पुणे येथील मोहन चतुर्भुज यांचे आकस्मिक निधन झाल्यावर ‘गुरुदेव त्यांच्या समवेत आहेत’, असा भाव असणारे चतुर्भुज कुटुंबीय !
पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे मोहन चतुर्भुज यांचे आकस्मिक निधन झाल्यावर ‘गुरुदेव त्यांच्या समवेत आहेत’, असा भाव असणारे चतुर्भुज कुटुंबीय !
३०.४.२०२१ या दिवशी मोहन चतुर्भुज यांचे निधन झाले. प.पू. गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर चतुर्भुज कुटुंबियांनी काकांची रुग्णाईत स्थिती आणि त्यांच्या निधनाची घटना स्थिर राहून स्वीकारली. ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मनीषा पाठक यांना चतुर्भुज कुटुंबियांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्रीमती माधवी चतुर्भुज (कै. मोहन चतुर्भुज यांच्या पत्नी)
१ अ. अडचणींमुळे पुण्यात यजमानांना भेटायला जाता न येण्याची परिस्थिती ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारणे : ‘चतुर्भुजकाकांच्या शरिरात कफाचे प्रमाण वाढल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. तेव्हापासून ते काकांचे देहावसान होईपर्यंत काकूंशी माझे बोलणे होत होते. त्या वेळी मुलाला आधार वाटावा; म्हणून काकूंचे पुण्याला जाण्यासाठी प्रयत्न चालू होते; परंतु दळणवळण बंदीमुळे ते शक्य होत नव्हते. त्या वेळी काकूंनी परिस्थिती ‘ईश्वरेच्छा’ म्हणून स्वीकारली. ‘प.पू. गुरुदेव प्रत्येक प्रसंगात सांभाळणार आहेत. ईश्वरेच्छेनेच सर्वकाही होणार आहे’, असा त्यांचा भाव असायचा.
१ आ. यजमानांच्या निधनानंतर ‘गुरुदेव यजमानांची काळजी घेणार आहेत, गुरुदेव त्यांच्या समवेत आहेत’, असा भाव असणे : काकांचा मुलगा श्री. मंगेशने भ्रमणभाषवर काकांचे देहावसान झाल्याचे चतुर्भुजकाकूंना सांगितले. प्रारंभी काकूंना हे स्वीकारायला त्रास होत होता; कारण एक दिवसापूर्वी काकांच्या छातीच्या उजव्या बाजूतील जंतूसंसर्ग न्यून झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते. काकांच्या निधनाची वार्ता कळल्यावर काकू काही वेळ अस्थिर झाल्या होत्या. त्या वेळी मला जाणवले, ‘गुरुदेवांनी काकांना सूक्ष्मातून जवळ घेतले आहे. काकांचा नामजप चालू आहे. काकांच्या लिंगदेहाचा प्रवास वरच्या दिशेने होत आहे.’ त्या वेळी डोळे बंद केल्यावर मला ‘त्यांच्या लिंगदेहाभोवती गुरुदेवांनी नामजपाचे संरक्षककवच सिद्ध केले आहे’, असे दिसले. काही वेळातच चतुर्भुजकाकू स्थिर होण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्या वेळी ‘गुरुदेव यजमानांची काळजी घेणार आहेत. गुरुदेवच त्यांच्या समवेत आहेत’, असा काकूंचा भाव होता.
२. श्री. मंगेश चतुर्भुज, पुणे (मोठा मुलगा)
२ अ. वडिलांची मनापासून सेवा करणे : वडील रुग्णालयात असल्यापासून ते त्यांचा अंत्यसंस्कार होईपर्यंत आलेल्या सगळ्या परिस्थितींविषयी दादाने कुठलेही गार्हाणे केले नाही कि चिडचीड केली नाही. ‘हे सर्व मला स्वीकारायचे आहे. वडिलांची सेवा म्हणून करायचे आहे’, असा त्याचा भाव असायचा. खरेतर आम्ही एकमेकांना कधीही भेटलेलो नाही; पण ‘तू मला बहिणीसारखी आहेस’, असे म्हणून तो मला त्याच्या मनाची स्थिती प्रांजळपणे सांगायचा.
२ आ. कठीण प्रसंगात स्थिर आणि सकारात्मक असणे : वडील रुग्णाईत असल्यापासून त्यांचे देहावसान झाल्यानंतर आलेली सर्व परिस्थिती दादाने एकट्याने हाताळली. तो प्रत्येक प्रसंगात स्थिर राहून बोलायचा. काकांप्रमाणेच दादाही शेवटपर्यंत सकारात्मकच होता. त्याने वडिलांच्या निधनानंतरही रुग्णालयाच्या औपचारिकता पूर्ण करणे, अंत्यसंस्कार करणे, या सर्व गोष्टी एकट्याने स्थिर राहून केल्या.
२ इ. वडिलांच्या निधनानंतर ‘गुरुदेव बाबांची काळजी घेणारच आहेत’, असे सांगणे : काकांच्या निधनानंतर मी दादाशी बोलतांना त्याने सांगितले, ‘‘बाबांना सेवेची पुष्कळ तळमळ होती. ते पुष्कळ नामजप करायचे. माझी श्रद्धा आहे की, गुरुदेवांनी त्यांची काळजी घेतली आहे. त्यांचा पुढचा प्रवास चांगलाच होईल.’’ तो वडिलांच्या निधनानंतर स्थिर होता.
३. कु. मधुरा चतुर्भुज (लहान मुलगी)
३ अ. वडिलांची आठवण येताच देवाचे स्मरण करणे आणि प्रसंगात स्थिर रहाता येण्यासाठी मार्गदर्शन घेणे : कु. मधुराला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. तिच्या त्रासांचा संघर्ष ती स्वतः आणि तिचे आई-वडील यांनी मिळून स्वीकारला होता. तिला वडिलांच्या अकस्मात् जाण्याने धक्का बसला; परंतु काही वेळातच तिने स्वतःला सावरले. वडिलांची आठवण आल्यावर प्रार्थना आणि नामजप करणे, असे प्रयत्न ती करत होती. ती भाऊ आणि आई यांच्याशी संयम ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिला बाबांच्या आठवणीने रडू आल्यास ती माझ्याशी मोकळेपणाने बोलायची. त्या वेळी ती मला म्हणायची, ‘‘ताई, तुझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तू कशी स्थिर राहिलीस ? तुलाही आधार नव्हता. बाबांची आठवण आली, तर काय करायचे, ते मला सांग.’’ खरेतर तिच्यासाठी हा मोठा संघर्ष होता, तरीही ती स्थिर रहाण्यासाठी प्रयत्न करत होती.
४. गुरुमाऊलींनी सिद्ध केलेला ‘सनातन परिवार’
रामनाथी आश्रमातील साधक चतुर्भुजकाकू आणि मधुरा यांची पूर्ण काळजी घेत होते. साधक त्यांना आधार देण्यासाठीही येत होते. हे सर्व अनुभवल्यावर ‘गुरुमाऊलींनी ‘सनातन परिवार’ कसा सिद्ध केला आहे’, हे प्रत्यक्ष अनुभवता आले.’
– सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०२१)
|