सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर साधनेला आरंभ करून स्वतःत चांगले पालट अनुभवणारे कागल (जि. कोल्हापूर) येथील ‘शिवसेनेचे शहरप्रमुख’ श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी !
कागल (कोल्हापूर) येथील ‘शिवसेनेचे शहरप्रमुख’ आणि ‘सनातनचे हितचिंतक’ श्री. किरण कुलकर्णी यांनी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संपर्कात आल्यानंतर साधनेला आरंभ केला. साधनेमुळे त्यांना स्वतःत अनेक पालट जाणवू लागले. स्वतःतील पालटांविषयी त्यांना लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. धार्मिक कुटुंबात जन्म होणे आणि ‘कुटुंबाचा भार स्वतःकडे घ्यावा’, या हेतूने कामाला लवकर प्रारंभ करणे
‘आमचे कुटुंब धार्मिक प्रवृत्तीचे आहे. परंपरेने चालत आलेल्या प्रथा पाळणे आणि दैवावर विश्वास ठेवून कष्टाने आपला उदरनिर्वाह करून आलेला दिवस ढकलणे, अशा सर्वसामान्य कुटुंबात मी जन्माला आलो. त्यामुळे ‘स्वतः काहीतरी काम करून आपल्या कुटुंबाचा भार स्वतःकडे घ्यावा’, या हेतूने मी कामाला लवकर प्रारंभ केला.
२. निरनिराळ्या संघटनांच्या समवेत काम करणे
समाजात वावरतांना लहानपणापासून मला स्वतःच्या धर्मावर प्रेम करणारी मित्रमंडळी भेटली. त्यांच्या समवेत निरनिराळ्या संघटनांच्या समवेत काम करण्याचा मला योग आला.
३. सामाजिक आणि राजकीय कार्य करतांना अहंभाव वाढू लागणे
३ अ. शिवसेनेचे ‘कागल शहरप्रमुख’ हे दायित्व मिळाल्यावर हिंदुत्वासाठी कार्य करण्याची आवड वाढणे आणि नंतर स्वतःविषयी अभिमान असलेल्या स्वभावाचे अहंभाव वाढण्यात रूपांतर होणे : हळूहळू माझ्या मनात ‘आपण कर्तबगार आहोत’, अशी भावना नकळत वाढू लागली. याच कालावधीत शिवसेनेचे त्या काळातील जिल्हाप्रमुख कै. रामभाऊ चव्हाण यांनी ‘कागल शहरप्रमुख’ हे दायित्व माझ्यावर सोपवले. ते प्रखर हिंदुत्वनिष्ठ असल्यामुळे आम्हालाही त्यांच्यासारखे कार्य करण्याची आवड निर्माण झाली आणि ‘अगोदरच स्वतःविषयी अभिमान असलेल्या स्वभावाचे अहंभाव वाढण्यात कधी रूपांतर झाले’, हे कळलेच नाही.
३ आ. ‘एका संघटनेचे पदाधिकारी आहोत आणि वैयक्तिक जीवनात प्रगती करत आहोत’, या विचारांनी अहंभाव वाढणे अन् ‘स्वतःचे आत्मपरीक्षण करावे’, असा विचारही कधी मनात न येणे : ‘मी एका संघटनेचा पदाधिकारी आहे अन् वैयक्तिक जीवनातही प्रगती करत आहे’, या विचारांमुळे माझा अहंभाव वाढू लागला. ‘कधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे किंवा स्वतःतील स्वभावदोषांचा अभ्यास करावा’, असा विचार माझ्या मनातही येत नव्हता. मी करत असलेल्या कार्यामुळे मला वैयक्तिक, कौटुंबिक आणि सार्वजनिक या स्तरांवर मानसन्मान मिळत गेला; पण त्या नादात बरेच स्वभावदोष वाढून माझा अहंभावही वाढत गेला अन् ‘मी खूप काहीतरी करत आहे’, असे मला वाटू लागले.
४. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संपर्कात आल्यावर अंतर्मुखतेत वाढ होऊन साधनेचे महत्त्व पटू लागणे
४ अ. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक अन् कार्यकर्ते यांच्यातील सद्गुणांचा मनावर प्रभाव पडून स्वतःत पालट होऊन साधनेला आरंभ होणे : सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या सहवासात आल्यानंतर मागील वर्षात हळूहळू माझ्यात बरेच पालट होत गेले. माझ्या मनात साधना आणि नामजप करण्याची आवड निर्माण झाली. मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित रहायचो. त्या वेळी ‘साधना करणारे साधक किती स्थिर मनस्थितीत असतात’, त्यांच्यात राग, लोभ, उतावळेपणा किंवा ‘स्वतः कुणीतरी कर्ते आहोत’, अशी भावना किंवा समोरच्याला न्यून लेखण्याचा भाग अन् अहंभाव कधीच जाणवत नाही’, असे माझ्या लक्षात आले. मला साधकांमध्ये ‘समोरच्याला कर्तेपणा देणे, दुसर्याला मान देणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे’, असे पुष्कळ सद्गुण जाणवत. या सगळ्याचा माझ्या मनावर प्रभाव पडू लागला. त्यामुळे माझ्यातही थोडे पालट होत गेले आणि हळूहळू माझी साधना चालू झाली.
४ आ. गोवा येथे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला गेल्यावर आश्रमात एका संतांचा सत्संग लाभणे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून साधनेचे महत्त्व कळून कुटुंबियांनाही ते पटवून देणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला दोन वेळा गोवा येथे झालेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला उपस्थित रहाता आले. विशेष म्हणजे दोन्ही वेळा मला एका संतांचा सत्संगही लाभला. त्यांच्या मार्गदर्शनातून मला ‘जीवनात आपली कर्तव्ये काय आहेत ? येणार्या काळासाठी आपण कसे सिद्ध असायला पाहिजे अन् साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व काय ?’, यांविषयी कळले. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे त्यांच्या प्रत्येक शब्दातून मला ‘हिंदु राष्ट्र येणार आहे’, याची निश्चिती होत होती. तेथून आल्यानंतर मी माझ्या कुटुंबियांना साधनेचे महत्त्व पटवून सांगितले. त्यामुळे कुटुंबियांचीही प्रतिदिन साधना चालू होऊन तेही साधना करू लागले. ही सर्व आमच्यावर असलेली गुरुकृपाच होय.
४ इ. नामजप आणि साधना यांमुळे मन अन् चित्त शुद्ध होऊन आनंद मिळू लागणे : नामजप आणि साधना यांमुळे मला माझ्या व्यावहारिक, वैवाहिक, तसेच आध्यात्मिक जीवनात पुष्कळ लाभ होत आहेत. आता मन आणि चित्त शुद्ध होत असल्यामुळे मनात दुःखाला जागा रहात नाही अन् आनंद मिळतो. बर्याच वेळा शांतपणे नामजप करत असतांना कसलाही विचार मनात येत नाही. कधीकधी जे विचार येतात, त्याची प्रचीती काही दिवसांतच येते.
४ ई. नामजपादी साधना करू लागल्यावर न्यूनगंड आणि अहंभाव न्यून होऊन ‘मी ईश्वराचा आहे’, हा भाव जागृत राहू लागणे : खरोखर नामजप अन् साधना करण्याचे महत्त्व पुष्कळ आहे. अगोदर माझ्या मनात न्यूनगंड असायचा. त्यानंतर भौतिक आणि व्यावहारिक विकास झाल्यावर माझ्यात अहंभाव निर्माण झाला. सध्या गुरुकृपेने मी नामजपादी साधना करू लागलो, तसा न्यूनगंड आणि अहंभाव हे दोन्ही न्यून झाले आहेत अन् ‘मी ईश्वराचा आहे’, हा भाव मनात जागृत राहू लागला आहे.’
– श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी (शिवसेनेचे शहरप्रमुख), कागल, जिल्हा कोल्हापूर. (२६.३.२०२०)
श्री. किरण कुलकर्णी यांनी केलेले साधनेचे प्रयत्न सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी अनुकरणीय !‘कागल (कोल्हापूर) येथील ‘शिवसेनेचे शहरप्रमुख’ श्री. किरण कुलकर्णी यांनी केलेले साधनेचे प्रयत्न स्तुत्य आणि सर्वांसाठीच अनुकरणीय आहेत. खरेतर राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रांत काम करणार्या पदाधिकार्यांनी अंतर्मुख होऊन स्वतःचे निरीक्षण करणे आणि स्वतःच्या अहंभावाविषयी सांगणे, ही त्यांच्यासाठी कठीण गोष्ट असते; पण श्री. किरण कुलकर्णी याला अपवाद आहेत. त्यांनी साधनेचे महत्त्व समजून घेतले आणि साधनेला आरंभ करून आपल्या कुटुंबियांनाही नामजपाचे महत्त्व सांगितले. सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रसारकार्याचा हेतू ‘संपर्कात आलेल्या सर्वांनी हिंदुत्वाच्या कार्यासह साधनाही करावी’, असाच आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘साधकांची साधना’ आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या उदात्त हेतूंनीच हे धर्मकार्य आरंभलेले आहे. श्री. किरण कुलकर्णी यांच्याप्रमाणे अनेक हिंदु धर्माभिमानी साधना करू लागले, तर धर्मप्रसाराला आणखी गती येईल आणि त्यांच्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान लाभेल ! ‘धर्मकार्याची आवड असलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात साधनेची आवड निर्माण होवो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी प्रार्थना !’ – संपादक |