पूरस्थितीची पहाणी करण्यास गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वागत मिरवणुकीत व्यस्त !

अतीवृष्टी क्षेत्राची पहाणी करण्यास गेलेले राजकीय नेते सामाजिक भान विसरून स्वागत मिरवणुकीत रममाण होत असतील, तर असे नेते जनतेच्या व्यथा लक्षात घेऊन त्यांना साहाय्य करतील, अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक

परळी येथील नागरिकांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करत स्वागत केले

बीड, २९ सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील अन् सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात अतीवृष्टीने झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी २८ सप्टेंबर या दिवशी बीड जिल्ह्यात गेले होते. या वेळी त्यांनी दिवसभर बीड जिल्ह्यातील अतीवृष्टी झालेल्या विविध गावांना भेट देऊन पूर परिस्थितीची पहाणी केली. त्यानंतर सायंकाळी परळी येथील नागरिकांनी पाटील यांचे जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. या वेळी जयंत पाटील म्हणाले की, ‘माझ्या विवाहामध्येही इतकी मोठी मिरवणूक काढली नव्हती.’

पाटील यांच्या जंगी स्वागतानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘पाटील आधी चंद्रावर होते; मात्र टीका झाल्यानंतर ते पावसामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी बांधावर गेले’, अशा शब्दांत टीका केली आहे. या स्वागतानंतर मराठवाड्यातील शेतकरी अतीवृष्टीमुळे अडचणीत आलेले  असतांना पूरस्थितीची पहाणी करण्यास गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मात्र स्वागत समारंभ आणि मिरवणूक काढण्यात मग्न आहेत, असा संताप सामाजिक माध्यमांद्वारे नागरिक व्यक्त करत आहेत. मिरवणुकीत सामाजिक अंतराचा आणि कोरोनाविषयक नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.