गोव्यात राजकीय कार्निव्हल चालू आहे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
पणजी, १ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात नवीन राजकीय पक्षांचा प्रवेश होत आहे आणि राजकीय नेते वारंवार पक्षांतर करत आहेत. गोव्यात ‘राजकीय कार्निव्हल’ चालू झाला आहे. शिवसेना गोव्यात कुठल्याही पक्षाशी युती न करता विधानसभेच्या २२ ते २५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेना सत्तेवर आल्यास गोव्यातील कॅसिनो बंद करणार आणि अमली पदार्थ व्यवहाराच्या विरोधात कृती करणार आहे, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. खासदार संजय राऊत येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘तृणमूल काँग्रेस गोव्यात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे ऐकले आहे. देहली आणि बंगाल येथील राजकीय पक्ष गोव्यात निवडणूक लढवू इच्छित आहेत आणि अनेक राजकीय नेते पक्षांतर करत आहेत. गोव्यात सध्या ‘राजकीय कार्निव्हल’ चालू आहे. गोव्यात शिवसेना गेल्या २० वर्षांपासून आहे. शिवसेनेचे गोव्याशी भावनिक आणि सांस्कृतिक नाते आहे.’’ ‘महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या विरोधी पक्षांशी युती करणार का?’ या प्रश्नाला उत्तर देतांना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ‘‘गोव्याचे राजकारण महाराष्ट्रापेक्षा निराळे आहे. शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याने इतर पक्षांच्या मतांचे विभाजन होईल असे नव्हे, तर शिवसेनेचे मतदार हे निराळे आहेत आणि शिवसेना बहुमताने निवडणूक जिंकेल.’’