‘मराठे ज्वेलर्स’कडून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !
कॉसमॉस बँकेकडून घेतलेल्या ६० कोटी रुपयांच्या कर्जाचीही परतफेड नाही !
पुणे – ‘मराठे ज्वेलर्स’च्या विविध योजनांमध्ये गुंतवलेली रोख रक्कम तसेच सोने-चांदी यांवर चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून गुंतवलेल्या ठेवीची रक्कम आणि त्यावरील परतावा न दिल्याने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रणव मराठे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे, तसेच ‘मराठे ज्वेलर्स’ आणि ‘प्रणव मराठे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांनी कॉसमॉस बँकेकडून घेतलेल्या ६० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याची तक्रारही पोलिसांकडे नोंद झाली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी प्रणव मराठे, कौस्तुभ मराठे, मंजिरी मराठे यांना अटक केली, तर मयत मिलिंद मराठे, नीना मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. शुभांगी कुटे यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून मराठे ज्वेलर्सच्या लक्ष्मी रस्ता आणि पौड रस्ता येथील शाखांमध्ये १४ जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.