जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ संघटनेच्या वतीने पिंगुळी येथे ‘भीक मागा’ आंदोलन !
चांगले रस्ते मिळावेत, या प्राथमिक आवश्यकतेसाठीही जनतेला ‘भीक मागा’ आंदोलन करून पैसे गोळा करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ‘रस्त्यावर खड्डे कि खड्ड्यांतील रस्ते’, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती बर्याच ठिकाणी आहे. अशा रस्त्यांवरून जनता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे खराब रस्त्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २९ सप्टेंबरला ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटने’च्या वतीने कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावरील पिंगुळी येथील रेल्वेपुलावर ‘भीक मागा’ आंदोलन करण्यात आले. यापूर्वी पिंगुळी, काळेपाणी येथे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली.
खड्डे बुजवायचा विषय आला की, सार्वजनिक बांधकाम विभाग निधी नसल्याचे कारण देतो. त्यामुळे आजच्या ‘भीक मागा’ आंदोलनातून जनतेकडून मिळालेला निधी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांकडे सुपुर्द करण्यात आला आणि तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील काही रस्त्यांचे काम करण्यासाठी निधी संमत झाला आहे, हे स्वागतार्ह आहे; परंतु शासकीय कामे किती संथ गतीने चालतात, हे सर्वांना ठाऊक आहे. मग तोपर्यंत जनतेने खड्ड्यांमधूनच प्रवास करायचा का ? रस्त्याचे काम होण्याआधी, जर खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणाचा मृत्यू झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ? त्यामुळे रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल; पण तोपर्यंत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे भरून जनतेला होणारा त्रास अल्प करावा, अशी मागणी या वेळी शिवप्रेमींनी केली.
या वेळी सर्वश्री राज वारंग, प्रकाश बरगडे, प्रथमेश धुरी, सुशांत नाईक, दैवेश रेडकर, रमाकांत नाईक आदी शिवप्रेमी उपस्थित होते.