विकृत ‘बिग बॉस’ला हद्दपार करा !

‘बिग बॉस’सारख्या अश्लीलता पसरवणार्‍या कार्यक्रमांवर सरकारने बंदी घालावी, ही संस्कृतीप्रेमींची अपेक्षा !

गेल्या आठवड्यापासून ‘बिग बॉस मराठी’या कार्यक्रमाचा भाग ३ चालू झाला असून १५ स्पर्धकांमध्ये कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते यांसह अन्य लोकांचा त्यात समावेश आहे. पुढचे १०० दिवस हे सर्वजण ‘बिग बॉस’च्या घरात रहाणार आहेत. वास्तविक ज्या कार्यक्रमाचा मराठी भाषा-संस्कृती यांचा काडीमात्र संबंध नाही, ज्या कार्यक्रमात भांडणे, मारामारी, राजकारण, अश्लील भाषेत संभाषण अशा अनेक ताळतंत्र सोडलेल्या गोष्टी घडत असतात, असा कार्यक्रम दुर्दैवाने दूरचित्रवाहिनी पहाणार्‍या मालिकांसमवेत ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम प्रेक्षक तितक्याच आवडीने पहातात.

दोन वर्षांपूर्वी याच कार्यक्रमामधील स्पर्धक राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे समाजात अशा प्रकारच्या संबंधांना प्रोत्साहन मिळते, असा आरोप करत नाशिकमधील कायद्याचे विद्यार्थी ऋषिकेश देशमुख यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. ‘ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. यातील राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांचे वागणे नैतिकता आणि संस्कृती यांना धरून नाही. हा कार्यक्रम तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकत नाही, त्यामुळेच मी तक्रार दिली आहे’, असे ऋषिकेश यांनी सांगितले होते. हिंदी भाषिकांसाठी असलेल्या ‘बिग बॉस १४’ मध्ये एजाज खान आणि पवित्र पुनिया हे एकमेकांवर प्रेम करत असून त्यांची आक्षेपार्ह दृश्ये त्यात दाखवण्यात आली होती. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या अशा कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करणी सेनेने केली होती.

अशा प्रकारे भारतीय संस्कृतीशी काहीएक देणे-घेणे नसलेल्या, विकृतीचे उदात्तीकरण करणार्‍या कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांना अयोग्य कृती करण्यास एक प्रकारे प्रोत्साहनच मिळते. प्रसिद्धीमाध्यमेही अशा दर्जाहीन कार्यक्रमांना वारेमाप प्रसिद्धी देत असल्याने एक प्रकारे त्यांचे उदात्तीकरणच केले जाते. इतके होऊनही ‘बिग बॉस’चे निर्माते ‘यात अयोग्य काहीच नाही’, अशीच बतावणी नेहमी करतांना आढळून येतात. या सर्व प्रकारातून निर्माते, सहभागी होणारे स्पर्धक, दर्शक आणि प्रसिद्धीमाध्यमे या सर्वांचेच अध:पतन झाल्याचे दिसून येते. हिंदु राष्ट्रात मात्र ज्यातून प्रेक्षकांना चांगले संस्कार होतील, राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण होईल, असेच कार्यक्रम दाखवण्यात येतील !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर