रत्नागिरी येथील कै. श्रीकांत पांडुरंग भिडे (वय ६५ वर्षे) यांच्या मित्राने तीर्थक्षेत्री जाऊन केलेले पिंडदान योग्यरित्या झाल्याचे त्यांच्या मुलाला जाणवणे
‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’ या ‘सनातन संस्थे’च्या ग्रंथात (प्रथम आवृत्ती, २००६) पान क्र. २० वर ‘श्राद्ध कुणी करावे ?’, या सूत्रामध्ये ‘क्रमाने मुलगा इत्यादींपासून मित्र, जावई आणि अन्य कुणी नसल्यास राजाने श्राद्ध करावे’, असा उल्लेख आहे. मी प्रतिवर्षी वडिलांच्या निधनाच्या तिथीला श्राद्धविधी करतो. वडिलांच्या मित्राने त्यांच्यासाठी पिंडदान केल्यावर त्यांचे रखडलेले काम पूर्ण झाल्याने ‘मित्राने केलेले पिंडदान वडिलांपर्यंत पोचले’, असे मला वाटले. त्या संदर्भातील अनुभूती पुढे दिली आहे.
१. कुणाच्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडणारे आणि निष्कलंक राहून गुजरात क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक या उच्च पदावरून निवृत्त झालेले कै. श्रीकांत पांडुरंग भिडे !
माझे वडील श्रीकांत पांडुरंग भिडे हे वर्ष १९६९ मध्ये ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी’मध्ये (जनरल इन्शुरन्सच्या ४ निमसरकारी आस्थापनांपैकी एक) साहाय्यक या पदावर चाकरीला लागले. पहिल्यापासून कष्टाळू वृत्ती आणि प्रामाणिक स्वभाव, तसेच ते कुठल्याही दायित्वाला किंवा कामाला ‘नाही’, असे म्हणायचे नाहीत. त्यांची ही वृत्ती आणि ईश्वरी कृपा यांमुळे त्यांना चाकरीत बढती मिळत गेली. ऑगस्ट २००५ मध्ये ते गुजरात क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक (रिजनल मॅनेजर) या उच्च पदावरून निवृत्त झाले.
त्यांचा स्वभाव प्रामाणिक आणि सरळ होता. तसेच ‘इन्शुरन्स’ क्षेत्रातील भरपूर माहिती असल्याने आणि स्वतः कायद्याचे पदवीधर (L.L.B) असल्यामुळे कुणाच्याही दबावाला किंवा प्रलोभनाला ते कधीही बळी पडले नाहीत. त्यांनी चाकरीमध्ये असतांना कुणाकडून कधीही केलेल्या कामाचे पैसे घेतले नाहीत. त्यामुळे त्यांचा चाकरीचा कार्यकाळ निष्कलंक राहिला. त्यांचे ९.९.२०१० या दिवशी सकाळी ९ ते ९.३० या वेळेत त्यांच्या रहात्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्ष होते
२. आस्थापनाने वडिलांवर आस्थापनाची आर्थिक हानी केल्याचा, तसेच स्वतःचा आणि सहकार्यांचा आर्थिक लाभ करून घेतल्याचा आरोप करणे आणि त्यांचे निवृत्तीवेतन, फंड, इत्यादी सर्व गोष्टी अडवून ठेवणे
वडील निवृत्त झाल्यावर आस्थापनातील काही हितशत्रूंनी कट करून इंदूरच्या कार्यकाळातील एका विमा-दाव्याचे प्रकरण उकरून काढले आणि आस्थापनाने वडिलांवर आस्थापनाची आर्थिक हानी केल्याचा, तसेच स्वतःचा आणि सहकार्यांचा आर्थिक लाभ करून घेतल्याचा, थोडक्यात त्यांच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप ठेवला.
त्यामुळे वडिलांचे निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, फंड (भविष्य निर्वाह निधी) इत्यादी सर्व गोष्टी आस्थापनाने अडवून ठेवल्या आणि सांगितले, ‘जोपर्यंत निर्दाेषत्व सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला तुमचे निवृत्तीवेतन, फंड इत्यादी देता येणार नाही.’
३. वडिलांनी सर्व आरोप खोडून काढणे आणि सहकार्यांनी त्यांच्या बाजूने साक्ष दिल्याने वडील सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त होणे
वडिलांनी अर्थात्च असे काही केलेले नसल्यामुळे त्यांनी सर्व आरोप खोडून काढले. त्यांचे निष्कलंक चारित्र्य आणि मित्र जोडण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या इंदूरमधील त्या वेळच्या सहकार्यांनी वडिलांच्या बाजूने साक्ष दिली आणि वडिलांना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. हे सर्व वर्ष २००७ पर्यंत चालू होते. या सर्व प्रकारामुळे वडील दुखावले गेले होते. ते म्हणायचे, ‘‘ज्या आस्थापनाच्या प्रगतीसाठी मी प्रामाणिकपणे झोकून देऊन कार्य केले आणि माझे सर्व कौशल्य पणास लावून आस्थापनाचा आर्थिक लाभ करून दिला, त्याच आस्थापनाने मला निवृत्तीच्या वेळी अशा प्रकारे त्रास दिला, हे चांगले झाले नाही.’’
४. दोन वर्षे पैसे थकवल्यामुळे वडिलांनी आस्थापनाला त्या काळातील व्याज देण्यास सांगणे; परंतु आस्थापनाने नकार देणे
वडिलांनी आस्थापनाला एक पत्र लिहिले की, ‘माझा काही दोष नसतांना तुम्ही माझे निवृत्तीवेतन आणि फंड १ वर्ष ४ मास उशिरा दिले. त्यामुळे मला या रकमेचे १ वर्ष ४ मासांचे व्याज मिळावे. तेव्हा आस्थापनाने वडिलांना उत्तर पाठवले, ‘आम्ही तुमचे जे काही देणे होते, ते देऊन झाले आहे. आता तुम्हाला प्रतिमास निवृत्तीवेतनाच्या व्यतिरिक्त अन्य काही देणे लागत नाही.’
वडिलांनी अशा प्रकारे ३-४ पत्रे पाठवूनही आस्थापनाने त्यावर कुठलेही उत्तर दिले नाही किंवा व्याजही दिले नाही. वर्ष २००७ असेच पार पडले. वडिलांनी कंटाळून पत्र पाठवण्याचे थांबवले. अखेर ९.९.२०१० या दिवशी वडिलांचे निधन झाले.
५. वडिलांच्या मृत्यूनंतर आस्थापनाने वडिलांनी मागणी केलेले व्याज देण्याचे मान्य करणे
६.५.२०१३ या दिवशी नितीन परीख नावाचे वडिलांचे सहकारी यांनी दूरभाषवर मला कळवले, ‘‘तुमच्यासाठी एक आनंदवार्ता आहे. तुमचे वडील आस्थापनाकडे ज्या व्याजाची मागणी करत होते, ते व्याज आस्थापनाने देण्याचे मान्य केले आहे. मी विचारले, ‘‘आस्थापनाला ७ वर्षांनी कशी काय जाग आली ? आणि तेसुद्धा माझ्या वडिलांचे निधन झाल्यावर ?’’ त्यावर त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या वडिलांनी आस्थापनाच्या नावाने जी पत्रे पाठवली होती, ती पत्रे ‘ऑडिटर’ (लेखापरीक्षक) समोर गेली आणि ‘ऑडिटर’च्या आदेशानुसार आस्थापनाने व्याज देण्याचे मान्य केले आहे.’’ मला हे ऐकून पुष्कळ समाधान वाटले; परंतु माझे बाबा आज असते, तर त्यांना अधिक समाधान वाटले असते. मी लगेच ही आनंदवार्ता श्री. धनसुख पटेल यांना (वडिलांच्या मित्राला) कळवली.
६. आस्थापनावरील रोष पराकोटीला गेल्याने ‘निवृत्तीवेतनसुद्धा नको’, असे वाटून कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच स्वेच्छानिवृत्ती घेणारे श्री. धनसुख पटेल !
