प्रभादेवी (मुंबई) येथील हिंदसायकल गणेशोत्सव समितीकडून आदर्शरित्या गणेशोत्सव साजरा !

हिंदसायकल गणेशोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष १. संघठन शर्मा, २. डॉ. स्वप्नील सकपाळ आणि शिबिरात सहभागी झालेले वैद्यकीय कर्मचारी

मुंबई – प्रभादेवी येथील हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही धर्मशास्त्राला अनुसरून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. श्री गणेशाची आराधना करत हे सर्व उपक्रम राबवण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळात हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या वतीने नागरिकांसाठी विनामूल्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मुंबईतील सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. स्वप्नील सकपाळ यांसह त्यांच्या सहकार्‍यांनी रुग्णांच्या नेत्रांची पडताळणी केली. या  वेळी अनेक नागरिकांना विनामूल्य उपनेत्र (चष्मा) वितरण करण्यात आले. लहान मुलांसाठी ‘ऑनलाईन’ चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ९ ते १२ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी सायकल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. श्री गणेशाचे आगमन आणि विसर्जन या मिरवणुकांमध्ये गुलाल न उधळणे, चित्रपटाची गाणी न वाजवणे आणि फटाके न उडवणे  आदी अशास्त्रीय प्रकार टाळून आदर्श मिरवणुका काढण्यात आल्या. हिंदसायकल गणेशोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपच्या वरळी विधानसभाक्षेत्राचे सचिव श्री. संगठन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भाजपचे मुंबई शहराचे सचिव श्री. सचिन शिंदे यांच्या सहकार्याने हा उत्सव पार पडला.