मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्राचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी ३ मासांनी वाढवला !
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
मुंबई – वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च या दिवशी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी निलंबित करण्यात आलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्राचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी ३ मासांनी वाढवण्यात आला आहे. येत्या ३० सप्टेंबर या दिवशी त्यांचा निलंबन कालावधी संपणार होता.
श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी संपण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य वनसेवेतील काही अधिकार्यांनी ‘त्यांचे निलंबन रहित करण्यात येऊ नये’, अशी मागणी केली होती, तर निलंबन रहित व्हावे, यासाठी रेड्डी यांच्या मंत्रालयातील चकरा वाढल्या होत्या. ‘त्यांचा निलंबन कालावधी न वाढवल्यास त्यांना पदस्थापना मिळेल आणि हे प्रकरण गुंडाळले जाईल’, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.