होरपळणार्या सीमा !
संपादकीय
|
भारताला जितका धोका आतंकवादी, नक्षलवादी, शहरी नक्षलवादी यांच्यापासून आहे, तितकाच धोका घुसखोरीपासूनही आहे. घुसखोरीच्या समस्येने भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आतापर्यंत आपण बांगलादेशी घुसखोरांविषयी ऐकत आणि वाचत होतो, त्यात आता चिनी सैनिकांच्या घुसखोरांची भर पडली आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये चिनी सैनिक वारंवार भारतीय सीमेत घुसखोरी करत आहेत. त्यांनी केवळ घुसखोरीच केली, असे नाही, तर अनेक दिवस आणि आठवडे तेथे तळही ठोकला आहे. त्यांनी काही ठिकाणी रस्ते बांधणीचे काम केले आहे. आतापर्यंत ही घुसखोरी अरुणाचल प्रदेशमधील भागांत अथवा चीनच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय क्षेत्रातील दुर्गम भागांत होत होती. आता चिन्यांचे धाडस वाढले आहे. चिनी सैनिकांच्या एका तुकडीने उत्तराखंडच्या बाराहोती भागात नुकतीच घुसखोरी केली. हे घुसखोर तेथे ३ घंटे हैदोस घालत होते. नंतर ते परत गेले खरे; पण जाता जाता त्यांनी भारताचा एक पूल पाडून टाकला. अशी हानी चीनने यापूर्वीही अनेकदा केली आहे. मग प्रश्न असे पडतात की, प्रत्येक वेळी चिनी सैन्याने घुसखोरी करून आपल्या भूभागाची हानी केल्यानंतरच आपल्याला त्याविषयी माहिती कशी मिळते ? घुसखोरी होत असतांना आपल्याला माहिती कशी मिळत नाही ? आपल्या गुप्तचर यंत्रणा काय करत असतात ? ही घुसखोरी आपण का रोखू शकत नाही ? या प्रश्नांची उत्तरे राजकीय सोयीसाठी कुणी देणार नाही; पण ती अवघडही नाहीत.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आपल्याकडे ना आतंकवादाविरुद्ध, ना नक्षलवादाविरुद्ध, ना घुसखोरांविरुद्ध लढण्याचे धोरण आहे. ते असते, तर पाक, चीन आणि बांगलादेश यांनी घुसखोरी करण्याची आगळीक केली नसती. केवळ कायदे असणे आणि त्या त्या वेळची परिस्थिती हाताळणे म्हणजे काही धोरण नव्हे. अशा घटना घडूच नयेत, तसेच अशी कृत्ये करण्याचे शत्रूचे धाडस होणार नाही, अशी स्वतःची पत निर्माण करणे आवश्यक आहे. त्यात आपण अपयशी ठरलो आहोत, हे मान्य करावे लागेल. सैन्य त्यांची बाजू भक्कमपणे सांभाळत आहे, किंबहुना त्यामुळेच आपण टिकून आहोत, हेही मान्य करावे लागेल. तथापि गेल्या ७४ वर्षांत चीन आणि पाक यांच्यासारख्या धूर्त शत्रूंच्या कुरापती रोखण्यात आपले शासनकर्ते मात्र पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, ही वस्तूस्थिती आहे. आजच्या घडीला चीन शस्त्रास्त्रांमध्ये जरी भारतापेक्षा वरचढ असला, तरी प्रत्यक्ष रणभूमीवर त्यांचे सैनिक भारतीय सैनिकांसमोर किती तग धरू शकतात, हे डोकलामच्या घटनेत अवघ्या जगाने पाहिले. जर आपण चीनला समोरासमोर होणार्या युद्धात पराभूत करू शकतो, तर मग त्याची घुसखोरी का रोखू शकत नाही ? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी सर्वप्रथम चीनला समजेल, अशा भाषेत खडसावणे आवश्यक आहे. चीन हा केसाने गळा कापणारा शत्रू आहे. तो व्यापाराच्या माध्यमातून आपल्या देशातून कोट्यवधी रुपये घेऊन जातो आणि तेच पैसे आपल्या देशात घुसखोरी करण्यासाठी, तसेच हिंसाचार करण्यासाठी वापरतो. यासाठी सरकारला चिनी वस्तूंवर बंदी, तर जनतेला त्यांवर बहिष्कार घालावा लागेल. यासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोण काय म्हणेल ? याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. स्वतःचे सार्वभौम धोक्यात येत असल्याची चाहुल लागताच अनेक देशांनी थेट युद्ध पुकारण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलल्याचा इतिहास आहे. चीनने तर आपला ३८ सहस्र चौरस किलोमीटर एवढा प्रचंड भूभाग गिळंकृत केला आहे, वर त्याला आणखी भूभाग हवा आहे. त्यामुळे हा आसुरी विस्तारवाद रोखणे राष्ट्रहिताचे आहे. ज्याप्रमाणे सरकार आतंकवादाच्या सूत्रावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकला उघडे पाडते, तसे घुसखोरीच्या सूत्रावरून चीनचीही सातत्याने उघडे पाडले पाहिजे. नुकत्याच अमेरिकेच्या दौर्यात भारताने अशा प्रकारे भूमिका घेतल्याचे दिसून आले.
आसाममधील घुसखोरीचे विदारक चित्र !
गेल्या काही दशकांत भारताला बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येनेही चांगलेच ग्रासले आहे. या घुसखोरीने देशाचे अर्थचक्रच पालटून टाकले आहे, असे म्हटल्यास अतीशयोक्ती ठरू नये; कारण एकट्या आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांनी ६ सहस्र ६५२ चौरस किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केल्याचे नुकतेच उघडकीस आले. या घुसखोरांनी प्राचीन मंदिरांच्या भूमींवर उघडपणे अतिक्रमण केले आहे. त्यांनी सर्वाधिक अतिक्रमण वैष्णव मठांच्या भूमींवर केले आहे. आसामच्या दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे अतिक्रमण करणार्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांधांनी आक्रमण केले. यावरून धर्मांधांचा उद्दामपणा दिसून येतो. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी घुसखोरांना कुरवाळल्याचे हे फलित आहे. ही स्थिती केवळ एका राज्यातील एका जिल्ह्याची आहे. भारतात आज कानाकोपर्यांत बांगलादेशी घुसखोर सुखनैव रहात आहेत. येथे पुन्हा वरीलप्रमाणेच प्रश्न पडतात की, एवढ्या बांगलादेशींची मोठ्या संख्येने घुसखोरी होईपर्यंत आपल्या सुरक्षायंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? पोलीस-प्रशासन काय करत असतात ? त्यामुळे आता तरी केंद्र सरकारने चिनी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोरात कठोर पावले उचलली पाहिजेत.
आज भारताच्या सीमा घुसखोरीच्या वणव्यात होरपळत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी विचारांची आठवण झाल्याविना रहात नाही. सावरकरांनी तेव्हाच म्हटले होते की, ज्या राष्ट्रांच्या सीमा सुरक्षित नाहीत, ती राष्ट्रे सुरक्षित कशी असू शकतील ? यासाठी प्रथम सीमा निश्चित करून त्या सुरक्षित केल्या पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. सावरकरांनी जुलमी इंग्रजी राजवटीविरुद्ध जनतेला ‘लेखण्या मोडा, बंदुका धरा’, असे आवाहन केले होते. आज जर ते असते, तर त्यांनी भारताला घुसखोरमुक्त करण्यासाठी सर्व सत्ताधिशांना ‘मतपेट्या सोडा, बंदुका धरा’, असे निश्चितच सांगितले असते !