पोलीस ठाण्यांची माहिती ‘एका क्लिक’वर मिळावी, यासाठी यंत्रणा सिद्ध करा ! – सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे), महाराष्ट्र
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात नवीन येणार्या अधिकार्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याची माहिती ‘एका क्लिक’वर मिळावी, यासाठी यंत्रणा सिद्ध करावी, अशी सूचना महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिली.
गृह राज्यमंत्री पाटील यांनी नुकताच पोलीस अधीक्षक कार्यालयाचा आढावा घेतला, तसेच भारत नेट, म्हाडा, पंतप्रधान आवास योजना, परिवहन आणि एस्.टी. महामंडळ यांच्या अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.
या वेळी गृह राज्यमंत्री पाटील यांनी ‘कोरोना आणि ‘तौक्ते’ चक्रीवादळ यांच्या कालावधीत जिल्हा पोलीस यंत्रणेने चांगले काम केल्याचे सांगून पोलीसदलाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, ‘‘पोलिसांची विश्वासार्हता समाजात टिकून आहे, म्हणूनच राज्याची प्रगती चालू आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम पोलीस करत आहेत. प्रायोगिक तत्त्वावर पोलीस अधिकार्यांनी तालुक्याचे पालकत्व घेऊन गावागावांतील तंटे मिटवावेत. मोहल्ला समिती आणि शांतता समिती यांमध्ये १८ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांचा समावेश करावा.’’