६ अ. आस्थापनातील व्यवस्थापनाच्या निर्णयांना कंटाळणे : श्री. धनसुख पटेल यांचे बालपण मुंबईत गेले. ते अभियंता (इंजिनीयर) आहेत. वर्ष १९७० मध्ये ते ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी’मध्ये चाकरीला लागले. त्यांचा माझ्या वडिलांशी परिचय झाल्यावर दोघांची घट्ट मैत्री झाली. श्री. धनसुख पटेल यांचा चाकरीतील कार्यकाळ प्रगतीचा असला, तरी ते आस्थापनातील व्यवस्थापनाच्या निर्णयांना कंटाळले होते. निवृत्तीवेतनास पात्र होण्यासाठी किमान कार्यकाळ चाकरी करणे आवश्यक असते. धनसुख पटेलांनी तो किमान कार्यकाळ पूर्ण होण्याच्या १ मास आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली; कारण त्यांचा आस्थापनावरील रोष एवढा होता की, मला आस्थापनाकडून निवृत्तीवेतनसुद्धा नको, असे त्यांना वाटले.
६ आ. वडिलांना निवृत्त झाल्यावर वाईट वागणूक दिल्याची वार्ता समजल्यावर पटेल यांचा आस्थापनावरील रोष आणखी वाढणे : वडिलांना उच्च पदावरून निवृत्त झाल्यावर वाईट वागणूक दिल्याची वार्ता आस्थापनापुरती मर्यादित न रहाता संपूर्ण विमाक्षेत्रात पसरली; कारण उच्च पदस्थ व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी त्रास देण्याची घटना दुर्मिळ होती. ही सर्व वार्ता वडिलांचे मित्र धनसुख पटेल यांना समजल्यावर त्यांचा आस्थापनावरील रोष आणखी वाढला. त्यांनी आस्थापन सोडले असले, तरी त्यांची वडिलांशी असलेली मैत्री अतूट होती.
७. धनसुख पटेल यांनी तीर्थक्षेत्री वडिलांच्या नावाने पिंडदान करणे आणि त्यानंतर २ दिवसांत वडिलांच्या व्याजाची रक्कम मिळाल्याची आनंदवार्ता समजणे अन् पटेल यांनी केलेले पिंडदान योग्यरित्या झाल्याचे जाणवणे
धनसुख पटेल यांनी त्यांच्या आईकडून पूर्वजांची ७२ नावे लिहून घेतली. जसे महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, नृसिंहवाडी या क्षेत्री पिंडदान, नारायण नागबळी इत्यादी विधी करतात, तसे गुजरातमध्ये नर्मदेच्या किनारी चाणोद नावाचे क्षेत्र आहे, तेथे हे सर्व विधी करतात. २-३ मे २०१३ या दिवशी धनसुख पटेल आणि त्यांच्या पत्नी सौ. उर्मिला पटेल हे चाणोदला पिंडदान विधी करण्यासाठी गेले. तेथील ब्राह्मणाने त्यांच्याकडून पूर्वजांच्या नावाने पिंडदान करवून घेतले. त्या वेळी धनसुख पटेलांना माझ्या वडिलांची आठवण झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या नावानेही पिंड ठेवला. (मी प्रतिवर्षी वडिलांच्या निधनाच्या तिथीला श्राद्ध आणि पितृपक्षात महालय नित्यनेमाने करत आहे.) विधी पूर्ण झाल्यावर ब्राह्मणाने धनसुख पटेलांना सांगितले, ‘‘तुमचे सर्व विधी चांगले झाले आहेत. पिंडदान केलेल्या सर्वांना त्याचा लाभ होईल.’’ त्यानंतर २ दिवसांत त्यांना ‘माझ्या वडिलांना त्यांची व्याजाची रक्कम मिळाल्याची आनंदवार्ता समजली. तेव्हा ‘धनसुख पटेल यांनी केलेले पिंडदान वडिलांपर्यंत पोचले’, असे मला वाटले.’
– वैद्य मंदार भिडे, रत्नागिरी (३०.८.२०२०)