सामाजिक संकेतस्थळांमुळे बाललैंगिक अत्याचारांमध्ये वृद्धी ! – शीतल जानवे-खराडे, पोलीस उपअधीक्षक

शीतल जानवे-खराडे

सातारा, ३० सप्टेंबर (वार्ता.) – अलीकडच्या काळात बाललैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे सामाजिक संकेतस्थळाचा उपयोग हे मुख्य कारण आहे. त्यामुळे पालकांनी कोणतीही भीती न बाळगता सतर्क राहून संकट टाळावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी केले आहे.

जावळी तालुक्यातील लोहिया विद्यालयात पोलीस अधीक्षक कार्यालय आणि मेढा पोलीस ठाण्यांतर्गत घेण्यात आलेल्या बालसंरक्षक जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी विद्यार्थी, पालक आणि प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते.

या वेळी जावळीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने म्हणाले की, आपल्या पाल्याविषयी कोणताही अनुचित प्रकार पालकांच्या निदर्शनास आल्यास पालकांनी कोणतीही भीती न बाळगता तातडीने मेढा पोलिसांशी संपर्क साधावा.

क्षणचित्रे

१. पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी लैंगिक अत्याचारापासून कशा प्रकारे संरक्षण करता येईल ?, योग्य- अयोग्य स्पर्श याविषयी प्रोजेक्टरद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

२. जकातवाडी येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कसे करावे ? याविषयी जागृती केली.