार मीरा-भाईंदर येथील गायमुख आणि फाऊंटन येथे चालू होता; मात्र पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी कारवाई करून तो प्रकार बंद पाडला.
४. ठाणे आणि नवी मुंबई येथील पोलीस आयुक्तालयात वारंवार तक्रार देऊनही या प्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाही.
… हा तर भ्रष्टाचारी अधिकार्यांना ‘क्लीन चीट’ देण्याचा प्रकार ! – सुनील टोके, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक विभागया प्रकरणात वाहतूक विभागातील काही ठराविक सनदी अधिकारी, तसेच अन्य पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. असे असतांना वाहतूक विभागातील अधिकार्यांनाच याविषयी चौकशी करायला सांगणे म्हणजे या भ्रष्टाचाराविषयी ‘क्लीन चीट’ देण्याचा प्रकार आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी ठाणे शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन साहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश पालवे यांच्याकडे देण्यात आली होती; मात्र मी ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी वाहतूक विभागाऐवजी अन्य प्राधिकरणाकडून करण्याची विनंती केली आहे. |
बोगस पावत्या देऊन चालू आहे लूट !
या प्रकरणामध्ये ‘टोईंग’साठी नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून ‘ऑन ट्रॅफिक पोलीस ट्युटी’ असा ‘स्टॅम्प’ असलेल्या बोगस पावत्या देण्यात येत आहेत. या पावतीवर कोणत्या ठिकाणचे वाहतूक पोलीस आहे, तसेच पावती देणार्या पोलिसाचा ‘बॅच’ क्रमांक, ‘जीएस्टी’ क्रमांक याविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही. अशा प्रकारच्या बोगस पावत्या देऊन हा भ्रष्टाचार चालू आहे. सध्या हाच प्रकार ‘ई चलना’द्वारे चालू आहे.