श्रद्धा आणि बुद्धीप्रामाण्य !
३० सप्टेंबर २०२१ या दिवशीच्या लेखात आपण ‘जाणीव आणि नेणिव यांच्या पलीकडील अतिंद्रिय ज्ञानाची पातळी, संतांनी केलेल्या चमत्कारांमागील कारण, ‘बुद्धीप्रामाण्य’ म्हणजे काय ?, स्वतःच्या बुद्धीची शक्ती ओळखणे हाच खरा बुद्धीवाद’, याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/515382.html
भ्रम दूर करणारे संत !
निर्भेळ सत्याचा विचार करतांना त्याचे ज्ञान आपल्या बुद्धीला पूर्णपणे केव्हाही होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. फार काय, व्यावहारिक सत्यालाही मर्यादा असतात; म्हणूनच आपणाला जशी वाटते तशी प्रत्येक गोष्ट पूर्ण सत्य असतेच असे नाही. यास्तव शास्त्रकारांनी अशा स्थितीला ‘प्रातिभासिक’ (वास्तविक नसलेले, भ्रम असलेले) सत्य मानले आहे. अंधुक प्रकाशात दोरी पाहून सापाचा भ्रम संभवनीय असते. म्हणूनच इंद्रियाद्वारे होणारे सत्याचे ज्ञान प्रत्यक्ष असूनही ते काही वेळा प्रातिभासिक सत्यच असते; मात्र व्यावहारिक सत्य प्रगट होताच प्रातिभासिक सत्य नाहीसे होते. म्हणून ज्या वेळी गाडी उभी रहाते, त्या वेळी मनात येते की, वृक्ष काही धावत नव्हते, गाडीसमवेत मी पळत होतो. डोळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले ज्ञान खोटे ठरते. ज्याप्रमाणे व्यावहारिक सत्य प्रगट होताच प्रतिभासिक सत्य खोटे ठरते, त्याप्रमाणे संतवाणीतून पारमार्थिक सत्य प्रगट होताच व्यावहारिक सत्यही खोटे पडते. प्रातिभासिक सत्य खोटे ठरताच आपण व्यावहारिक सत्य स्वीकारतो; पण ‘पारमार्थिक सत्यापुढे व्यावहारिक सत्यही खोटे आहे’, असे साक्षात्कारी संत बाहू उभारून सांगतात. त्या वेळी ‘हा श्रद्धेचा विषय आहे’, असे म्हणून आपण तिकडे दुर्लक्ष करतो हे योग्य नव्हे. वस्तुतः ही अत्यंत बुद्धीनिष्ठ गोष्ट आहे आणि तिचा फार खोलवर आणि श्रद्धापूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
श्रद्धा म्हणजे काय ?
आता श्रद्धा म्हणजे काय ? याचा विस्तारपूर्वक विचार करू. ‘श्रत् + धा (बुद्धी)’ (संदर्भ : ‘शब्दकल्पद्रुम’ ग्रंथ) या मूळ रूपांपासून श्रद्धा शब्द बनला आहे. म्हणजे बुद्धी हेच श्रद्धेचे अधिष्ठान आहे. तसेच श्रद्धेमध्ये सत् म्हणजे अविनाशित्व असल्यामुळे ती बुद्धीपेक्षा श्रेष्ठ ठरते. ‘श्रद्धा’ हा शब्दप्रयोग व्यवहारात योग्य ठिकाणी होत नसल्यामुळे त्या शब्दाचे अचूक ज्ञान आपणाला होत नाही, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मनाचा दृढ विश्वास, मनाची स्वाभाविक प्रवृत्ती आणि काही झाले तरी ही प्रवृत्ती न पालटणे, या तीन गोष्टींचा संगम म्हणजे श्रद्धा. मानवी जीवनात ज्ञानानुरूप कर्म होते आणि कर्मानुरूप स्वभाव बनतो. या स्वभावाचे रूप म्हणजेच श्रद्धा होय. ज्ञानाचा मानवी बुद्धीवर परिणाम होतो आणि त्यामुळे माणसाचा स्वभाव घडतो. जन्मजन्मांतरापासून माणूस जे काही विचार करत आला आहे, त्याने जी काही कृती केली असेल, या सर्वांचा परिणाम माणसाचे शरीर आणि मन यांवर होतो. शरीर नष्ट झाल्यावर शरिराचे परिणामही नष्ट होतात; पण मनावरचे परिणाम कायम रहातात. या मनावर होणार्या परिणामामुळेच माणसाची मनोघटना घडते. पुनर्जन्म शास्त्रीय आहे यात वाद नाही. त्याप्रमाणे ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती म्हणजे विचार अन् कृती या दोहोंचे परिणाम आपले शरीर आणि मन यांवर होतात. शरीर जाळल्यावर त्याच्यावरचे परिणाम जरी नष्ट होत असले, तरी मनावरचे परिणाम