तुळजापूर आणि कोल्हापूर येथील देवींच्या मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वसिद्धता चालू !
श्री तुळजाभवानीदेवीचे भाविकांना दर्शन घेता येणार ! – कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, धाराशिव
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – राज्यशासनाने मंदिर उघडण्याचा निर्देश दिल्यामुळे तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वसिद्धता चालू करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मंदिर संस्थानचे प्रतिनिधी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी संबंधित अधिकार्याची बैठक जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात श्री तुळजाभवानीदेवीचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
१. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी ३ दिवसांची यात्रा यावर्षी भरवण्यात येणार नाही. असे असले तरी यानिमित्ताने सर्व पूजा आणि विधी होणार असून भाविकांना कोरोना संसर्गाचे नियम पाळून दर्शन घेता येणार आहे’, अशी माहिती जिल्हाधिकार्यांनी या वेळी दिली. या वेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक नीवा जैन, तुळजापूरचे तहसीलदार आणि व्यवस्थापक मंदिर संस्थान योगिता कोल्हे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
२. ‘या महोत्सवाच्या निमित्ताने वेळोवेळी घोषित करण्यात येणार्या आदेशांचे आणि सूचनांचे संबंधित अधिकार्यांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल’, असेही दिवेगावकर यांनी सांगितले.
३. कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना दर्शन घेता आले नाही; मात्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर खुले होणार असल्याने भाविकांसह व्यापार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी मंदिरात सिद्धता चालू !
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या सिद्धतेला वेग आला आहे. यात रंगरंगोटीसह स्वच्छतेचे काम चालू आहे. श्री महालक्ष्मीदेवीचे भाविकांना दर्शन घेता येणार असून त्या संदर्भातील नियमावलीही लवकरच घोषित करण्यात येणार आहे.