सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या कह्यात !
समाजाची नीतीमत्ता आणि प्रामाणिकपणा अल्प होत चालल्याचे उदाहरण ! रामराज्याप्रमाणे आदर्श समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची आवश्यकता आहे. – संपादक
नीरा (जिल्हा पुणे) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठासह अन्य महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणार्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे. त्यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. गणेश जावळे, मनोज धुमाळ आणि वैभव लोणकर अशी कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत. येथील ‘समीक्षा प्रिंटिंग प्रेस’मध्ये धाड टाकली असता तेथे मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवण्याचे काम चालू असल्याचे समोर आले. बनावट प्रमाणपत्रे आतापर्यंत किती जणांना दिली आहेत, तसेच या बनावट प्रमाणपत्रांचा नोकरी, पुढील शिक्षण, बढती आणि वेतनवाढ यांसाठी किती जणांनी उपयोग केला, हे पडताळणे महत्त्वाचे आहे. ‘ज्यांनी बनावट प्रमाणपत्रांचा उपयोग केला आहे, त्यांच्यावरही कार्यवाही होणार का ?’, असा प्रश्न निर्माण झाला आहे.