शेष रहातात आणि त्याचाच पुनर्जन्मी स्वभाव किंवा मनोघटना बनते. थोडक्यात म्हणजे माणूस स्वतःचे ठिकाणी असलेल्या ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती यांद्वारे ज्ञानानुरूप कर्म करतो आणि कर्मानुरूप त्याचा स्वभाव बनतो. पुढे त्या स्वभावाप्रमाणे त्याची श्रद्धा विकसीत होते. ‘देहिनां सा स्वभावजा ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १७, श्लोक २) म्हणजे ‘माणसांची ती (श्रद्धा) स्वभावतःच उत्पन्न झालेली असते.’ मनुष्यात स्वभावजन्य श्रद्धा असते; म्हणूनच जितक्या प्रमाणात ज्ञान भव्य, तितक्या प्रमाणात माणसाची श्रद्धाही भव्य होते आणि जितके ज्ञान दुबळे तितकी श्रद्धाही दुबळी होते. व्यवहारामध्ये ही दुबळी श्रद्धाच अधिक दिसून येत असल्यामुळे त्यावर टीका होते. श्रद्धेचा हा रथ स्थायीभाव लक्षात घेऊनच गीतेमधे श्रद्धेचे सात्त्विक, राजस आणि तामस, असे तीन प्रकार सांगितले आहेत.
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १७, श्लोक ३
अर्थ : हे भारता (भरतवंशी अर्जुना), सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे, तो स्वतःही तोच आहे (त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते).
आपल्या श्रद्धेच्या पाठीशी असलेले सत्त्व कसे आहे ? यावरच आपले जीवन आधारित आहे. जर ते सत्य सुंदर आणि भव्य असेल, तर तसे जीवनही सुंदर आणि भव्य होईल; पण ते जर का निःसत्त्व असेल, तर जीवनही तसेच निःसत्त्व होईल. अशा तर्हेने भगवंतानी कर्मयोगाची महती सांगणार्या गीतेमध्येच श्रद्धेचेही सुंदर बौद्धिक निरूपण केले आहे. शेवटी भगवान सांगतात की, यज्ञ, दान, तप आदीही जर ईश्वरप्रीत्यर्थ केले, तरच ते ‘सत्’ ठरतात आणि जर ती स्वार्थी किंवा अश्रद्धे भावनेने केली, तर ती ‘असत्’ ठरतात.
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १७, श्लोक २७
अर्थ : तसेच यज्ञ, तप आणि दान यांमध्ये जी स्थिती म्हणजे आस्तिक बुद्धी असते, तिलाही ‘सत्’ असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने ‘सत्’ असे म्हटले जाते.
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १७, श्लोक २८
अर्थ : हे पार्था, श्रद्धेविना केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व ‘असत्’ म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होते, ना परलोकात.
अविनाशी असणारी श्रद्धा !
भगवद्गीतेच्या १७ व्या अध्यायात श्रद्धा-बुद्धीचा उत्कृष्ट मेळ आढळून येतो. हा अध्याय म्हणजे जीवनातील महत्त्वाच्या कर्माविषयी केलेले दैवी मार्गदर्शन होय. ज्या गीतेतील तत्त्वज्ञान आज जगमान्य पावले आहे ती गीता ही श्रद्धा-बुद्धीचे परस्परावलंबित्व मान्य करते. म्हणूनच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी श्रद्धेवर सरसकट टीका करतांना ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊनच टीका करावी. स्वार्थी किंवा अस्वार्थी माणसांची तथाकथित श्रद्धा ध्यानात घेऊन श्रद्धा या कल्पनेवरच टीका करणे म्हणजे श्रद्धेचे मूळ अधिष्ठान जी बुद्धी त्यावरच टीका करण्यासारखे आहे. आम्र (आंब्याला) फळाला फळांचा राजा मानले आहे. त्याची महती रायवळ आंब्याची उदाहरणे देऊन न्यून होणार नाही. तद्वतच निःसत्त्व श्रद्धेची उदाहरणे देऊन श्रद्धा या मूळ मानवी स्वभाव-वैशिष्ट्याला बाधा होणार नाही; कारण ती अविनाशी आहे.’
(समाप्त)
– एन्.जी. परुळेकर
(साभार : मासिक ‘ज्ञानदूत’, दीपावली अंक, वर्ष १९७७)