महिला प्रवाशांना समाजकंटकांचा त्रास होऊ नये, यासाठी रात्री ‘एस्.टी’चे दिवे चालूच ठेवणार ! – राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय
असे वरवरचे उपाय काढण्यापेक्षा समाजकंटकांचे त्रास देण्याचे धारिष्ट्य होणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे !
नागपूर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने रात्री प्रवास करणार्या महिलांना समाजकंटकांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी ‘एस्.टी.’मधील दिवे बंद न करण्याच्या सूचना ‘एस्.टी.’च्या चालक-वाहक यांना दिल्या आहेत. याविषयीचे निर्देश राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालयांना मिळाले आहेत. अनेक महिला रात्री एकट्याने प्रवास करत असतांना त्यांना काही समाजकंटक पुरुषांकडून त्रास होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन वरील निर्णय घेण्यात आला.
येथील ‘एस्.टी.’ महांमडळाचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे म्हणाले की, ‘एस्.टी.’ महामंडळाच्या ताफ्यात १६ सहस्र ५०० ‘एस्.टी.’ असून यामध्ये साध्या बस, निमआराम, एस्.टी. महामंडळाच्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या शिवशाही, शिवनेरी, अश्वमेघ या ‘एस्.टी.’ बसगाड्यांचा समावेश आहे. कालमर्यादा संपल्याने प्रतिवर्षी महामंडळाच्या ताफ्यातून शेकडो ‘एस्.टी.’ बस भंगारात काढल्या जातात; परंतु हल्ली निधीचा अभाव आणि कोरोनाचे संकट यांमुळे ताफ्यात नवीन ‘एस्.टी.’ भरती करता आल्या नव्हत्या; परंतु नवीन साध्या प्रकारातील ‘एस्.टी.’ घेण्याचा निर्णय नुकताच झाला आहे.