वडोदरा (गुजरात) येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. देवश्री सुहास गरुड (वय ८ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आई-वडिलांना जाणवलेली वैशिष्ट्ये !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. देवश्री सुहास गरुड ही आहेत!

कु. देवश्री सुहास गरुड

(‘वर्ष २०१७ मध्ये कु. देवश्रीची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. वय ३ ते ४ वर्षे

श्री. सुहास गरुड

१ अ. सात्त्विकतेची आवड : ‘देवश्रीला मंदिरात जायला आवडत असे. मंदिरात गेल्यावर ती देवाला साष्टांग नमस्कार करून प्रार्थना आणि नामजप करत असे. घरातील देवपूजा होईपर्यंत ती माझ्या बाजूला शांतपणे हात जोडून बसत असे.

१ आ. साधक घरी आल्यावर आनंद होणे : आमच्या घरी श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हे साधक सेवेनिमित्त १ – २ दिवसांसाठी रहायला यायचे. साधक घरी आल्यावर तिला पुष्कळ आवडायचे. ती साधकांसोबत छान खेळायची. ते ‘घरातून बाहेर जाऊ नयेत’, असे तिला वाटायचे.

१ इ. शास्त्र समजल्यावर वाढदिवस शास्त्रानुसार करणे : आरंभी देवश्रीला इतरांप्रमाणे ‘आपलाही वाढदिवस केक कापून आणि मेणबत्ती विझवून करावा’, असे वाटायचे. ‘वाढदिवस कसा साजरा करायचा ?’, हे तिला समजावून सांगितल्यावर तिने ते लगेच स्वीकारले आणि वाढदिवस शास्त्रानुसार औक्षण करून साजरा केला. त्या वेळी ती पुष्कळ आनंदी होती.’

– श्री. सुहास गरुड (कु. देवश्रीचे वडील)

२. वय ४ ते ६ वर्षे

२ अ. शिक्षिकेने सांगितलेल्या सर्व कृती करणे : ‘ती स्वतःचा अभ्यास स्वतः पूर्ण करायची. ती शाळेत तिच्या शिक्षिकेची आवडती होती. ती शिक्षिकेचे सर्व लक्ष देऊन ऐकत असे आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व कृती पूर्ण करत असे.

२ आ. समजूतदारपणा : देवश्री इतरांना पुष्कळ समजून घेते. माझ्या गरोदरपणात तिने मला कधीही त्रास दिला नाही. ती आलेली परिस्थिती स्वीकारायची. मला अकस्मात् रुग्णालयात जावे लागायचे. तेव्हा ती घरात कामवाल्या बाईजवळ थांबत असे. तिने कधी हट्ट केला नाही.

२ इ. इतरांवर प्रेम करणे : देवश्री तिची लहान बहीण कु. ईश्वरी हिची चांगली काळजी घेते. तिला हवे ते देते. तिच्यासोबत प्रेमाने खेळते. ती शाळेत सर्वांसोबत मिळून-मिसळून रहाते.’

– सौ. सुजाता गरुड (कु. देवश्रीची आई)

३. वय ६ ते ७ वर्षे

सौ. सुजाता गरुड

३ अ. देवश्रीचा आध्यात्मिक त्रास वाढणे आणि संतसहवासाने तो न्यून होणे : ‘६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आम्ही देवश्रीला दुसर्‍या शाळेत घातले. ती शाळा इंग्रजी माध्यमाची असल्याने तिचे इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ लागले. तिचा आध्यात्मिक त्रास वाढला आणि नामजप करणे न्यून होऊन बाहेर खेळण्याचे प्रमाण अधिक वाढले. ऑगस्ट २०१९ मध्ये सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. संगीता जाधव आमच्या घरी आठ दिवस राहिल्या होत्या. तेव्हापासून ‘तिचे अध्यात्मिक त्रास न्यून झाले’, असे लक्षात आले.

३ आ. सात्त्विक चित्रे काढण्याची आवड : देवश्रीला पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे ग्रंथ बघून चित्रे काढायला पुष्कळ आवडते. ती गणपति आणि श्रीकृष्ण यांचे चित्र पुष्कळ छान काढते.

३ इ. घरकामांत साहाय्य करणे : देवश्री ‘भांडी लावणे, कपड्यांच्या घड्या घालणे, कचरा काढणे, तसेच साहित्य व्यवस्थित ठेवणे’, अशा घरकामांत साहाय्य करते.

३ ई. परिस्थिती स्वीकारणे : मार्च २०२० मध्ये जिन्यावरून पडल्याने देवश्रीचा पाय मुरगळला होता. तेव्हा तिने त्या ४ – ५ दिवसांत एका जागी बसून ग्रंथातील गणपति, श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची पुष्कळ छान चित्रे काढले. त्या वेळी ‘ती आलेली परिस्थिती स्वीकारते आणि आनंदी रहाते’, असे लक्षात आले.

३ उ. शिकण्याची आणि पुढाकार घेण्याची वृत्ती : तिने स्वतःहून गणपतिस्तोत्र, मारुतिस्तोत्र आणि रामरक्षास्तोत्रही पाठ केले आहे. ती प्रतिदिन सूर्यनमस्कार घातल्याविना न्याहारी करत नाही. ती शाळेतही सर्व गोष्टींमध्ये कृतीशील असते. त्यामुळे तिला शाळेत बर्‍याच वेळा ‘वर्गप्रमुख’ (स्कूल मॉनिटर) म्हणून दायित्व दिले जाते.

३ ऊ. साधनेचे प्रयत्न

१. ती प्रतिदिन सांगितलेला नामजप पूर्ण करते.

२. देवश्री पूर्वी तिच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करायची आणि सांगायला घाबरायची. आता ती चुका लिहिते, सांगते, तसेच प्रायश्चित्तही घेते.

३. तिला समाजातील इतर मुलांपेक्षा साधकांच्या दैवी मुलांसोबत रहायला आवडते. तिला स्वतःला राधा बनायला आवडते.

३ ए. आश्रमात जाण्याची ओढ : जानेवारी २०२० मध्ये बडोदा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी देवश्रीला रामनाथी आश्रमातील बालसाधिका कु. भक्ती मेहता (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) भेटली. तेव्हापासून देवश्रीला ‘आपणही भक्तीसारखे आश्रमात जाऊन रहावे’, असे वाटत आहे.

३ ऐ. भाव : एक दिवस देवश्री मला म्हणाली, ‘‘आई, आपण वातानुकूलित यंत्राला नामपट्टी लावूया. वातानुकूलित यंत्र म्हणजे ‘वायुदेवता’ आहे. त्यामधून आपल्याला वायूतत्त्व मिळते.’’

४. अनुभूती

एकदा देवश्रीला स्वप्नात ‘रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर आणि त्यांच्यासोबत पुष्कळ संत बसले आहेत’, असे दिसत होते. तिने रामनाथी आश्रम पाहिलेला नाही, तरी तिला आश्रमातील अनुभूती येतात.

५. स्वभावदोष

अपेक्षा असणे, हट्ट करणे, मनानुसार वागणे, अभ्यास न करणे आणि चुका लपवणे.’

– सौ. सुजाता गरुड आणि श्री. सुहास गरुड (देवश्रीचे आई आणि वडील), वडोदरा, गुजरात. (५.६.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक