उत्तरप्रदेश पोलिसांच्या मारहाणीमध्ये व्यावसायिकाचा मृत्यू
|
|
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील ३६ वर्षीय व्यावसायिक मनीष गुप्ता गोरखपूर येथे फिरण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे ६ पोलिसांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे सर्व पोलीस सध्या पसार आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पीडित गुप्ता कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना २० लाख रुपये साहाय्य करण्याची घोषणा केली आहे.
UP: Businessman dies of injuries during hotel raid, six cops suspended https://t.co/YSaNPgqOLv
— TOI Cities (@TOICitiesNews) September 28, 2021
१. गोरखपूरच्या रामगढताल भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये मनीष गुप्ता हे प्रदीप चौहान आणि हरदीप सिंह या त्यांच्या मित्रांसमवेत आले होते. हॉटेलमध्ये चौकशीसाठी आलेल्या पोलिसांसमवेत रात्री गुप्ता यांचा काही कारणावरून वाद झाला. यानंतर पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. मारहाणीमुळे गुप्ता बेशुद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अगोदर एका खासगी रुग्णालयात भरती केले; मात्र स्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेण्यात आले. यानंतर मनीष गुप्ता यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही पोलिसांनी दीड घंट्यांपर्यंत गुप्ता यांचा मृतदेह लपवून ठेवल्याचे सांगितले जात आहे.
२. मनीष यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांच्या शरिरावर ४ गंभीर खुणा आढळल्या. मनीषच्या डोक्याला झालेली जखम जीवघेणी ठरली आहे. डाव्या हाताच्या मनगटावर दांडके मारल्याचे निशाण आहे. मनीष यांना दांडक्याने मारहाण झाल्याचे दिसून येते, तर उजव्या डोळ्याच्या वर मारहाण झाल्याचे आढळले आहे.